राईनीचं ते झाड सहा वर्षांचं झालं तेव्हा ते रावजीच्या घराच्या छपराइतकं उंच झालं होतं. आता त्याच्यासाठी पाणी आणावं लागत नव्हतं. पावसाळ्यात मिळणारं पाणी त्याच्यासाठी पुरेसं होतं, एरवी ते काय करायचं हे काही रावजीला ठाऊक नव्हतं. पण झाड वाढतंय म्हटल्यावर त्याला त्याची चिंता करण्याचं कारण नव्हतं.
रावजीनं ते झाड लावलं तेव्हा त्याला कल्पनाही नसावी की ते झाड त्या गावासाठी बरंच काही करणार आहे. कारण काही काळातच त्या गावातल्या प्रत्येक घरापुढं झाडं दिसू लागली. एकदा पेवलीच्या मूळ गावचा कारभारी आला आणि त्यानं ते पाहिलं. तो म्हणाला देखील, 'अक्कल सुचली तुम्हाला शेवटी.'
पेवलीच्या पाठोपाठ गावात आलेले वेस्ता आणि डोंगऱ्या यांना काही उमजलंच नाही. त्यांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून कारभारी म्हणाला, 'अरे गावात झाड लावलंच पाहिजे. प्रत्येकाच्या शेतात लावा. महू, साग, आंबा काही तरी लावा.' त्या दोघांच्या डोक्यात मग प्रकाश पडला आणि रावजीला एक कामच मिळालं. पोरांची टोळी करून तो जंगलात जायचा, काही छोटी झाडं मुळासकट उपटून काढायचा आणि ती गावात आणून लावायचा. असं करता-करता तिथलं सारं जंगल त्याच्या पायांखालूनही गेलं. जंगलातली अनेक गुपितं त्यामुळं त्याला समजली. मग गावात काहीही झालं की त्या जंगलातून कसं काय मिळवता येईल हे रावजी सांगू लागला. गावाची कारभारकी त्याच्याच धाकट्या भावाकडं होती. गावचा कारभार तो सांभाळायचा; पण जंगल किंवा त्याच्याशी संबंधित विषयावर रावजीचं म्हणणं अंतिम असायचं. कारण रावजी केवळ गावातल्या घरांपुरतीच झाडं लावून थांबला नव्हता. नदीकडं जायच्या वाटेवरही त्यानं झाडं लावली होती. मग त्याचा तो सोस वाढतच गेला आणि गावाच्या शीवेला धरून झाड लावण्याचा उद्योग त्यानं आरंभला.
झाडाच्या आसपास घुटमळणारा रावजी हे तिथलं नेहमीचे दृश्य होऊन गेलं. रावजी झाडांशी बोलतो, अशीही गावात भुमका उठली होती. तो काय बोलतो याचं कुतुहल लोकांमध्ये असायचं. काही जण विचारायचेही रावजीला, की बाबा काय बोलतोस तू झाडाशी, असं. रावजी हसायचा. प्रश्न पुन्हा आला की, म्हणायचा लहान बाळाशी आपण काहीही बोलतोच ना, तसंच काहीही बोलतो मी झाडांशी. विचारणारा मग 'वेडं ध्यान' असा चेहरा करून तिथून निघून जायचा. अनेकदा अनेकांनी रावजीला एखाद्या झाडाच्या खोडावरून हळुवारपणे कुरवाळतानाही पाहिलं होतं. एखाद्या माणसावर माणसानं करावं तसं त्याचं झाडांवर प्रेम असतं, हे त्यातून दिसायचं.
रावजीच्या या झाडप्रेमातून मग त्या गावाला गावाचं रुपडं आलं. गर्द झाडीनं गाव वेढलं गेलं. तीसेक उंबरा असलेलं ते गाव तीन पाड्यांमध्ये विभागलेलं होतं. प्रत्येक पाड्यावर आता झाडं होती. सरपणासाठीही जंगलात जाण्याची वेळ क्वचित यायची. एक मात्र होतं. होळीला प्रत्येक जण जंगलातच जाऊन आपल्या वाट्याची काठी आणायचा होळीसाठी.
