बटाटा हाइट्स-२

  " पाणी, जरा पाणी देता का मला ?" मी कसाबसा म्हणालो.
"हो नक्कीच. अहो, जरा पाणी आणता का बाहेर ?" हॉल आणि स्वयंपाकघर यामधील पडद्याच्या रोखाने पावशे म्हणाले. पडद्याच्या मागे एक कुतूहल उभं होतं, हे मला मघाशीच जाणवलं होतं. तशी बांगड्यांची किणकीण ऐकायला आली होती.
"पण आपण आपली ओळख सांगितली नाही अजून !"
" मी लिखिते. कॉर्पोरेशनमधून आलोय. एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट.." मी भानावर येत म्हणालो.
" ओह! बरं झालं तुम्ही आलात. नाईस टू मीट यू मिस्टर लिखिते. त्याचं काय आहे, इथे पूर्वी एक चाळ होती. फार जुनी. पुढे ती पडायला झाली, तेव्हा तुमच्या कॉर्पोरेशनने ती पाडून टाकली. याच जागेवर ही बिल्डिंग बांधली गेली. बांधकाम होईपर्यंत काही काळ आम्ही रिहॅब कँपात राहिलो. पण जागेवरचा क्लेम ठेवून होतो. आता हा बिल्डर..."
" रामदुलारे तिवारी..." ...मला हे नाव का घ्यावंसं वाटलं? ...माझ्या कपाळाची शीर का ठणकते आहे?
" नाही. तो मेला कधीचाच. त्याचा खापर खापर पणतू. कालीप्रसाद.... कालीप्रसाद तिवारी. तो तुम्हाला खाली भेटलाही असेल."
हस्तिदंती सफारी सूट... ...काळा चष्मा... ...लाल डोळे! मी पाण्याचा सगळाच्या सगळा तांब्या घशाखाली रिकामा केला. पण सावरण्याचा प्रयत्न केला.
" बरं मग?"
" त्याने सगळा घोळ केला. एक तर, तुम्ही पाहिलेच असेल, खाली दुकानाचे गाळे काढले आहेत. ते ओरिजिनल प्लॅनमध्ये नव्हते; पण आम्ही कोणी विशेष अशी हरकत घेतली नाही. कारण तसा काही त्याचा आम्हाला त्रास झाला नाही.उलट आमच्या एका मेंबरला थोडा फायदा झाला. त्याच्या मुलाला तिथे मेडिकल स्टोअर्स काढता आले.....
"मंगेश हट्टंगडी?" ...अरे देवा! ...मला का हे माहीत होतं?" वंडरफुल! यू नो इट. पण अ करेक्शन. मंगेश नव्हे. त्यांचा मुलगा, दिनेश..."
"मंगेश म्हणजे यम. हट्टंगडी!" ... ते अजून तबला वाजवतात का ?...आणि वरदाबाई ? गातात अजून ?
"...म्हणून आम्ही काही ऑब्जेक्शन रेज केलं नाही; पण आता कहरच झालाय. तुम्ही खाली गणपतीचं मंदिर पाहिलं असेलच. ती जागा आमच्या सोसायटीची आहे. एफेसायप्रमाणे तो एरिया पार्किंग आणि सोशल पर्पजसाठी ओपन ठेवला आहे. तसं कन्व्हेयन्स डीडदेखील झालं आहे. पण या कालीप्रसादने काहीतरी मखलाशी करून, तुमच्याच लोकांना पैसे चारून तिथे त्याच्या मालकीचं बांधकाम करायचा घाट घातला आहे. तिथे तो बार काढणार आहे, असंही समजतंय. म्हणून मी हरकत घेतली आहे.  इथे ही कामं आणि काळजी करणारा मी एकटाच आहे. सांगायला लाज वाटतेय मला, पण, आमच्यात एकी नाही हो."
"पण मग बाबा काहीच म्हणत नाहीत ?"
"कोण बाबा ?"
" बर्वे! ते तर गांधीवादी विचारसरणीचे..." ....कपाळाची शीर ! ...ठणका !!
" भले! तुम्हाला ते कसे माहीत ? अहो ते तर कधीच गेले. मी कॉलेजामध्ये होतो तेव्हा. कसला गांधीवादी ! भंपक माणूस. त्यांची मुलेही जवळ राहिली नाही त्यांच्या."
"हो, एक तर गेला मेक्सिकोला... ...कायमचाच... ... आणि दुसरा अलास्काला."... आई गं ! ...पुन्हा ठणका !
" बरं मग, आता काय करायचं ?"
" ते तुम्हीच तर सांगायचं आहे. आपण असं करू, तुम्ही आलाच आहात तर, खाली गणपतीच्या कट्ट्यावर एक मीटिंग घेऊ. मी सगळ्यांना बोलावतो. तसे सगळेच घरी असतीलच असे नाहीच आणि असूनही येतीलच, अशी शाश्वतीही नाही. पण जे येतील ते येतील. निदान तुमच्या साक्षीने याला काही तरी चालना तर मिळेल."
मला काय म्हणावे आणि काय करावे तेच समजेना. त्यांच्या 'अहो' ने कांदा-पोह्याच्या बश्या आणून समोरच्या टी-पॉयवर ठेवल्या. " घ्या. आलोच मी," म्हणून पावशे कपडे बदलायला आत गेले.

