इथे बोकाळला मृत्यू ... थक्क करणारी हकीगत

नाही नाही. शीर्षक वाचून घाबरू नका लोकहो.

मृत्यूने थैमान घातले आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही. मला सांगायचे आहे की एका बोक्याला माणसांच्या मृत्यूची हमखास चाहूल लागते. हा बोका रूग्णाजवळ आला की काही वेळाने मृत्यूही त्याला जवळ करणार असे लोक समजून चुकतात अशी बातमी सर्वत्र आहे.

Oscar the cat, who resides at the Steere House Nursing and Rehabilitation Center in Providence, has an uncanny ability to sense when a patient is about to die.ह्या बोक्याचे नाव ऑस्कर. अमेरिकेत ऱ्होड आयलंड मध्ये एका संगोपन आणि पुनर्वसन केंद्रात हा बोका पाळलेला आहे. बाकी चार चौघा (अमेरिकेतल्या!) बोक्यांसारखाच तो बोका आहे. रूग्णांच्या रिपोर्टांच्या गठ्ठ्यावर, परिचारिकांच्या टेबलावर किंवा कपड्यांच्या कपाटात डुलक्य घेणे हे त्याचे काम अव्याहत चालूच असते. मात्र जागा असताना त्याची 'तपासणीची फेरी' चालू होते.

बाकी तो सहसा कुणा रूग्णाच्या नादी लागत नाही किंवा चिकटायलाही येत नाही; मात्र रूग्णाचा मृत्यू तासा दोन तासांवर आला आहे असे त्याला 'वाटले' की तो त्याच्या अंथरुणात शिरतो. रूग्णाला बिलगतो.

ऑस्कर दोन वर्षांचा आहे. आजवर त्याने ह्या संगोपन केंद्रातल्या तिसऱ्या मजल्यावर २५ मृत्यू येण्यापूर्वी असे अचूक ओळखलेले आहेत. आता तर असे झाले आहे की ऑस्कर जर एखाद्या रूग्णाच्या अंथरुणात पहुडलेला दिसला तर रूग्णालयाचे कर्मचारी 'ओळखायचे ते' ओळखतात आणि नातेवाइकांना, धर्मगुरूंना बोलावून घेतात.

एका आजीबाईंच्या कुशीत ऑस्कर पहुडलेला पाहून त्यांचा नातू आईला म्हणाला, "आजीच्या कुशीत मनिमाऊ काय करतेय?"

"आजीला बाप्पाकडे जायला मदत करतंय ते", त्याची आई अश्रू आवरत म्हणाली.

तासा दोन तासात रूग्णाला मृत्यू येणार आहे असे ऑस्करला 'वाटत नसेल' तर मात्र तो त्याच्या नादी लागत नाही; मग रूग्णाची अवस्था कितीही वाईट असो. काही नातेवाइकांना हा मृत्यूची चाहूल देणारा बोका तेथे नको असे वाटते. अशावेळी तिथून ऑस्करला शुक शुक करून घालवून खोलीत बंद करून ठेवले तर ते त्याला बिलकुल पसंत पडत नाही. तो दारावर घासत किंवा अस्वस्थपणे येरझारा घालत निषेध व्यक्त करीत राहतो.

मृत्यूच्या अगोदर अचूक त्या जागी पोहोचणाऱ्या ह्या बोक्याविषयी मी ऐकले तेव्हा मलाही कुतुहल वाटले, म्हणून मी वाचून पाहिले. तुम्हीही पाहा. ऑस्कर बोक्याच्या जीवनातला एक दिवस हे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मधले पान किंवा मार्जारबुद्धी हे बोस्टन ग्लोब मधले पान पाहा. चित्र बोस्टन ग्लोबमधले आहे.