राईनीचं ते झाड मग त्या गावची चावडी बनलं. तिथं बसून गावचे निवाडे होऊ लागले. उत्सवही ठरू लागले.
रावजी गेला, त्याआधी पेवलीही गेली, त्याला कित्येक वर्षं झाली; पण त्या घरासमोर झाडाखाली बसून त्यांची कथा सांगायचा कार्यक्रम वर्षांत एकदा तरी व्हायचाच. कथा कोणी सांगायची याचाही प्रश्न नसायचा. त्या गावची त्यांच्यानंतरची प्रत्येक पिढी ती कथा ऐकतच मोठी झालेली होती. कथा ऐकली की त्या झाडांशी असणारं त्यांचं नातं आणखी घट्ट होत जायचं, वर्षागणीक.
---
सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी त्या गावात एक दिवस आक्रीत झालं. पेवलीची कितवी पिढी त्या गावात नांदत होती हेही कोणास सांगता येत नव्हतं. अशा काळात गावात एके दिवशी दुपारी पहाडाच्या बाजूनं पांढऱ्या रंगालाही लाजवेल अशा रंगाची काही माणसं शिरली. त्यांच्यासोबतच वरच्या खाई गावचा जहांग्र्या होता. परकी माणसं अशी गावात एकदम आल्यानं गोंधळ उडाला. त्यावेळी कारभारकी जुवान्याकडं होती. त्याच्या घरासमोरच्या त्या राईनीच्या झाडाखाली या मंडळींना जहांग्र्यानं बसवलं. जुवान्याच्या पोरानं त्यांना पाणी दिलं आणि तेवढ्यात जहांग्र्यानं जुवान्याला बाजूला घेऊन सांगितलं, 'इथलं जंगल कापायचं ठरवलंय या लोकांनी.'
'का?'
'त्यांना मोठा लाकूडफाटा हवाय. तिकडं लांबवर घेऊन जायचा आहे म्हणून.'
'पण हे जंगल तर आपलं आहे.'
'ऐकत नाहीत. घोड्यावरून माणसं घेऊन येतात. तिकडं वर आता पहाडच फोडतात ते लोक. मोठा आवाज करणारं, फिरणारं काही तरी घेऊन येतात. त्याच्यावर लाकूड टाकून घेऊन जातात. कोणी पुढं आलं तर मारतात. त्यांच्याकडं लांब नळीसारखं काही आहे. त्यातून आवाज करत काही तरी बाहेर पडतं आणि ते अंगात घुसून माणूस मरून पडतो.'
नळी काय, आवाज करत फिरणारं काय, हे सगळं जुवान्याच्या समजाच्या पलीकडचं होतं. त्याला काहीही सुचेना झालं. गावकऱ्यांचा विचार त्याला घ्यायचा होता. पण तेवढा वेळ मिळाला नाहीच त्याला; काही वेळातच त्या लोकांनी गावाच्या सभोवार फिरून घेतलं. जुवान्याला कळलं की कागदावर ते लिहून घेताहेत काही तरी. जुवान्याला लिहिता येत नव्हतं; पण असं काही तरी चालतं, हे त्याला माहिती झालं होतं. काही बोलावं म्हणून तो पुढं झाला; पण तीही संधी त्याला नव्हती. ती वावटळ आली तशी काही काळात निघूनही गेली. जाता-जाता जहांग्र्यानं त्याला सांगितलं. 'जंगल जाणार हे नक्की आता. आमचा गाव पण उघडा झालाय आता. आपण काहीही करू शकत नाही. राहतील ती झाडं फक्त आपल्या शेतातली, घरांतली. तेवढीच वाचवा. बाकी सारं गेलं.'
