वर्तमानपत्राचा अग्रलेख आणि थोड्याफार ओघाने येणाऱ्या बातम्या वगळताआजकाल उरलेले सर्व माध्यमाने फुलवलेले लेखन वाचायला मिळते. शेवटी आपली दहा पाने लोकांनी खरेदी करून वाचायला हवी म्हटले की मागणी तसा पुरवठा हे आलेच. आजकाल प्रत्येकाने आपली पुरवणी रोजच जोडायला सुरुवात केली आहे. देशातल्या तमाम निवृत्त आणि वेळ कसा घालवावा असा प्रश्न असणाऱ्या मंडळींना दूरदर्शन नंतर अजूनही वर्तमानपत्र आपलेसे वाटते. डायपरच्या वाढत्या आक्रमणाने शहरी भागात वर्तमानपत्राचे महत्त्व थोडे कमी केले असले तरी अजूनही वाढत्या लोकसंख्येत चिल्लूपिल्लूंच्या महत्त्वाच्या कामासाठी वर्तमानपत्राला देशभरात योग्य असा पर्याय नाही.
एक पुरवणी अन्नपूर्णेकरता, एक आजीआजोबांकरता आणि दोन तीन तरूणाईकरता की झाले! पण मग एक देशभरातील बेकारांकरता सुद्धा हवीच. जरा वैचारिक खाद्य हवे असणाऱ्यांकरता अर्थव्यवस्था, शेतीविकास, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण असे मार्मिक शब्द घालून तयार केलेल्या पुरवण्या सुद्धा आल्याच. यासर्वातून वर्तमानपत्रात मराठी स्तंभलेखन होणे हे गृहितच धरले आहे. विविध समस्या, राजकारण, खेळ आणि चित्रपट हे त्याकरता आजीवन कच्चा मालाचा पुरवठा करणारे कंत्राटदार. वैचारिक साहित्याच्या डोसाने हलक्याफुलक्या स्तंभलेखांवर कधी कुरघोडी करू नये एवढा साधा नियम फक्त लक्षात ठेऊन ह्या पुरवण्या भरायच्या असतात हे कळायला कोण्या तज्ज्ञाची गरज नाही.
यशस्वी पत्रकार, संपादक आणि उपसंपादकांनंतर दैनिकात असे स्तंभलेखन करणारे असतात ते प्रथितयश म्हणून नावाजलेले साहित्यिक , खेळाडू, चित्रपटसितारे आणि असेच तमाम यशस्वी म्हणून गणना झालेले सर्व क्षेत्रातील लोक. पत्रकार आणि संपादकीय चमूला वगळून उरलेल्या प्रथितथश गटाकडे पाहू. त्यातील साहित्यिकांकडे या लेखाचा रोख अधिक आहे. एक काळ असा होता की अशा लोकांच्या लेखनामुळे पुरवणी वाचण्याऱ्यांची संख्या जास्त होती. उदाहरणादाखल प्रवीण दवणे, महाबळ, मंगला गोडबोले यांची नावे पहा. सुनील गावस्करने समीक्षा सुरु केली तेव्हा त्याचा दर्जा किती चांगला होता. पण रोज होणारे सामने, दहा वर्तमानपत्रे आणि लिहिणारे तेवढेच. ..आज त्याचे व्यावसायिक रूप पाहिले तर असे वाटते की जसे जसे पुरवण्यांचे प्रमाण वाढले तसे लेखनाचे दर्जा खालावला . वाढत्या मागणीला दर्जेदार पुरवठा शक्य नाही का? आता तर यशस्वी नाव पाहून वाचक एखादा स्तंभ वाचायला सुरुवात करतात आणि पदरात निराशा येते. अशा प्रकारचे केलेले किमान अर्धे लेखन तरी उगीच मिळालेला चौकोन भरण्यासाठी केले आहे असे वाटते. कित्येकदा आपली स्वतःची मते लोकांना वाचायला भाग पाडण्यास या स्तंभलेखनाचा वापर होतो असे आढळते. आता ललित लेखन आणि स्फुटलेखन म्हणजे असा एक टोकाचा दृष्टीकोन सुद्धा येणारच.. याचा फायदा आणि तोटा दोन्ही आहे.
या साहित्यिकांची गणना कित्येकांच्या आदर्शात होते . अशा आदर्शांकडून लोकशिक्षण सहज शक्य आहे. पण तीच मंडळी अशा स्तंभांचा वापर टिंगल करण्यासाठी करतात. लोकांना फक्त दहा मिनिटांचे मनोरंजन म्हणून त्याकरता हकलेफुलके देण्याचा त्याचा मानस असतो. विनोदाने लोकशिक्षण होते त्याला जमान उलटलाय. विनोदाची ही बाजू आता किती जणांना समजते तेच शोधायला हवे. विनोदी साहित्यातली बोच कमी झाली आहे आणि त्याचबरोबर उपहास समजण्याची कुवतही. वर वर वाचायच आणि दात विचकून मोकळ व्हायच. लोकांच्या या निवडीला जोखून इतरांची लफडी, खिल्ली उडवणे, आपले वेगळेपण सिद्ध करणे किंवा आपल्या दु:खाचा नगारा पिटणे एवढेच काम या स्तंभातून आणि लिहिणाऱ्यांकडून होते. ते एक वेळ बरोबर आहे असे मान्य केले तरी मराठमोळ्या दैनिकात मराठमोळ्या स्तंभलेखकाला मराठी विषय सापडू नये हे दूर्दैव म्हणायला हवे. संकुचितपणा नसावा पण दर वेळी मराठी माणसाला मी जगाबरोबर चालतोय, पाश्चिमात्यांच्या बरोबरीने साहित्यिक आणि एकंदरीतच जगात प्रगतीशील आहे हे दाखवण्याचा जो न्यूनगंड आहे त्याचे स्तंभलेखनावर अनिष्ट परिणाम झाले आहेत. विषयांचा आवाका वाढवण्याकरता धडपड एकीकडे सुदु आहे तर दुसरीकडे नकळत तोचतोच पणा येतो आहे.
