झाड-१

      माझ्यासोबत आलेल्या त्या वृद्धानं हाताचं बोट पुढं करून एक जागा दाखवली.
या गावाचं पहिलं घर तिथं होतं. त्यानं हात केला तिथं आता पाण्यातून वर आलेला एका झाडाचा शेंडा फक्त दिसत होता मला.
      ते झाड मी आधीही पाहिलं होतं. भरगच्च. अगदी फेर धरून उभ्या रहाव्या तशा त्याच्या फांद्या वर्तुळाकार वाढलेल्या होत्या. आधी सरळ रेषेत जमिनीला समांतर आडव्या गेलेल्या आणि मग किंचित झुकून जमिनीच्या दिशेनं आलेल्या. त्यामुळं लांबून पाहिलं की, झाडाची गोलाई नजरेत भरून जायची.

प्रत्येक फांदीवर पानं इतकी गच्च भरलेली असायची, की त्या झाडाच्या खालचं सुमारे वीस पावलं त्रिज्या असलेलं वर्तुळ कायम सावली देत असायचं. तिथं बसून अनेकदा मी विश्रांती घेतली होती. कित्येक रात्री जागवल्या होत्या. कहाण्या ऐकल्या होत्या. खालून येणारी नदीच्या खळखळाटाची पाश्वर्भूमी त्या सगळ्या अनुभवांना असायची. त्यामुळं तो अनुभव अगदी केव्हाही मनात जागा व्हायचा आणि त्या गावात घेऊन जायचा. सगळं ऐकलं होतं; पण त्या गावाची आणि त्या झाडाची कहाणी काही मला तिथं कधीच ऐकायला मिळाली नव्हती. आत्ता ती ऐकली तेव्हा ते गाव किंवा ते झाड मात्र नव्हतं. त्याचा शेंडा मला खुणावत होता इतकंच.
'या झाडानं बरंच काही पाहिलंय.' तो वृद्ध त्याच्या भाषेत म्हणाला.
---
      पेवलीनं उभ्या केलेल्या घराच्या भोवती खेळता-खेळता एक दिवस तिच्या मुलानं, रावजीनं, तिला विचारलं, 'आई, इथं एक झाड लावूया का?'

      आईसोबत मूळ गावी तो गेला होता तेव्हा तिथल्या कारभाऱ्याच्या घरासमोर असंच एक झाड होतं. कारभाऱ्यानं झाडाखालीच बाज टाकली होती, तिथं बसून त्यानं कारभाऱ्याकडून आपल्या आईची कहाणी ऐकली होती. एकटीनं गावातून बाहेर पडून हा नवा गाव तिनं कसा वसवला त्याची. रावजीला त्यातलं फारसं काही त्यावेळी समजलं नव्हतं. कळलं होतं ते इतकंच की त्याची आई धीराची असावी.

     ती गोष्ट जशी त्याच्या मनात घर करून बसली होती तसंच एक घर त्याच्या मनात केलं होतं झाडानं. ते झाड, त्यासमोरचं घर, खाली वाहत जाणारी नदी, मागं पाठीशी खंबीरपणे उभा असलेला पहाड हे चित्र त्या घरात पक्कं बसलं होतं. आज आत्ता आईला झाड लावूया का असं विचारण्यामागं तेच कारण होतं.
  
      पेवलीनं होकार भरला आणि वानरासारख्या उड्या मारत रावजीनं मागचा पहाड गाठला. कसलं झाड लावायचं वगैरे विचार करण्याची त्याला गरजच नव्हती. पहाडात उगवेल ते झाड तिथंही उगवेल हे त्याला पक्कं ठाऊक होतं.
पंधरा-वीस पावलं पहाड चढल्यावर तो डावीकडं वळला. झाडोरा तिथं अधिक गर्द होता. जंगलात शिरल्यावर मात्र त्याच्यासमोर पेच उभा ठाकला. किती प्रकारची झाडं होती तिथं त्याची मोजदाद नव्हती. आईबरोबर पहाडात आलेल्या प्रत्येकवेळी त्यातल्या प्रत्येक झाडाचा काही ना काही उपयोग त्याला समजला होता. झाडांची नावं मात्र त्याच्या लक्षात रहायची नाहीत. पेवली त्याला कित्येकदा म्हणायची सुद्धा, नावं लक्षात राहिली नाहीत तर उपयोग कसा कळणार तुला? पण रावजी झाडं ओळखायचा तो पानावरून किंवा त्याच्या एखाद्या काटकीवरून. तेवढ्यावरूनच तो उपयोग सांगू शकत होता, त्यामुळं नावं लक्षात ठेवण्याची त्याला तशी गरजच वाटली नव्हती कधी.

