दिवाळी तोंडावर येताच मात्र शिवायला टाकलेल्या शर्टाची आठवण झाली व तसाच तडक दिघूकाकांसमोर दत्त म्हणून उभा ठाकलो. दोन्ही हात कमरेवर ठेवून जाब विचारण्याच्या आविर्भावात 'शर्ट कुठे आहे ?' म्हणून विचारले, तर 'कापड कधी दिले होते ?' ह्या अत्यंत शांतपणे विचारलेल्या त्यांच्या प्रश्नावर सर्द होऊन 'बॅक फूट' वर जाण्याची वेळ आता माझी होती ! काकुळतीला येऊन त्यांना पटवून सांगावे लागले. नेमके कापडाचे वर्णन मला आठवत होते म्हणून बरे, नाहीतर पंचाईतच झाली असती. "संध्याकाळी ये, शोधून ठेवतो," असे ठेवणीतले वाक्य तोंडावर फेकून ते 'अर्जंट' ऑर्डर्स पूर्ण करण्यात गुंग झाले. बराच आकांडतांडव केल्यावर त्यांनी 'सुधा, याचे कापड शोध रे बाबा, नाहीतर हा मला काम करू द्यायचा नाही,' असे धाकट्या भावाला सांगितले. सुधाकाकाही त्यांच्याच हाताखाली तयार झालेले. शर्टाचा विषय गोल गोल फिरवत, इकडचे-तिकडचे विषय काढून त्यांनी मला शेंडी लावून रवाना केले; पण घरी येऊन मी आईच्या मागे भुणभूण लावली. शेवटी माझ्या कटकटीला वैतागून का होईना ती त्यांच्याकडे जाऊन आली. तिने आणलेली बातमी मात्र माझ्यासाठी फारशी सुखद नव्हती.... 'ते कापड शोधून ठेवणार आहेत, तू परवा जा त्यांच्याकडे' इतकेच मोघम बोलून ती दिवाळीच्या तयारीला लागली.
माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. जेमतेम एक दिवस काढून मी सक्काळी सक्काळी त्यांच्याकडे हजेरी लावली. माझ्याकडे न बघतच त्यांनी 'नंतर ये रे, आता तर कुठे मी झाडू मारतोय,' असे सांगण्याचा प्रयत्न केला; पण मी इरेला पेटलो होतो. 'मला आत्ताच्या आत्ता कापड बघायचे आहे,' चा तगादा मी लावला. शेवटी नाइलाजाने 'तुझ्या शर्टाचे कापड हरवले,' हे सत्य त्यांना सांगणे भाग पडले. त्यांना अद्वातद्वा वाटेल ते बोलून मी तेथून निघालो खरा; पण माझा रडवेला चेहरा बघून तेही जरा चपापलेच होते. घरी पोहोचेपर्यंत मी जेमतेम रडू दाबून ठेवले होते. घरी येताच मात्र ओक्साबोक्शी रडू लागलो.
दोन दिवस मी घरात आई-दादांचे डोके चावून चावून खाल्ल्यावर मला एक तयार सदरा मिळाला. माझ्या आयुष्यातल्या प्रथमच घडलेल्या काही घडामोडींमध्ये कोणाचे श्रेय असेल की नसेल, ते सांगता येत नाही; पण तयार कपडा दिघूकाकांच्या मेहेरबानीने प्रथमच माझ्या अंगाला लागल्याचे मला चांगलेच आठवते !
नरकचतुर्दशीच्या सकाळी अभ्यंगस्नान झाल्यावर फटाके फोडण्याच्या नावाने केलेल्या उनाडक्या संपवून घरी जाऊन पोहोचलो व बघतो तर दिघूकाका फराळातल्या ताटावर ताव मारत बसलेले दिसले. "माझा शर्ट कुठे आहे ?" मी परत कंबरेवर हात ठेवले. "गप्प बस रे, खाऊ दे जरा मला आधी' त्यांना माझ्या सदऱ्याची जराही काळजी नसलेली बघून मला त्यांचा चांगलाच संताप आलेला होता.
