मध्यमवयीन मोडकबाईंनी (नाव बदललेलं) दार उघडून आमचं स्वागत केलं आणि हॉलला जोडलेल्या पॅसेजमधून थेट एका छोट्या बेडरूम मध्ये नेलं. तिथे त्यांची कॉलेजवयीन मुलगी आणि सासूबाईही होत्या. त्या तीन पिढ्यांकडे बघून स्मितहास्य वगैरे करतानाच माझ्या पायाखाली काहीतरी चुरचुरलं. खाली बघतो, तर संपूर्ण खोलीच्या फरशीवर जुनी वर्तमानपत्रं पसरली होती.
तितक्यात बाईंनी बाजूच्या बाल्कनीचं दार उघडलं, आणि आतून चार पायांची आई आमच्याकडे पाहत शेपटी हालवत बाहेर आली. तिच्यामागून पाय फुटलेले पांढऱ्या लोकरीचे गुंडे दाटीवाटीने बाहेर सांडू लागले. काही खोलीभर विखुरले तर काही चालत्या आईला लुचायच्या प्रयत्नात धडपडू लागले. त्या क्षणापासून मुक्ताच्या चेहेऱ्यावर "अईग्गं! कित्त्त्त्ती गोड!" चा भाव जो चिकटला, तो त्या रात्री झोपेपर्यंत तसाच होता. बायकोने मात्र झटकन पाय वरती उचलले, आणि "सॉरी हं, मी घाबरते" असं म्हणत मोडकांच्या कॉटवर सरळ मांडी घातली. मोडक बाईंनी समजुतदारपणे त्या चार पायांच्या आईला कोपऱ्यात बांधून ठेवलं.
मग आम्ही तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारले, आणि तिघींनी अगदी कौतुकाने माहिती पुरवली. त्यातून हेही समजलं की मोडकांचीसुद्धा ही पहिलीच कुत्री आणि त्या दोन वर्षांच्या कुत्रीचं हे पहिलंच बाळंतपण. नोकरी करणाऱ्या मोडकबाईंना काही कामासाठी थोडे महिने घरी राहणं भाग होतं, आणि ती संधी साधून त्यांनी हा "चान्स" घेतला होता. त्या पिलांचं करणं हेही एक पूर्णवेळ कामच होतं की!
अगदी एकसारख्या दिसणाऱ्या त्या पिलांना वेगळं ओळखण्यासाठी त्यांच्या गळ्यात वेगवेगळ्या रंगांचे लोकरीचे धागे बांधलेले होते. आमचं बोलणं चालू असताना खाली त्यांचा मूक गोंधळ चालूच होता. चारेक आठवड्यांची ती पिलं आईपासून पाचसहा फूट लांब जाऊन मुशाफिरी करायला शिकली होती - जागोजागी "शू" करत. नानकटाईएवढ्या त्यांच्या "शुवा" वर्तमानपत्रांत टिपल्या जाऊन रकानेच्या रकाने भरू लागले, आणि खोलीभरच्या शुवांच्या जागा नेमक्या दाखवणाऱ्या त्या वर्तमानपत्रांचं रहस्य आम्हाला उलगडलं.
मोडक बाई-ताई-आजींना मुक्ताच्या वयामुळे आपल्या "गिऱ्हाइकाचं" कौतुक वाटत होतं. ताई खोलीभर बघत म्हणाली, "बघ तुला कुठलं हवंय ते ... ते दाराजवळचं आणि कॉटखालचं आधीच गेलंय ... तुला फीमेल हवीय ना? ... ही जांभळ्या दोऱ्याची, ती पोपटी, आणि ती पिंक ह्या फीमेल्स आहेत ... ही खूप झोपते ... ही खूप मस्ती करते", वगैरे. एकदम निवडीची वेळ आली तेव्हा मी इथूनतिथून जमवलेल्या टिप्सची मनातल्या मनात उजळणी करू लागलो. पण तोपर्यंत मुक्तानी सहजपणे निवड करूनही टाकली. तिच्या पायाचा अंगठा चाटायला आलेल्या एका पिलाला उचलून ती म्हणाली, "आपण हे घेऊया?". तीच सोयरा.
मुलगी पसंत पडली, पण तिला लगेच घरी नेता येणार नव्हतं. पिलांना अजून दोनेक आठवडे आईपासून तोडणं योग्य नव्हतं. शिवाय केसीआय मध्ये रजिस्ट्रेशनही व्हायचं होतं. "फोटो काढले तर चालतील का?" आम्ही जाताना विचारलं. "अं ... नको. पिलं अजून लहान आहेत ना!", आजी म्हणाल्या.
ते दोन आठवडे मुक्ताला हुरहूर लागून राहिली होती. बऱ्याच वेळा पिलाच्या चौकशीचे फोन करून झाले, आणि एकदा भेटही देऊन झाली. आता पिलं पावडरचं दूध प्यायला लागली होती. मोडकांच्या तीन पिढ्या बाळंतपणात रंगलेल्याच होत्या. एकीनं मोठ्या टबात दूध तयार करायचं, दूध पित्या पिलाला इतरांनी त्रास देऊ नये म्हणून दुसरीनं त्याला वेगळ्या टबात ठेवायचं, तिसरीनं त्याचं पिऊन झाल्यावर त्याच्या "रंगाच्या" नावापुढे खूण करायची - काही विचारू नका.
शेवटी एकदाचा आला मोडकबाईंचा फोन रजिस्ट्रेशन झाल्याचा! या दोघींनी रिक्षातून "बारात" नेली आणि सोयराला घेऊन आल्या. सोसायटीच्या फाटकापासून आमच्या दारात येईपर्यंत वरात अनेक ठिकाणी थांबली.
त्या संध्याकाळी सोयराचा बराचसा वेळ अनोळखी खोल्यांमधून कडेकडेने वास घेत फिरण्यात गेला. झोपताना मात्र तिला ओळखीचा सहवास मिळाला. मोडकबाईंनी आठवणीने दिलेलं सोयराच्या आईच्या वासाचं फडकं आम्ही तिच्या बिछान्यात ठेवलं होतं.
(क्रमशः)