---
रावजीनं लावलेल्या त्या जंगलाचा शेवट झाला त्याला आता कित्येक वर्षं उलटली आहेत. त्या जंगलाचा आरंभ ठरणारं ते राईनीचं झाड मात्र अजूनही एखाद्या वृद्ध तपस्व्यासारखं त्यांच्या त्या घराच्या अंगणात उभं असायचं.
या गावात त्यावेळी आलेली ती गोरी माणसं म्हणजे सरकार हे लोकांना समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता. सरकार म्हणजे काय हे त्यांना तसं आत्ताही नीट सांगता येत नव्हतंच. पण इथं जे काही आहे ते आपलं नव्हे तर त्यांचंच असतं इतकीच जाणीव त्यांना पक्की झालेली आहे.
असंच कधी त्या गावात जाणं व्हायचं तेव्हा त्या झाडाखाली आमची बैठक बसायची. गावाभोवतालचं जंगल गेलं आणि जगणं कसं बिकट होत गेलं हे ऐकावं लागायचं. मुळात जंगल कापायचं ही कल्पनाच तेव्हाच्या गावकऱ्यांना हादरवून गेली होती. असं काही करायचं असतं हेच त्यांच्या गावी नव्हतं. जंगल हा आधार असायचा बिकट काळात. लागेल तेव्हा लागेल तितकंच जंगलातून घ्यायचं, हीच त्यांना वाडवडिलांपासून मिळालेली शिकवण होती. त्यानुसार घर उभं करायचं असेल तेव्हा लागेल तेवढीच झाडाची फांदी तोडायची, ही त्यांची पद्धत. डोळ्यांसमोर झाडं जाणार हे कळलं तेव्हा ती माणसं उध्वस्त होऊन गेली म्हणतात. सरकारनं तेव्हा जंगल कापताना काय केलं, हे कोणाच्या तरी स्मृतींमध्ये असतं. सरकारनं माणसं मारली, असं कोणीतरी सांगतो आणि एखादा वृद्ध डोळ्यांत पाणी काढतो. तो त्यावेळी तरूण असावा, त्याच्या डोळ्यांमध्ये ती दृश्यं साठलेली असावीत बहुदा.
पारसीसेठ हे एक नाव त्या कहाण्यांतून सारखं येत असतं. त्यानं त्या काळात ट्रक लावून जंगल कापून या पहाडाचा सफाया केला, असं ही मंडळी सांगतात. हा ट्रक म्हणजे जहांग्र्यानं सांगितलेलं 'आवाज करत फिरणारं काही तरी' हेही त्यांना समजायला उशीरच झाला होता. अर्थात पारसीसेठचा ट्रकही नंतरच आला होता. आधी होत्या बैलगाड्या. पारसीसेठनं त्यासाठी या गावच्याच लोकांना मजूर केलेलं असतं. झाड तोडायचं, हाताच्या हिशेबात लांबी मोजायची आणि आण्यांच्या हिशेबात मजुरी घ्यायची, असं करत ते जंगल साफ झालं; कित्येक दिवसांच्या परिश्रमानं.
गावकरी त्याला सहज तयार झाले नव्हतेच. तंट्या भिलासारख्यांच्या ऐतिहासिक कथांचा उगमही त्या जंगलतोडीतच असायचा हे आता इथल्या अनेकांना कळतं. पेवलीतही असं काहीसं झालं होतं. जुवान्यानं पहिल्यांदा झाडं तोडायला विरोध केला तेव्हा त्याला एका झाडालाच टांगून कसं चोपण्यात आलं होतं, हे त्या राईनीच्या झाडानं अशा बैठकांमध्ये कितीवेळेस ऐकलं होतं हे सांगणंही मुश्कील असावं. त्या मारहाणीतच जुवान्या अधू-अपंग झाला आणि गेला. जुवान्या गेला तेव्हा गावकऱ्यांनी आपल्या राजाकडं धाव घेतली. पण त्याचाच गाव उजाड झालेला पाहून त्यांना आपलं भविष्य काय आहे हे कळलं. इतकंच नव्हे तर ह्या राजानंच पारसीसेठला झाडं तोडण्याची परवानगी दिल्याचंही त्यांना कळलं. मग गेल्या पावली मंडळी मागं फिरली. त्यांनी पारसीसेठचंच निमूटपणे ऐकायचं ठरवलं. हाती कुऱ्हाडी घेतल्या आणि झाडांवर चालवल्या. जंगल साफ झालं. ते वाहून नेण्यासाठी आवाज करत फिरणारं काही तरी जे आलं होतं, ते आलं तसं गेलं.
