कचरा कोंडी

नमस्कार,

"अशिक्षित लोकांना समज आहे याची, आता शिक्षित लोकांनी समज दाखवावी" - संगमनेरच्या एका महिला कामगारांनी ताडकन थोबाडात लगावली (शाब्दिक)!

'कचरा कोंडी' या अतुल पेठे दिग्दर्शित माहिती पटाच्या, पहिल्या प्रदर्शनाच्या वेळी हा प्रसंग घडला.

एका उघड्या गटारातून (man hole म्हणतात ना - ते), अत्यंत घाणेरडे पाणी वाहते आहे. गटार म्हटल्यावर घाण असणारच. विष्ठा, सडलेला कचरा या गोष्टी व्यवस्थित दिसत आहेत. साधारण ३०-४० से. हे दृश्य दिसल्यावर, त्या गटारातून एक माणूस, उघडाच, उभा राहतो आणि आतला एक मोठा दगड बाहेर ठेवतो. परत आत बुडी मरतो.

एका गटाराचा मोठा (६-७ फूट आडवा) खड्डा भाग आहे. या खड्ड्यात मानवी विष्ठा जमा होते आणि पुढे जाते. साधारण १६-१७ वर्षाचा एक मुलगा गळ्यापर्यंत बुडून कुठलातरी अडथळा काढण्याचा प्रयत्न करतो आहे.

... हे प्रसंग चित्रित केले आहेत या माहितीपटात.

कचरा जमा करणारे, गटार साफ करणारे, रस्ता झाडणारे, सार्वजनिक शौचालय साफ करणारे या सगळ्यांचे प्रश्न हे आपल्या स्वच्छतेने तयार केलेले आहेत. आपल्या घरातला कचरा, आपल्या शरीरातली घाण या लोकांचे आरोग्य ठरवते!

हे तर स्वाभाविक आहे की ही माणसं 'सफाई कामगार' असल्याने स्वच्छतेशी निगडित प्रश्न त्यांच्या समोर आ वासून उभे आहेत. पण या प्रश्नांची तीव्रता एवढी आहे की 'गँगरीन होणे' ही पहिली-दुसरी पायरी आहे!

ही सगळी यंत्रणा काय आहे ते पाहू:

पुण्याची लोकसंख्या - ३५ लाख, स्वच्छता कामगार - २७७४

सकाळी ५:३० पासून रस्ता झाडणे, मनुष्य आणि मनुष्येतर प्राण्यांच्या विष्ठा गोळा करणे, कोरडा आणि ओला कचरा वेगळा करणे अशी कामं चालू होतात. कचरा गोळा करण्यासाठी छोट्या हातगाड्यांपासून मोठ्या  Dumpers पर्यंत सगळ्या प्रकारच्या गाड्या वापरल्या जातात. स्वच्छता कामगार, कचरा गोळा करण्यासाठी हात, झाडू आणि फावडे अशा ३ प्रकारच्या साधनांचा वापर करतात. शहरातून आणलेला सगळा कचरा वेगवेगळ्या कचरा डेपोंमध्ये आणण्यात येतो (पुण्यातल्या लोकांनी कोथरूडचा कचरा डेपो डोळ्यांसमोर आणू नये. तो फारच लहान आहे. हडपसर येथील डेपो त्यामानाने ठीक आहे तुलनेसाठी).

कचरा डेपो ची प्रत्यक्ष परिस्थिती विषण्ण करणारी आहे. दूरवर पसरलेला कचराच कचरा, त्यांत उपयोगाच्या गोष्टी शोधणारी कायम अथवा कंत्राटी माणसं आणि त्याच ढिगांवर खेळणारी त्यांची लहान मुलं ('एका ठराविक परिस्थितीत असणाऱ्या मुलांचं शिक्षण' हा एक वेगळा प्रश्न आहेच).

रबरी हातमोजे, २ लाईफ बॉय साबण, तोंडाला एक फडकं, एक गणवेश एवढं साहित्य दर महिन्याला शासनाकडून मिळतं - हा झाला लेखी कारभार. मुळात या सामानाची गुणवत्ता काय? - रबरी हातमोजे ३ ऱ्या दिवशी फाटतात. फडकं वापरून गटारातल्या पाण्यापासून संरक्षण मिळत नाही. त्याहून पुढची गोष्ट ही की हे सामान खरंच मिळतं का?