ते गेल्यावर दादांनी एक अर्ध्या बाह्यांचा निळसर रंगाची चौकट असलेला सदरा माझ्या हातात ठेवला. 'हे बघ तुझे कापड हरवले ना, म्हणून दिघूकाकांनी नवीन कापड आणून हा शर्ट शिवून दिला आहे.' माझे थोडे फार समाधान झाले होते.
ही गोष्ट माझ्या इतकीच त्यांच्या व आई-दादांच्या स्मरणातही चांगलीच राहिली होती. पुढे कधीही कपडे शिवायला टाकताना त्या 'शर्ट'च्या कापडाचा उल्लेख हमखास व्हायचा. बरीच वर्षे उलटल्यावर निळसर चौकट असलेल्या सदऱ्याचे खरे रहस्य मला कळले. दादांनीच ते कापड बाजारातून आणून दिघूकाकांकडे शिवायला दिले व तूच येऊन त्याला शर्ट दे म्हणजे त्याचा राग जाईल, असेही सांगितले.
धन्य ती माणसे व धन्य त्यांची आपापसातली नाती ! अशी नाती कुरियरने कितीही पत्रे पाठवली तरी तयार होणे शक्यच नाही !
एकदा सदरा शिवायला टाकला होता, नित्यनियमाने महिना गेल्यावरही माझे खेटे चालूच होते. राग येत होता; पण सांगणार कोणाला ? संताप अनावर झाल्यावर त्यांच्याकडे जाऊन "थांबा, तुमच्या दुकानात उंदीर आणून सोडतो," अशी धमकी दिली. क्षणभर ते अविश्वासाने माझ्याकडे बघत राहिले. मला वाटले, आता आपले काम लवकर होईल... कसले काय, त्यांनी मला हग्या दम दिला, 'मला उंदराच्या धमक्या देतोस काय ? ज्जा, नाही शिवत तुझा सदरा.....' करून चक्क कटिंग केलेल्या सदऱ्याची भेंडोळी तोंडावर फेकली ! मी गुपचूप ती घेऊन घरी आलो.... एकदा लवकर कपडे शिवत नाहीत म्हणून, त्यांच्या इतर गिऱ्हाइकांची दोन-तीन कापडे घेऊन मी त्यांच्या समोरून पळ काढला. पुढे मी व मागे दिघूकाका अशी गल्लीभर चांगली वरात फिरल्यावर मी घरात शिरलो.... तोवर मागून ते धापा टाकत आले. येताना त्यांनी अंगणातल्या मेंदीच्या झाडाची काडी तोडून आणली होती. सटासट काडीने दोन-तीन फटके माझ्या उघड्या पायांवर मारून, माझ्याकडून ती कापडे व आईकडून कपभर चहा वसूल करून ते गेले......
वेळेवर म्हणजे अगदी बरोबर 'वेळेवर' कपडे आणून देण्यात दिघूकाकांचा हात कोणीच धरू शकत नसे. नवऱ्यामुलीला लग्नाच्या दिवशी सकाळी ब्लाऊज देणे, बाहेरगावी जाताना-चक्क गाडी सुटताना- फलाटावर कपडे आणून देणे, जाब विचारल्यास 'वेळेवर कामे करतो की नाही ?' असे म्हणून वर आपल्यालाच निरुत्तर करीत; पण कपडे शिवण्यातही त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही ! 'ब्लाऊज' माप न घेता हा गृहस्थ अगदी माप घेतल्यागत बरोबर शिवतो, अशी त्यांची ख्याती होती हे सांगितल्यास नवल वाटेल. त्यांनी शिवलेले कपडे विटले, फाटले पण कधी उसवले नाहीत ! त्यांनी केलेली काजी व लावलेली बटणे यात तसूभराचाही घोळ नसे. दिघूकाकांनी शिवलेल्या विजारी खुर्चीवर बसल्यावर कधीही घोट्याच्या वर जात नसत हे आजही चांगले आठवते.