      मीटिंगला कोण कोण येणार होते ?  ग्रहगौरव श्री. अण्णा पावशे? ...महापंडित श्री. बाबूकाका खरे ?...कुशाभाऊ अक्षीकर ? ...मंगेश हट्टंगडी ? ...सौ. वरदाबाई हट्टंगडी ? सोकाजी दादाजी नानाजी त्रिलोकेकर ? ...बाबलीबाय त्रिलोकेकर ? ...प्रा.नागूतात्या आढ्ये ? .....प्रा. कल्पलता फुलझेले ? .....रघूनाना सोमण ? ...आचार्य बाबा बर्वे ? .........मी ओळखतो का यांना ? ......आणि का ओळखतो ? ......ही नावे मला कशी माहीत झाली ? .......ही सगळी मंडळी आज हयात असतील ? कसं शक्य आहे ? ती तर कधीचीच गेली असतील! मीटिंगला कदाचित आता त्यांचे वारस येतील. कोण असतील ते ? त्यांची नावे काय असतील ? .........डोक्यावर कोणी तरी मणामणाचे घण घालीत होते.

   पुन्हा सिडनी शेल्डन डोक्यात थैमान घालू लागला. ती पाच खून करणारी मुलगी. मनोरुग्ण होती ती. त्या मनोविकारतज्ज्ञाने तिच्या विकाराचे केलेले विश्लेषण!
    'हा एक मनोविकार आहे. याला दुभंग-व्यक्तिमत्त्वाच्या पुढची पायरी म्हणता येईल. बहुविध व्यक्तिमत्त्व दुष्प्रभाव (मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर) किंवा विलग्न प्रतिमा दुष्प्रभाव (डिसोसिएटीव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर). या विकाराचे मूळ सर्वसाधारणपणे लहानपणी मनावर झालेल्या एखाद्या आघातात किंवा पौगंडावस्थेत झालेला असाच एखादा मानसिक आघात किंवा तारुण्यातील अत्यंत गूढ अशा स्वप्नरंजनातील संपृक्तता, यात असते. अशा अवस्थेतील माणूस किंवा असा विकार झालेला माणूस कधी कधी वास्तवाच्या अगदी विपरीत व्यक्तिमत्त्व धारण करून वावरतो. तर कधी, कधीही न पाहिलेल्या व्यक्तींचा आभासी वावर त्याच्या भोवताली असतो. दीर्घकाळ चालणारी संमोहन उपचार पद्धती यावर मात करू शकते. त्वरित परिणामासाठी मात्र विजेचे झटके हाच एक पर्याय ठरू शकतो.'

      कांदे-पोह्याच्या दोन बश्यांमधील दोन चमचे हवेत तरंगू लागले.माझ्या दोन्ही कानशिलांना ते चिकटले आणि हजारो वोल्ट्स विजेचा प्रवाह माझ्या मेंदूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवू लागला. मी उठून उभा राहिलो आणि पळत सुटलो. जिन्याच्या किती पायऱ्या उतरलो मी ? चाळीस ? चारशे ? चार हजार ?

     श्वास एकवटून उभा राहिलो. वर स्वच्छ आकाश दिसत होतं.मागे बटाटा हाइट्स. वाचलो! तो मनोविकाराचा आघात नव्हता तर. मग काय असेल ? मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती. काही तरी होतं तिथे. पावशे, खरे, अक्षीकर, समेळ, हट्टंगडी, सोकाजी, नागूतात्या, कल्पलता... सगळे मीटिंगला येणार होते ?... कसे येणार ?
ते तर जिवंत नव्हते. कदाचित असतीलही... ...नसतीलही... ...की त्यांचे ...?????

      आता इथून पळायला पाहिजे. पण कसे पळणार ? समोर एक काळा कुत्रा वाट अडवून उभा होता. लाल जीभ बाहेर काढून लहाकत, लाल लाल डोळे माझ्यावर रोखून! त्याने हस्तिदंती रंगाचा सफारी सूटही अंगावर चढवला होता !! त्याच्यावरून उडी मारून पळून जाणे मला जमणार होते. शाळेत असताना मला लांब उडीत नेहमी बक्षिसे मिळायची. लांब उडी ? ...की उंच उडी ? मी उडी मारलीच. तोही झेपावला. त्याने त्याचा जबडा वासला, माझ्या विजारीचे टोक त्याने दातात धरले आणि खस्सकन...

      ... कोणीतरी माझे पांघरूण ओढले... ...तो कुत्रा आता जिवाच्या आकांताने भुंकूही लागला. " उठा आता. बस्स झालं ते पसरणं. माणसाने मेलं झोपावं तरी किती ! दहा वाजायला आलेत. आज सुटी आहे म्हणून काय झालं ? हज्जार वेळा सांगितलं, त्या इंग्रजी कादंबऱ्या वाचत जाऊ नका म्हणून. इतकं रात्र रात्र जागून वाचण्यासारखं असतं तरी काय मेलं त्यात कोण जाणे. आणि हे काय ? बटाट्याची चाळ ? पु.ल. देशपांडे ? म्हणजे तो शेल्डन संपवून तुम्ही हे घेतलंत रात्री वाचायला ? कम्माल आहे गंऽऽ बाई तुमची!"

      कुत्रा बायकोच्या...  ...बायको कुत्र्याच्या... ...अयाऽऽऽऽऽई.....बायको बायकोच्याच आवाजात ओरडत होती.

अरुण वडुलेकर

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.