भारतात स्थलांतराची तयारी करायला लागलो, तेव्हाच खरंतर कुत्रा पाळण्याचं मिनी-ऍडवेंचर माझ्या आणि बायकोच्या मनात उचल खाऊ लागलं होतं. पण स्थलांतरानंतरच्या पहिल्या तीनचार महिन्यात मुक्ताची मानसिक स्थिती इतकी नाजुक झाली, की (मुक्ताच्या सुदैवाने म्हणा वा दुर्दैवाने) एक थेरपी/विरंगुळा म्हणून पिलू आणायची घाई करावी असा विचार डोकावू लागला.
तरी माझ्यापुरतं म्हणाल, तर "सोळा" वर्षांवरून "या" वर्षावर येण्याची माझी तयारी होती, पण "या" वर्षावरून "आता" वर यायला मात्र मी मुळीच तयार नव्हतो. स्थलांतरानंतर आमचीच आयुष्यं आधी रुळावर यायची होती, त्यात ही नवी भर मला तरी नको होती. आमच्या दोघांतला टिळक-आगरकर वाद आठवडाभर रंगला ... आणि शेवटी त्यात जहाल पक्षाचा जय झाला.
पाळीव प्राण्यांचा पूर्वानुभव शून्य होता. नाही म्हणायला मागे एक बेटाफिश पाळला होता - मुक्ताच्या दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी. पण दीडेक वर्षात त्याने सत्तरी गाठली, आणि त्याची जराजर्जर अवस्था न पाहवून गूगलने सांगितल्याप्रमाणे त्याला कमीत कमी क्लेश होतील असं (इच्छा?)मरण द्यायला लागलं. आता कधी "स्विमी"चा विषय निघाला, की त्याच्या फिशबोल मधल्या आयुष्यापेक्षा बर्फाच्छादित तळ्यातला त्याचा इंस्टंट शेवटच आधी आठवतो (त्या दीड वर्ष - दीड इंचाचं "एक्स्ट्रापोलेशन" पुढेमागे अत्यंत क्लेशकारक ठरणार आहे, याचीही कायम जाणीव असते. पण ते असो).
"कुत्रा = लॅब (लॅब्रेडॉर)" हे समिकरण आमच्या तिघांच्याही मनात तयार झालं होतं. बहुतेक त्याला कारण म्हणजे आमच्या घरासमोरचं "D.I.N.K." अमेरिकन युगुल. एका शनिवारी सकाळी अचानक त्यांच्या बरोबर नव्या लीश आणि कॉलर मधलं लॅबचं पिलू लुटुलुटु चालताना दिसलं होतं, आणि एरवी बुजणारी मुक्ता आपणहून रस्ता ओलांडून पिलाचं नाव विचारून आली होती. मग कधीतरी त्यांची फिरायची वेळ आणि आमच्यातल्या एकाची खिडकीत यायची वेळ जुळे, आणि आम्ही इतर दोघांना बोलावून खिडकीतून डोकडोकावून त्या पिलाला न्याहाळत बसू. आम्ही तिथून निघेपर्यंत ते पिलू ताडताड वाढून केव्हाच "बाप्या" झालं होतं.
खोटं वाटेल, पण मुलीसाठी पिलाचा आग्रह धरणाऱ्या बायकोला स्वत:ला कुत्र्यांची चांगलीच भीती वाटे. कधी फिरायला गेल्यावर दुरून एखादा कुत्रा दिसला, की ती लांबूनच ओरडून त्याच्या मालकाला बजावे, "होल्ड युवर डॉग!!". "डोंट वरी मॅम, शी डजंट बाइट", तो बिचारा समजावे ... त्यावर ती काकुळतीने आणि निर्वाणीने पुन्हा ओरडे "आय डोंट केअर. यू होल्ड इट!" - मग मी आणि मुक्ता तिची थट्टा करत असू.
इथे मुक्ताला न सांगता आमच्या चवकशा सुरू झाल्या. मुक्ता शाळेत गेली, की सकाळ/एक्स्प्रेस मधल्या क्लासिफाइड्स वाचून बायको फोन करी, आणि आधी मुळात माहिती जमवे. सगळ्या ब्रीडर्स चे सल्ले जुळले: "लॅबच घ्यायचा असेल तर कुत्री घ्या. कुत्रा माजावर आला, की डोळा चुकवून कधी बाहेर पडेल ते सांगता यायचं नाही. आणि एकंदरीतच त्याची एनर्जी लेवल तुमच्यासारख्या पहिलटकरांना महाग पडेल." खरं खोटं देव जाणे, पण तो सल्ला आम्ही शिरोधार्य मानला (पण त्याआधी "फ्लॅटमध्ये राहत असाल, मोकळी जागा नसेल, तर लॅब सारख्या मोठ्या जातींचा विचार करू नका" हा गूगलचा सल्ला मात्र आम्ही केव्हाच साभार परत केला होता.)
शेवटी घराजवळच एका कुटुंबात लॅबची आठ पिलं विकायला आहेत असं समजलं, आणि मुक्ता शाळेतून आल्यावर आम्ही बातमी फोडली. एखाद्या सास-बहू मालिकेत शोभेल इतक्या टचकन मुक्ताच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, तिने दोघांना कडकडून मिठ्या मारल्या, आणि पाठोपाठ एखाद्या कार्टून मालिकेत शोभावं तशा किंकाळ्या फोडत ती घरभर उड्या मारायला लागली.
तिचा गणवेषही न बदलता, पिलं पाहायला आम्ही निघालो.
(क्रमश:)