केतकरवहिनी - एक वेगळे आत्मचरित्र

चरित्रे कोणाची लिहावीत याचा सर्वमान्य दंडक असा नाही. चरित्र नायकाचे/नायिकेचे 'मोठेपण', लिहिणाऱ्याचे कौशल्य, प्रकाशकाचे आर्थिक पाठबळ या आणि अशा घटकांवर ते अवलंबून असते. तरीही, सामान्यपणे चरित्र नायकात/नायिकेत काहीतरी 'वेगळेपण' असावे लागते, अन्यथा ते चरित्र आले कधी आणि गेले कधी याचा थांगपत्ता लागत नाही.

या 'वेगळेपणाच्या' निकषावर पाहिले तर 'केतकरवहिनी' हे आत्मचरित्र बऱ्यापैकी उभे ठाकते.

मुंबई - नव्हे, मालाड (मालाड जेव्हा मुंबईच्या कितीच्या किती बाहेर होते त्या काळातली, साधारण १९२०-३० ची गोष्ट) मध्ये जन्मलेली आणि वाढलेली एका न्यायालय कारकुनाची मुलगी. अगदी न-कळत्या वयात वडील वारले. आता या मुलीचे लग्न लावून देणे ही मोठीच जबाबदारी. ती आईने तिच्या भावाच्या सहकार्याने पार पाडली. स्थळ मिळाले तेही अगदी वेगळेच. चिपळूणजवळच्या करंबवणे गावचे खोत असलेले केतकर.

लग्न करंबवण्यालाच करायचे अशी केतकरांची अट. त्यानुसार मंडळी करंबवण्यात थडकली. मुंबईतून त्या काळचे करंबवणे म्हणजे दोन ध्रुवाइतके अंतर. आजही कोंकणात आडबाजूला असलेल्या एखाद्या खेड्यात जायचे म्हणजे चांगलाच 'अनुभव' असतो. या वऱ्हाडी मंडळींना १९३८ साली तो अनुभव कसा वाटला हे प्रत्यक्षच वाचलेले बरे!

लग्न झाले. मुलगी सातवी तर मुलगा मॅट्रिक पास. आणि आपणहून रोजच्या कामाला लागणारे तंत्रज्ञान (कुंभारकाम, सुतारकाम, स्टोव्ह दुरुस्ती, शिवणकाम, डिझेल पंप दुरुस्ती, इ इ) आणि कायदे (शेतीसंबंधीचे) शिकलेला.

येथपर्यंत बऱ्याचशा नेहमीच्या वळणाने कथानक जाते. जेव्हा नणंदांचे वर्णन येते तेव्हा हळूच गाडी वेगळी वाट चोखाळू लागते. नणंदा दहा. सर्वांत मोठी १९०० साली जन्मलेली आणि सर्वात धाकटी १९१९ साली. मुलगी नऊ-दहा वर्षांची झाली की शिक्षणासाठी पुण्याला निघे. दहा किलोमीटर चालून चिपळूण. तिथून बैलगाडी करून कराड. तिथून रेल्वेने पुणे. आणि टांग्याने हिंगणे असा तीन दिवसांचा प्रवास.

तिथे सगळ्या मुलींनी (शेवटची सोडून) व्यवस्थित शिक्षणे केली.

'वसंत' मासिकाच्या दत्तप्रसन्न काटदरेंची पत्नी या भगिनींपैकी एक. ती त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी. दुसऱ्या एकीने फ्रान्स गाठले (१९२७ साली), दोन वर्षे फ्रेंच भाषा शिकून, परत येऊन मद्रासला स्थायिक झाली. तिसरी डॉक्टर (एम बी बी एस) झाली. इतरांनीही आपापल्या मगदुराप्रमाणे नाव केले.

ही सर्व वर्णने यथातथ्य करून झाली की तेवढ्याच निरपेक्षपणे केतकरवहिनी त्या घरात मुलींना एक न्याय आणि सुनेला दुसरा असल्याचेही नमूद करतात!

स्वातंत्र्य मिळाले. 'संरक्षित कूळकायदा' झाला.

हा कायदा केवळ कुळांच्या बाजूने नव्हता तर मालकालाही कायद्याने काही अधिकार दिले होते. सतत तीन वर्ष कुळाने खंड भरला नाही तर मालक जमिनीचा ताबा घेऊ शकत होता. एखादे कूळ निपुत्रिक मरण पावले तर मालक जमिनीचा ताबा घेऊ शकत होता. हा कायदा केवळ भातशेतीला लागू होता, सरसकट सगळ्या जमिनीला नाही.

याची माहिती नसलेल्या (किंबहुना या माहितीपासून मुद्दाम दूर ठेवलेल्या) कुळांना भडकवण्याचे उद्योग सुरू झाले. 'खंड कसला भरता? आता तुम्हीच मालक' अशी त्यांची समजूत करून देण्यात आली. मात्र कोर्टात उभे राहायची पाळी आली की मात्र हे पढविते धनी गायब होत. केस उभी राही. निकाल कुळांच्या विरुद्ध जाई.

मात्र 'सावकार' असलेल्या केतकरांची कुळांची समजूत काढावी अशी धारणा होती. केतकरवहिनींचे सासरे कुळांना सांगत, "मी जमिनींचा मालक असलो तरी मी त्या घड्या घालून पेटीत ठेवू शकणार नाही".