---
आता जंगल राहिलं नाही. महूची फुलं-फळं हाही असाच एक मोठा आधार. तोही संपला. वर्षानुवर्षं ज्या आधारावर जगायची सवय होती तो आधारच गेला तर करायचं काय? कधी फॉरेस्ट्याची नजर चुकवून कोणी जातं जंगल म्हणतात त्या भागात; आणतं एखादा कंद किंवा मुळं. तेवढाच साठा ठरतो त्याच्यापुरता. कधी गरज लागली तर त्यांचाच पोटाला आधार. जंगलं संपलं तसं, शेत काढायचं हा विचारच अशक्य ठरत गेला. असलेल्या शेतीत भागत नाही म्हणून जंगलाची वाट धरावी तर फॉरेस्ट्या धरतो, प्रत्येकवेळी त्याला कुकडी द्यायची कुठून, असं कोणीतरी विचारतो; पण हा प्रश्न आरशांवरच आदळलेला असतो. कारण समोर असतात ते समदुःखीच. रावजीनं दिलेली झाडांची माहिती, त्यांचे उपयोग असेच एकेका पिढीतून चालत आलेले असतात. आधीच्या पिढीत जंगल असतानाचा एखादा वृद्ध असेल तर त्याच्या तोंडून ते चमत्कार आता ऐकण्यापुरतेच राहिलेले असतात.
पहाडातून पेवलीला जाताना अनेकदा जुन्या काळच्या रस्त्याच्या खुणा दिसतात. पारसीसेठनं त्या काळी झाडं तोडून नेण्यासाठी तिथं केला होता तोच हा रस्ता. तेव्हा झाला तेवढाच रस्ता. त्यानंतर आजतागायत नाही. आत्ताही तिथं जाताना पायीच जावं लागतं. पहाडाच्या तीन रांगा ओलांडाव्या लागतात. त्या ओलांडून पेवलीत प्रवेश केला की, लक्ष वेधून घेतं ते राईनीचं झाडच. एरवीही कारभाऱ्याचंच घर आधी गाठलं जातं. त्यामुळं बाहेरून येणाऱ्याची पावलं त्या झाडाखालीच विसावत असतात. गावच्या एखाद्या वृद्धाच्या आठवणीतूनच पेवलीच्या रावजी या झाडवेड्याचं नाव उमटतं. तिथं बसून त्यानं त्या काळात नदीतून पाणी आणून झाडं कशी जगवली असावीत याच्या कल्पना करता-करता डोळा लागतो आणि मग स्वप्नात येतं ते रावजीनं लावलेली राईनीचं झाड आणि पेवलीची वेस धरून फेर मांडलेली झाडं.
---
सहा-आठ वर्षांमागं नदीनं अक्राळविक्राळ रुप धारण केलं. वर्षातच नदीचं पाणी त्या झाडाच्या बुंध्यापर्यंत आलं. आणखी एका वर्षांनं तिनं तो गाव गिळून टाकला. गावाबरोबरच तिथलं सगळं जीवनही पाण्याखाली गेलं. इतरांबरोबरच राईनीचं ते झाडही.
---त्या झाडाची नोंद म्हणे आजच्या सरकार-दरबारी नव्हतीच. खरं तर, तिथं झाडंच नव्हती अशी नोंद आजही पहायला मिळते आणि तसं खुद्द त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच सांगून ठेवलंय असं म्हणतात. ---
श्रावण मोडक