परवा एकदा सोयराला फिरवायला घेऊन गेलो असताना सोसायटीतलं एक अनोळखी जोडपं समोर आलं. त्यांचा पहिला प्रश्न, "लॅब आहे ना?", दुसरा प्रश्न "किती महिन्यांची आहे", आणि लगेच तिसरा, "पॉटीची सवय लागली का?"
तिसऱ्या प्रश्नावरून यांना कुत्रा पाळण्याचा अनुभव आहे असं वाटलं आणि अंदाज खरा ठरला. "आम्हीही लॅबचंच पपी आणलं होतं, पण इतकं घाण करायचं घरात, की आमचा पेशन्स संपला. आम्ही देऊन टाकलं शेवटी त्याला." बाई हताशपणे म्हणाल्या. हेच उदाहरण नंतर अजून एकाकडून कानावर आलं. पण त्या सगळ्यांबद्दल सहानुभूतीच वाटली, कारण सोयराच्या पहिल्या दोन तीन महिन्यातली सत्वपरीक्षा आमच्याही मनात ताजी होती.
त्यातून आमच्या घरात अजून फर्निचर नसल्याने आमच्या सगळ्या वस्तू जमिनीवर होत्या - गाद्या जमिनीवर, बॅगा जमिनीवर, स्वयंपाकघरातले डबेडुबे जमिनीवर. या सगळ्यातून सोयराचा मुक्त संचार चाले. जे दिसेल ते हुंग, जे चावता येईल ते चाव, आणि जे कुरतडता येईल ते कुरतड हा उद्योग दिवसभर चालू राही. चपला-बूट तर अगदी प्रिय. आमच्या दोघांच्याही स्लिपर्स तिने विना अवकाश कुरतडल्या. डाव्या पायाचा पुढचा इंचभर भाग आणि उजव्या पायाची अख्खी टाच कुरतडलेल्या अवस्थेतील स्लिपर्स मी बरेच दिवस तशाच वापरल्या. "नव्या आणल्या तरी हीच गत व्हायची" अशी धास्ती वाटे.
पण सोयरा तिच्या शी-शू पासून आमची सोडवणूक करती, तर बक्षीस म्हणून चपलांचे असे अनेक जोड आम्ही तिला हसत आणून दिले असते!
बाईसाहेब दिवसातून चार पाच वेळा शी, आणि डझनभर वेळा शू चा कार्यक्रम करीत. त्याला स्थळ, काळ, प्रसंग या कशाचंही बंधन नसे. दिवाणखान्यात, बाल्कनीत, स्वयंपाकघरात, पहाटे, मध्यान्ही, गाडीत, पाहुण्यांसमोर ... मनात येईल तेव्हा ती स्वत:ला "मोकळी" करून टाके. त्यातून आमच्या फिकट रंगाच्या आणि अतिगुळगुळीत विट्रिफाईड (की काय म्हणतात त्या) लाद्यांवर तिची "ओल" अजिबात दिसत नसे. दाराची घंटा वाजल्यावर लगबगीने दार उघडायला जावं आणि मध्येच पाय घसरून कपाळमोक्ष होण्याइतपत तोल जावा, असंही एक दोनदा झालं. मग एका खोलीतून दुसया खोलीत जाताना आधी इथले तिथले दिवे लावून, वेगवेगळ्या कोनातून फरशी न्याहाळत, कडेकडेने आणि जपून मार्गक्रमणा करायची सवयच लागली.
सोयराच्या फडक्यांच्या ओल्या पताका धुवून बाल्कनीत वाळत पडलेल्या असत. आमच्या परीने आम्ही फडक्यांची फौज वाढवली, तरीही त्या बिचाऱ्या फडक्यांना पूर्ण वाळायची उसंत कधीच मिळाली नाही (त्यामुळे क्वचित प्रसंगी एखादं कोरडं-ठाक आणि भरपूर "टीप" क्षमता असलेलं फडकं हाताशी आलं, की एक वेगळाच आनंद आणि समाधान वाट्यास येई).
शू च्या आगाऊ सूचना कधीच मिळाल्या नाहीत, पण शी प्रसंगाचं अचूक भाकित करायला आम्ही लवकरच शिकलो. शेपटी बुंध्याशी ताठ आणि टोकाशी झेंड्यासारखी ढिली ठेवून, जलदगतीने श्वास घेत, आसपासची जमीन हुंगत, गोल गोल चकरा सुरू झाल्या, की आमची त्रेधा उडे. पण अवधी इतका थोडा मिळे, की हताशपणे प्रसंगाला साक्षी होण्याचीच वेळ बहुतेक वेळा येई. अशावेळी हाताशी यावेत म्हणून वर्तमान पत्रांचे नेमक्या मापाचे तुकडे दोनतीन मोक्याच्या जागांवर पेरून ठेवले होते. नेमक्या मापाच्या प्लास्टिकच्या शेदोनशे पिशव्याही विकत आणून ठेवल्या होत्या.