अशाच एका खटल्यात कुळांना चिथवले गेले, "अरे तो अण्णा (श्री केतकर) असेपर्यंत तुमच्या जमिनी अशाच लुटत राहणार. तुम्ही बसा असेच नामर्दांसारखे मुळूमुळू रडत" आणि केतकरांचा खून झाला!

दीड-दोन वर्ष खटला चालून सर्व आरोपी निर्दोष सुटले! याची कारणे पुस्तकात सविस्तर दिली आहेत. परंतु त्याबद्दल लिहिण्यात अर्थ नाही. ते कुणा अज्ञात माणसाची बाजू घेऊन दुसऱ्या अज्ञात माणसाविरुद्ध लिहिणे होईल.

या पुस्तकावर लिहावेसे वाटले याचे मुख्य कारण केतकरवहिनींचा त्यानंतरचा जीवनपट. सासऱ्यांनी त्यांना सांगितले, "कपाळावरचं कुंकू पुसायचं नाही. आमचा मुलगा गेलाय हे आम्हाला ठाऊक आहे; पण त्या डागण्या आम्हाला पदोपदी द्यायचं कारण नाही. अजून एक लक्षात ठेव. ज्यांना आपले अश्रू पाहून आनंद होईल त्यांच्यासमोर चुकूनही डोळ्यातून पाणी काढायचं नाही".

आणि त्याच वेळेला "मुली वेगळ्या आणि सून वेगळी" असेही अनुभव चालूच होते.

मुलगा गेल्यावर सासऱ्यांनी सत्तराव्या वर्षी खटले लढवणे सुरू केले. 

केतकरवहिनींना चार मुले. शिक्षणासाठी त्यांची सोय सात वर्षे पूर्ण होताच उज्जैन, ग्वाल्हेर, सागर आदी ठिकाणी नातेवाईकांकडे केलेली होती. सर्वात धाकटी मुलगी नऊ वर्षांचे होईस्तोवर घरी राहिली. बाहेर शिक्षणासाठी आश्रितासारखे राहणे म्हणजे येणारे अनुभव आलेच.

सर्व कारभार कोणाला तरी देऊन टाकावा या हेतूने काही बोलणी झाली. त्यातील गांधी स्मारक निधीच्या अप्पासाहेब पटवर्धनांची आठवण मजेदार!

वयोमानानुसार सासू-सासरे गेले आणि शिकलेल्या नणंदांनी घरातली सगळी रोख रक्कम दान करून टाकली. "तुमच्यामुळे आमचे वडील गेले" असा त्रागा करून गावातल्या माणसांना दुखावले. आणि "जमीन आहे, घर आहे, आता तुझे तू पाहा" असे सांगून प्रस्थान ठेवले.

येथपर्यंत निम्मे पुस्तक झाले. पुढचे निम्मे पुस्तक या सातवी पास बाईने तिथे कसे दिवस काढले, मुलांची शिक्षणे बाहेरगावी ठेवून कशी केली, जमिनीचे खटले कसे चालू ठेवले, सोबतीला म्हणून ठेवलेल्या निरनिराळ्या स्त्रियांचे कसेकसे अनुभव घेतले, दहा हातावरून बिबट्याचे दर्शन कसे घेतले, एकटी स्त्री या बिरुदामुळे येणारे पुरुषांचे अपरिहार्य अनुभव कसे आले, आदी गोष्टींचे सरळसोट वर्णन.

कोंकणात ज्यांनी बरेच आयुष्य घालवले आहे, विशेषतः मध्य कोंकणात (रत्नागिरी जिल्ह्यात) अशा लोकांना यातील वर्णने अगदीच ओळखीची वाटतील. खास करून गावातल्या माणसांची मनोवृत्ती दर्शवणारी, घरातल्या माणसांचे पिळे दाखवणारी.

आता या बाईंचे आडनाव केतकर, त्यांनी शेवटी विश्व हिंदू परिषदेला आपली जागा दिली या गोष्टींमुळे जर कुणाचा पापड मोडणार असेल तर त्यांनी हे पुस्तक हातात धरायचे कष्ट करू नयेत हे बरे. पण शेवटी, कायदा त्याच्या जागी आहे. माणूस म्हणून जगताना आलेले अनुभव आपल्या जागी आहेत. ही माणसे कुठल्यातरी विचारसरणीची आहेत. ती कुठल्या विचारसरणीची आहेत त्यावरून त्यांचे माणूसपण खरे वा खोटे ठरवणे ज्यांना योग्य वाटत नाही अशा वाचकांना हे पुस्तक नेहमीच्या पठडीपासून वेगळे म्हणून वाचावेसे वाटेल.

या पुस्तकाचा उल्लेख आत्तापर्यंत 'आत्मचरित्र' म्हणून केला खरा, पण हे रूढ अर्थाने 'आत्म'चरित्र नाही. वर्णन जरी प्रथम पुरुषी (या बाबतीन प्रथम स्त्री म्हणावे का?) असले तरी त्याचे लिखाण उमा विरूपाक्ष कुलकर्णी या आपल्याला कन्नड साहित्याच्या अनुवादक म्हणून माहीत असलेल्या लेखिकेचे आहे. मात्र त्यांचा 'हात' त्यात कुठेच जाणवत नाही हेच लेखिकेचे वैशिष्ट्य.

शेवटी, या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल - एवढे देखणे मुखपृष्ठ एवढ्यात बघितले नव्हते! चंद्रमोहन कुलकर्णीं यांचा सिद्धहस्तस्पर्श जाणवतो.

प्रकाशक - मेहता प्रकाशन

प्रथमावृत्ती - फेब्रुआरी २००६