      रावजीनं एकदा सभोवार पाहिलं. साग होता, ऐन होता, तीनसाची काही झाडं होती. राईनीचीही होती. झुडपांची तर गणनाच नव्हती. आणखी काही अंतर तो पुढं गेला असता तर त्याला आंब्याची झाडंही दिसली असती. पण त्याला त्याची गरज वाटली नाही. समोर शिरत त्यानं राईनीचंच एक झाड पाहिलं. डेरेदार अशा त्या वृक्षाच्या आजूबाजूला त्याच झाडाची पिल्लं म्हणावीत, अशी आणखी काही छोटी झाडं होती. त्यातलं एक त्यानं मुळासकट उपसलं आणि तो माघारी वळला.

      एव्हाना पेवली या गावाला गावपण आलं होतं. पेवलीनं तिचं घर केलं होतं सपाटीवर. नदी आणि पहाडाची पहिली रांग सुरू होते त्याच्या मध्यावर. मागं पहाडापर्यंत गाव सरकला होता. प्रत्येकाचं शेत झालं होतं; पण गावाला गावाचं रुपडं नव्हतं. कारण झाडोरा नव्हता. गाव म्हटलं की प्रत्येक घराच्या आवारात - परिसरात किमान काही झाडं तरी असायचीच त्या भागात. पेवलीत मात्र तसं नव्हतं. ते कोणाच्याही ध्यानीही आलं नव्हतं, अगदी रावजीच्याही. फक्त आपल्या घरासमोर झाड असावं इतकंच त्याला वाटलं आणि त्यानं जंगलात जाऊन ते आणून लावलं.
राईनीच्या झाडाची वाढ तशी सामान्य गतीनंच होते. पण रावजीला घाई नव्हती. झाडं कसं वाढतं ते पाहण्यात दिवस घालवायला त्याची ना नव्हती. एकूणच त्याचं झाडं, रोपटी हे प्रेम. त्याच्या वयाला शोभणार नाही असं. दिवसभर जंगलात तो रमून जायचा ते या झाडांच्याच संगतीनं. गावातल्या इतर मुलांमध्ये त्याची फारशी उठबस कधी नव्हती. त्यांच्यासोबत नदीवर डुंबायला तो जायचा तेवढंच. बाकी वेळ जंगलात. कुठं झाडाचं पान काढ, ते फाडून पहा, एखादी काटकी मिळव आणि ती वाकते का याचे प्रयोग कर. कुठं झाडातून धागे निघतात का ते पहा. कुठं फुलंच कुस्कर आणि त्यात पाणी मिसळून त्याच फुलांच्या झाडांवर बोटानं ते रंगीत पाणी फासत बस असे त्याचे उद्योग चालायचे. बरोबरीच्या वयाची पोरं त्याला झाडवेडा किंवा फुलवेडा म्हणायची. रावजीला त्याचं काहीच वाटायचं नाही.

      जंगलातलं झाड घरासमोर आणून लावायची त्याच्या डोक्यातली कल्पना पाहता-पाहता गावात घुमली. तिथं रहायला आलेले सारेच तसे आपापल्या गावात एकटे पडलेले होते. मूळ गावात असलेली शेती, तिथला झाडोरा त्यांना पाहून माहिती होता. पण असं जंगलातून झाड आणून गावात, घराच्या परिसरात लावायचं हे त्यांच्यासाठी मात्र नवंच होतं. रावजीच्या झाडाचं ते कौतुक बराच काळ सुरू होतं. रावजीचं त्याकडं ध्यान असायचं नाही.
झाड लावलं त्याच दिवशी पेवलीनं त्याला बजावलं होतं, 'या झाडाचं सारं काही तूच करायचं आहेस. पावसात ठीक, पण एरवी त्याला पाणी द्यावं लागेल. ते आणायचं काम तुलाच करायचं आहे. दिवसात चार चकरा माराव्या लागतील पाण्यासाठी.' त्याच्यासाठी तिनं एक मोठा भोपळा आतून कोरून दिला होता, पाणी आणण्यासाठी. रावजी सकाळी उठल्यावर पहिली फेरी करायचा. दुपारी पुन्हा दोन आणि संध्याकाळी एक. हे झाड जगणार आहे की नाही असल्या चिंता त्याला कधीही पडल्या नाहीत. वयाच्या मानानं घरापासून नदीपर्यंत चार चकरा, दिवसाकाठी, हे जरा अतीच होतं. पण पेवलीनं ती व्यवस्था तशीच ठेवली.

      रावजीचं गावाकडं लक्ष नसतं, घरातही नसतं, सांगेल तेवढंच तो शेताचं काम करतो हे पेवलीला ठाऊक होतं. पण तिनं त्याच्यावर भार टाकायचा नाही, असं ठरवलं. झाडं आणि त्यातच त्याला रमू दिलं. तिला ठाऊक होतं की या गावालाही एक वैदू लागणार आहे. रावजीला जर फुलं-फळं-झाडांची अशी माहिती झाली तर त्याचाही गावाला उपयोग होईलच.

 

 

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.