सोयराला "स्थळ" किंवा "काळ" यापैकी एकातरी "मिती" पुरती सवय लावणं भाग होतं. त्यासाठी वाचायला/ऐकायला मिळतील ते उपाय करून झाले. तिला स्वत:च्याच करतूदींचा संदर्भ लागू नये, म्हणून वासांचं "समूळ उच्चाटन" करण्याची वल्गना करणाया द्रव्यांचा वापर करून पाहिला. तिच्या जेवणाच्या आणि शी-शू च्या वेळा आठवडाभर नोंदवून त्यातून काही पॅटर्न दिसतोय का, त्यावर खल करून झाला. तिला मोक्याच्या वेळी संडासात कोंडून ठेवण्याचा (आणि तिच्याबरोबर स्वत:लाही कोंडून घेण्याचा) प्रयोगही करून झाला; पण ती अविश्रांतपणे भुंकून त्या बंदिस्त जागेचा निषेध नोंदवी, आणि दहा मिनिटांनंतर ती विजयी आणि मी पराभूत मुद्रेने बाहेर पडे!
काही दिवसांनंतर सोयरातला एक बदल आम्हाला जाणवू लागला. "निसर्गदेवीची हाक" तिला ऐकू आली, की ती आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सोयरा विशिष्ट प्रकारे भुंकायला लागली. पण अशावेळी तिला न्यायचं कुठे? बाथरूमचा पर्याय तिनेच खोडून टाकला होता. फ्लॅट असल्याने अंगणाचा प्रश्नच नव्हता. सुदैवाने गच्ची वरच होती. तिचा वापर केला तर? आज त्या विचारांतला वेडेपणा लक्षात येतो, पण तेव्हा मात्र आम्ही सोयराला "चांगल्या सवयी" लावण्यामागे बेभानच झालो होतो म्हणा ना. आपण जवळ नसलो तरीही बिघडणार नाही अशीच सवय लावायला हवी हेही आमच्या लक्षात आलं नाही. दरवेळी "घाई" लागल्यावर सोयरा दार उघडून गच्चीत जाणार कशी, गच्ची बंद असेल तर कुलूप उघडणार कशी वगैरे कसलाच विचार आम्हाला सुचला नाही. काही दिवसांतच "सोयराला गच्चीत नेण्याचा किट" मी तयार केला. उजव्या काखेत सोयरा, उजव्या खांद्यावरून डावीकडे नेलेली झोळीवजा पिशवी, तिच्या बाहेरच्या खणात आधीच सुट्या करून ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, नेमक्या मापाचे कागदाचे तुकडे, नंतर गच्ची स्वच्छ करण्यासाठी पाण्याची बाटली, आणि माझ्या मदतीशिवाय उभी राहू शकेल अशी बॆटरी!
मुक्ताच्या वेळेला मी टाळलेल्या सगळ्या जबाबदाया बायकोने आता हक्काने माझ्यावर टाकल्या. दिवसभर सोयराची सरबराई केल्यावर रात्री मात्र ती मला किल्ला मला लढवायला सांगे. सोयराला निसर्गाची हाक कधीही ऐकू येई. आणि तशी ती आली, की चाललो आम्ही गच्चीकडे! जानेवारी/फेब्रुवारीच्या थंडीत, रात्री दोन किंवा तीन वाजता, अख्खं पुणं आणि त्याबरोबर माझं कुटुंबही बिनघोर झोपलेलं असताना, नुकताच निसर्गक्रम पार पाडून ताजीतवानी होऊन खेळण्याच्या मूडमध्ये आलेल्या सोयराच्या मागे, तिला पकडण्यासाठी गच्चीत सैरावैरा पळतानाचे प्रसंग आठवले, की आजही माझी स्वत:चीच करमणूक होते. असो.
सोयरा अजून थोडी मोठी झाल्यावर तिने स्वत:च सवय लावून घेतली - बाल्कनीत जाण्याची. सुरुवातीला तिने निवडली हॉलची बाल्कनी. खुर्च्या आणि सतरंज्या टाकून आम्ही ती वापरती केली, आणि बळकावली. मग मात्र सोयराने बेडरूमची बाल्कनी जी निवडली, ती आजतागायत कायम आहे.
हल्ली कधी आम्ही गप्पा मारत बसलेलो असतो. सोयराही सगळ्यांमध्ये पहुडलेली असते. मध्येच ती उठते, उतू जाणाया दुधाखालचा गॅस घालवण्यासाठी निघालेल्या गृहिणीच्या लगबगीने बाल्कनीत जाते, परत येते, आणि काही झालंच नाही अशा अविर्भावात परत गप्पा ऐकायला बसते!
(क्रमश:)