झणझणीत अंडाकरी ..

  • अंडी - ४, धणे - जिरे- १/१ चमचा प्रत्येकी
  • कांदे-२ मध्यम आकाराचे , टोमॅटो - १ मध्यम आकराचा
  • गरम मसाला पावडर- २ चमचे, लाल सुक्या मिरच्या- ४/५
  • काळे मिरे - ८-१०, दालचिनी- १/२" चे ३-४ तुकडे, मीठ, हळद.
  • आलं-लसूण पेस्ट- २ चमचे, तेल - थोडे जास्त, कढिपत्ता.
  • सुके खोबरे किसलेले १/२ वाटी, तीळ -पाव वाटी, कोथिंबीर.
४५ मिनिटे
२ जणांसाठी

अंडी उकडून घ्यावीत.

मसाला :

१. साधारण १ १/२ कांदा मोठा चिरून तो थोड्या तेलात लाल होईपर्यंत परतून घ्यावा. बाजूला काढून ठेवावा.

२. सुके खोबरे, तिळ, धणे, जिरे हे ही तेलावर चांगले परतून घ्यावे. परतताना तिळ आणि सुके खोबरे करपणार नाही याची काळजी घ्यावी. झाल्यावर हे ही बाजूला काढून ठेवावे.

३. आता यात आणखी थोडे तेल घालून लाल मिरच्या परतून घ्याव्यात.

४. मिक्समध्ये प्रथम परतलेला कांदा वाटून घ्यावा. तो बाजूला काढून खोबरे, तिळ, धणे-जिरे, लाल मिरच्या थोडे पाणी घालून वाटून घ्याव्यात. हे मिश्रण बाजूला काढून आता नुस्ता टोमॅटो वाटून घ्यावा.

आता कढईमध्ये, तेल घालून त्यावर उकडलेली अंडी शॅलो फ्राय करून बाजूला काढून ठेवावीत.

आता याच तेलात, जिरे, काळे मिरे, दालचीनी, आलं-लसूण पेस्ट घालून परतावी. यात उरलेला कांदा बारिक चिरून घालावा. हळद घालावी. वाटलेला सगळा मसाला यात घालावा. थोडे पाणी घालावे.

मसाल्यास तेल सुटू लागले की गरम मसाला पावडर घालावी. चवीनुसार मीठ घालावे. ग्रेव्ही दाटच ठेवावी. उकळी आली की, तळलेली अंडी अख्खी त्यात घालावीत. (अख्खी आवडत नसल्यास चिरून घालवित.) आणि ५ मिनिटे मंद ज्योतीवर वाफ येऊ द्यावी.

वाढताना वरून कोथिंबीर घालावी.

काही लोकाना अंडी तळलेली नाही आवडत. पण ती शॅलोफ्राय केल्यावर त्याची चव एकदम भन्नाट येते.. मला आवडते. पोळी, फुलके आणि या पेक्षाही ज्वारीच्या वा तांदळाच्या भाकरीबरोबर सह्ह्ही लागते.

तिखटाचे प्रमाण लाल मिरच्यांच्या तिखटपणावर अवलंबून ठेवावे.

खाताना वरून लिंबू पिळून घ्यावे.

मैत्रिण