नोकरी कायम असणाऱ्या सफाई कामगारांना काही 'शे' रुपये औषध भत्ता मिळतो. यात त्यांनी 'रक्तदाब', 'दमा', 'हृदयरोग', 'त्वचेचे विकार' अशा रोगांवर उपचार करणे अपेक्षित आहे. साधारण रु. ४५००/- मध्ये आपली आणि घरच्यांची स्वच्छता, घराचे खर्च आणि इतर अशा अनेक गोष्टी चालवाव्या लागतात. कंत्राटी कामगारांची परिस्थिती अजूनच वेगळी - २५०० रु. पगार, कोणताही भत्ता नाही, कोणतीही साधनं नाहीत, १६ तासांपेक्षाही जास्त वेळ कचरा गोळा करणे, निचरा करणे ही कामं.

पूर्वी भंगी काम करणारे लोक होते. कंबरेला झाडू आणि गळ्यात मडकं अशा अवतारात या लोकांना फिरावं लागायचं. आता? 'भंगी' नावाचा माणूस तर नाही आहे पण रूप तसंच आहे थोडंफार. या लोकांना माणुसकीने वागवलं जात नाही. आपल्या वसाहतीमध्ये जी माणसं सकाळी येतात, त्यांच्याशी एकही शब्द आपण बोलत नाही. "तुम्ही घरी जाऊन काय करता हो?" असा एकच प्रश्न विचारला तर आपल्या व्यथा सांगायला तिला/त्याला वेळ पुरणार नाही. रोज सकाळी उठून विष्ठा, सडलेले प्राणी, गटारातली घाण साफ करणारी ही माणसं - जेवताना त्यांना डोळ्यांपुढे काय दिसत असेल?  शारीरिक गरजा पूर्ण करताना आपल्या अंगाला घाणेरडा वास आहे याची आठवणही होत असेल बहुधा.

स्त्रियांना लज्जास्पद अशा अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. फक्त पुरुषांसाठी असणाऱ्या शौचालयात जाऊन साफ सफाई करणे, रोज खाली वाकून रस्ता झाडणे आणि सोबतच आपल्याकडे कोणी बघत तर नाही ना याची चिंता करणे, अशा अनेक अडचणी असतात.

आपण काय करू शकतो?:

१. माहिती अधिकार कायद्याचा वापर करून, या सफाई सैनिकांना दिली जाणारी साधनं पुरेशी आहेत का, त्यांची गुणवत्ता कशी आहे याची चौकशी करणे.

२. आपल्या आसपास येणाऱ्या अशा लोकांची विचारपूस करून त्यांना मनोबल देणे. हा भाग जेवढा छोटा वाटतो ना, तेवढा तो नाही आहे. एकच प्रश्न त्यांच्या चौकशीसाठी पुरेसा आहे. माणसं आमच्याशी बोलत नाहीत हीच त्यांची विवंचना आहे.

३. कंत्राटी कामगारांना (ज्यांना असंघटीत कामगार असेही म्हणतात) एकत्र आणणे.

४. सफाई सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रबोधन आणि सक्रिय मदत करणे.

याशिवाय इतर अनेक उपाय आहेत. यातील ३रे काम हे संघटनाचे आहे. पण उरलेली ३ कामं सहज शक्य आहेत. खूप साऱ्या लोकांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत याचिका दाखल केल्या ना, तर या सगळ्या अंधाधुंद कारभारात फरक सहज पडेल. संघटना करणे किंवा आहेत त्या संघटनांना मदत करणे खरं तर सहज शक्य आहे.

हा विषय खरं तर फार व्यापक आहे. या लोकांच्या व्यथा 'कचरा कोंडी' या माहितीपटात अत्यंत पोटतिडकीने मांडल्या आहेत. या विषयाबद्दल माहिती/शंकांना उत्तरे हवी असल्यास मला अवश्य संपर्क साधा आणि माहितीपट उपलब्ध असल्यास अवश्य हा पाहा.

... अमितराज देशमुख (९८५०१४१६७१)