दीर्घ आजारानंतर आजोबा गेले तेव्हा माझी नववीची परीक्षा संपून मी दहावीत प्रवेश केला होता. बराच वेळ दाबून ठेवलेला हुंदका अग्नी देताना दादांच्या तोंडून बाहेर पडलाच. अरुणकाका तर ओक्साबोक्शीच रडत होते. बाकी सगळे काय करावे या संभ्रमात असताना दिघूकाका त्या दोघांना धीर देत असल्याचे चित्र आजही डोळ्यांसमोर तसेच आहे.
दहावी/बारावी पास झाल्यावर मित्रमंडळींच्या नादाला लागून दुकानवाल्या 'टेलर' कडे कपडे शिवायला द्यायला लागलो. बटणवाल्या विजारींची जागा चेन असलेल्या 'ट्राउझर्स' नी घेतली. 'प्लिट्स'वाल्या 'पॅंट्स' व 'कट्स' वाले 'शर्ट' आले. नवनवीन फॅशन्स आल्या; पण त्या टेलर्सशी काही सूत जुळलेच नाही. दिघूकाकांबद्दल वाटणारी आत्मीयता त्या दुकानदारांबद्दल वाटणे कधीच शक्य नव्हते. दिघूकाकांनाही समजत असावेच की, हल्ली मी माझ्या पॅंट्स किंवा शर्ट्स बाहेर शिवायला टाकतो; पण कधीही त्यांनी त्याबद्दल मला चकार शब्दानेही विचारले नाही. शिंगे फुटल्यावर कॉलेजातल्या दिवसांत धूम्रपान करताना एकदा ते नेमके समोर आले. त्यांना बघताच शरमेने तोंडातून शब्दच फुटला नाही. 'पोरा, ही सगळी थेरं कमाई सुरू झाल्यावर करावीत,' इतकेच बोलून त्यांनी रस्ता बदलला; पण घरी कधी चुगली केली नाही.
मला नोकरी मिळाल्यावर झालेला त्यांचा आनंदित चेहरा व सद्गदित स्वर आजही चांगलाच आठवतो. नाईक वकिलांचा मोठा मुलगा गायनॅकॉलॉजिस्ट व सून जनरल सर्जन ! अलकावहिनींना मी नोकरीत असताना इंडोस्कोप विकला, तेव्हा तो मुंबईहून नेण्यासाठी त्यांचे भाऊ सुधाकाका आमच्या ऑफिसमध्ये आले होते. एखाद्या माणसाला काही गोष्टींचे किती कौतुक वाटावे, याची परिसीमा किंवा अंदाज येणेच कठीण.
गल्लीतल्या बहुतेक सर्वांना माझ्या ऑफिसचे व मी करीत असलेल्या कामाचे, सुधाकाकांकडून कळलेले वर्णन त्यांनी कौतुकाने सांगितले. फक्त माझ्याच नव्हे तर डॉ. प्रदीप, अलकावहिनी, हेमंत नाईक, पंकज साठे, उदय मोघे, श्रीकांत पाठक इत्यादी गल्लीतल्या मुलांनी केलेल्या प्रगतीने ते सुखावून जायचे. आपण किंवा आपल्या मुलांनी केलेल्या प्रगतीचे वर्णन सर्वच करतात; पण दुसऱ्यांच्या प्रगतीचे वर्णन करणारा माणूस विरळाच !
दिघूकाका गेले तेव्हा मी मुंबईत कुठेतरी त्यांच्या कौतुकाचा विषय असलेला 'इंडोस्कोप' विकत होतो. संध्याकाळी घरी आल्यावर सौने, ' आईचा फोन होता,' असे सांगितले. ती दिघूकाका गेल्याची बातमी होती ! एका क्षणासाठी निःशब्द झालो.... डोळे ओलावले व दुसऱ्याच क्षणी ओक्साबोक्शी रडू लागलो......!!
जणू माझ्या शर्टाचे कापडच परत एकदा हरवले होते !!!
माधव कुलकर्णी