ज्या गोष्टी कितीतरी वेळा बॉलीवूड, हॉलीवूडला वाहिलेल्या मासिकातून, दैनिकातून आणि दैनिकाच्या त्याच पुरवणीत नित्यनेमाने राखीव ठिकाणी चघळल्या जातात त्यांनाच पुन्हा मराठी स्तंभलेखनात का जागा मिळावी? अमेरिकेच्या एका कोपऱ्यात, कोण्या अब्जाधिशाच्या लेकीला महिन्याची शिक्षा झाली ते समजले अथवा न समजले याने मराठी माणसाचे काय बिघडणार आहे? पण तसे नसावे . 'रोज वितभर तुकड्याचा पोशाख करणारी ती बाला तुरूंगात खास 'डिजायनर अंगभर कपडे' घालेल का आणि त्याचा परिणाम काय?' हे आज मराठी माणसाला अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याने आमची सर्व दरिद्री जनाता अंगभर कपड्यात फिरू लागणार आहे का? मला तर हे असे लेखन वाचले की आपल्या मुलीबाळी घसरणारी जिन्स आणि ओघळणारी चोळी घालतात त्याचे सर्मथन आहे; तेही प्रतिष्ठितांकडून असे वाटते. 'जाता येता आम्ही अनेक स्त्रियांना धक्के देतो, घाणेरडे स्पर्श करतो, खर मुका घ्यावासा आम्हालाही वाटतो; पण तो रिचर्ड गेर बाजी मारून गेला.. अशी हळहळ तर या आणि अशाप्रकारच्या लेखांतून दिसत नाही ना? शेवटी समानता, पुढारलेपण, स्पर्धा आणि स्त्रीमुक्तीच्या नावावर आज बऱ्याच गोष्टी छोटेमोठे साहित्यिक आणि कलाकार विकतात आणि विकत घेतले जातात. स्तंभलेखनात आढळणाऱ्या अशा प्रवृत्तीचे समर्थन शहरात, देशाच्या कानाकोपऱ्यातच नाही तर परदेशात स्थिरावलेल्या मराठीचा वारसा जपणाऱ्यांकडूनही होते.
परदेशातली मंडळी आणि युवा पिढीचे माहितीजालपडीक हे या प्रथितयश स्तंभलेखकांना आणि इतरच दैनिकातील मराठीपुरवण्यांच्या उदोउदोला कारणीभूत आहे यात शंका नाही. लाभलेल्या पगारी वेळेचा आणि मराठीविना तडफडणाऱ्या मातृभाषेच्या तहानेला याहून अधिक चांगला पर्याय कसा मिळणार? आणि तोही फुकट !विलासरावांच्या पन्नास लाखांनी अमेरिकेतील श्रीमंत मराठी मंडळी अधिक श्रीमंत होतील का? त्याने तमाम स्तंभलेखनाला देशापरदेशात खाद्य पुरवले आहे यात मात्र शंका नाही. चुकले कोण? यात विलासरावांपेक्षा बीएमएम चे फेटे सुटणार आहेत ते मात्र नक्की.. शेवटी राजकारण्यांपुढे मिंधेपणा घेणे हे आमच्या रक्तातच आहे आणि आपल्या कृतीचे समर्थन करणारे तरबेज राजकारणीही आम्हाला लाभले आहेत.
हौस, व्यावसायिक प्रवेश , आणि त्यातून मिळणारी प्रसिद्धीची गरज अशा कोणत्याही छंदाच्या पायऱ्या आहेत. आज हौशी म्हणून जाळ्यावर लिहिणारे उद्याचे साहित्यिकही असतील. जाळ्यावरील लेखनाकडे मराठीची तळमळ, दर्जेदार साहित्याची निवड आणि उद्याचे संदर्भ म्हणून जर बघण्याचा विचार आहे तर खरच आपल्याला यातील लेखनातून काय हव आहे त्याच सिंहावलोकन प्रत्येकाने करायला हव. मनोगतासारखी मराठी संकेतस्थळे, अनुदिन्या या मराठी भाषेच्या प्रेमातून आकारास येतात. तरूण पिढीचा अधिकाधिक समावेश असणारे, जाणतेपणाची झलक देणारे, विविध विषयांवरचे लेखन इथे अधिक दिसते का ? वास्तवाचा आढावा इथे दिसतो का ? की दिसते ते निव्वळ कोवळे स्वप्नरंजन आणि टिंगलटवाळी? येथे दिसणारे लेखन एखाद्या स्तंभलेखनासारखेच आहे. त्याची जागा आणि साद फक्त जालावर मर्यादीत आहे असे नाही. त्याचा वाढता उल्लेख आता इतर प्रसार माध्यमाकडूनही होतो आहे. वाचकांची आवडनिवड जालावर होणाऱ्या लेखनातून समजायला वेळ लागत नाही, म्हणूनच काय लिहायचे आणि कसा प्रतिसाद द्यायचा त्याची निवड प्रत्येकाने विचारपूर्वक करायला नको का? अन्यथा खालावणारे स्तंभलेखन आणि पाट्या टाकल्यागत भरली जाणारी संकेतस्थळे यात फरक उरणार नाही!