तो दोन मार्चचा दिवस होता व सकाळी माझी मुलगी दुचाकीवर जात असताना डेक्कन जिमखाना येथे एस.टी. बसने तिला ठोकरले. धडक झाल्याबरोबर गाडी एकीकडे व ती एकीकडे पडली. तिला पटकन उठता येईना, तेव्हा लक्षात आले की तिच्या मांडीचे हाड मोडून फ्रॅक्चर झाले आहे. सभोवती जमलेल्या लोकांपैकी काहींनी तिची गाडी बाजूला उभी करून ठेवली व काहींनी तिला उचलून रस्त्याच्या कडेला बसवले. तिच्या कपाळावर झालेल्या जखमेतून रक्त वाहात होते, परंतु ती शुद्धीवर असल्याने तिने तिचा मोबाईल एकाकडे दिला व घरी फोन करायला सांगितला. दरम्यान काही लोकांनी रिक्षा थांबवून मुलीला त्यात घातले व बरोबर एक बाई बसल्या. रिक्षावाल्याने प्रसंगावधान राखून तिला संचेती हॉस्पिटलमध्ये नेले. ज्याच्याकडे तिने मोबाईल दिला होता तो तरुणदेखील मोटरसायकलवरून हॉस्पिटलला पोचला. वाटते त्याने आमच्या घरी फोन करून थेट हॉस्पिटलला यायला सांगितले होते. हे सगळे होताना काही लोकांनी एस.टी.चा नंबर कागदावर लिहून त्या बाईंच्या हातात कोंबला होता तर कोणी पोलिस चौकीवर जाऊन तो नंबर सांगितला. पोलिसांनी कंट्रोलरूमद्वारे सतर्कतेचा आदेश देऊन येरवडा येथे एस.टी पकडली. आम्ही हॉस्पिटलला पोहोचायच्या आत मुलीच्या कपाळावरील जखम पुसून टाके घातले होते व तिला एक्सरेसाठी नेत होते.
अपघाताजागी असलेल्या माणसांनी बहुमोल मदत केल्यामुळे तिला विनाविलंब वैद्यकीय उपचार मिळाले. रिक्षावाले लहू चव्हाण, रिक्षात सोबत गेलेल्या उज्ज्वला गांधी (रा. कसबा पेठ) व त्यांच्या मदतीसाठी मागून मोटरसायकलवर गेलेला तरुण राहूल बिनीवाले यांचे जाहीर आभार मानावे लागतील. संचेती इस्पितळातदेखील आपघात वा पोलिसी कारवाईचा बाऊ न करता त्यांनी तातडीने उपचार सुरू केले. अपघात घडला तेथील नारळवाले भाऊसाहेब ढमाले यांनी मागे असलेल्या चौकीत खबर दिल्याबरोबर पोलिसांनी कंट्रोलरूमद्वारे सतर्कतेचा आदेश दिला. सकाळची गडबडीची वेळ असूनदेखील सर्वांनी केलेल्या मदतीमुळे आज माझी मुलगी बरी होऊन परीक्षा देऊ शकली.
बऱ्याच वेळा अपघात दिसला की नको त्या फंदात पडायला म्हणून आपण इच्छा असूनदेखील माघार घेतो. आजच्या धावपळीच्या जमान्यात अशी मदत करणारे खरोखर कौतुकास पात्र आहेत. वरील घटनेवरून आपण सर्वांनी अशा कठीणप्रसंगी मदत करण्याचा बोध घ्यावा.
- जयंत जेस्ते