सोयरा - ६

"टेन पर्सेंट ऑफ अ लॅबओनर्स डाएट इज हेअर" असं एका पुस्तकात लिहिलंय. त्यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला, तरी सोयराच्या केसांच्या सर्वव्यापीपणाचा अंदाज यायला हे वाक्य पुरेसं आहे. आमच्या फिकट फरशांवर तिचे पांढरे केस खपून जातात म्हणून, नाहीतर आम्हाला दिवसरात्र न्हाव्याच्या दुकानात वावरण्याचा प्रत्यय आला असता. या एका कारणास्तव सोयरा काळी नाहीये याचं मला नेहमी समाधान वाटतं.

असं म्हणे, की वर्षातून दोनदा लॅबचा फरकोट झडून त्या जागी नवा कोट येतो. ते नक्की कधी होतं ते अजून आम्हाला समजलेलं नाहीये, कारण थोड्याफार फरकाने नेहमीच आमच्या घरात केसांचा सडा पडलेला असतो. विशेषत: डायनिंग टेबलाच्या आसपास, म्हणजे घरातल्या सर्वात जास्त वर्दळीच्या भागात सकाळी उन्हाची तिरीप पडली, की जमिनीवरचा केस अन केस उजळून निघालेला असतो. सोयरा घरात नवी होती तेव्हा तिच्या केसांना आटोक्यात ठेवायचा मी कसोशीने प्रयत्न केला, पण नंतरनंतर त्या केसांनी घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा ठाव घेतलाच. सरकत्या दरवाजांचे रूळ, किचन ट्रॉलींच्या खालचा भाग, बेडमधल्या खणात घडी करून ठेवलेली ब्लँकेट्स, टेबलाचे ड्रॉवर्स, बाल्कनीतल्या कुंड्या - कोठेही बघा, सोयराचे चारदोन चुकार केस हटकून सापडतात. 

तशी सोयरा सोफ्याबिफ्याच्या वाटेला फारशी जात नाही. पण नाही म्हणायला एकदा आमच्या अतिशय आवडत्या "पापासान" खुर्चीवर तिने हक्क सांगितला, आणि दोनेक दिवसात ती काळी खुर्ची तिच्या पांढऱ्या केसांनी मढवून टाकली. महिन्याभराने त्या खुर्चीवरून तिचा जीव उडाल्यावर आम्ही पुन्हा ती बळकावली. पण खुर्ची वापरती करण्याआधी धुताना कोण परिश्रम पडले! तिच्यासाठी आता एका सतरंजीची आणि उशीची सोय करण्यात आली आहे. झोपायच्या आधी सोयरा ती उशी चाटून चाटून ओली गच्च करते, आणि मगच तीवर मान किंवा गाल टेकवते.

आंघोळ आठवड्यातून एकदा. ती पिल्लू होती, तेव्हा तिच्या चारही पायांमधून हात घालून उपड्या तळव्याने गळ्याशी धरलं, की एखाद्या मोठ्या पपईप्रमाणे नळाखाली धरून तिला धुता येई. तिने तीसेक किलोपर्यंत मजल मारल्यावर मात्र आता ती सोय राहिली नाहीये. आंघोळ म्हणजे एक मोठा सोहळाच झाला आहे - बादल्या भरत लावा, एखादं प्रलोभन दाखवून तिला आत बोलवा, तिचा पट्टा काढा, दोन तांब्ये अंगावर ओता, केसांच्या विरुद्ध दिशेने हात फिरवून पाणी आत झिरपवा (नाहीतर लॅबचा कोट बऱ्यापैकी वॉटर रेझिस्टंट असतो), मग सोयरा नाकाच्या शेंड्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत शरीर थरकावत नेईल - त्यात भिजा, शांपू लावा, मान-पाठ-पोट-पंजे चोळून धुवा (विशेषत: मागचा उजवा पंजा! होतं काय, की दक्षिणेकडे उतार असलेल्या आमच्या बाल्कनीत सोयरा शू करायला बसते, ती पूर्वेकडे तोंड करून! त्यामुळे दीडेक सेकंदात तिचा तो पंजा नेमका त्यात भिजतो), मग फरशीवर पडणाऱ्या मळकट फेसाकडे पाहून समाधानी व्हा, मध्येच गळालेल्या केसांचा मोठा पुंजका जाळीवरून दूर करून तुंबलेल्या पाण्याला वाट करून द्या, पुन्हा पाणी ओतून साबण घालवा, जमेल तेवढं पुसून तिला बाहेर सोडा, आणि सरतेशेवटी भिजलेल्या कुत्र्याच्या वासापासून मोक्ष मिळवण्यासाठी बाथरूमचा एक्झॉस्ट फॅन चालू करा!

अशी लख्ख उजळलेली सोयरा बाहेर पडली, की तिचा तो स्पेशल नाच सुरू होतो. म्हणजे धावताना जमिनीवर फक्त पंजे न टेकवता, चारही पायांचा कोपरापर्यंतचा भाग टेकवत इकडून तिकडे वेड्यासारखं धावायचं, वारा प्यायल्यागत! खरं तर केव्हाही अत्यानंद झाला की सोयरा हा नाच करते; आणि का कोणास ठाऊक, पण आंघोळ झाल्यावर तिला असा अत्यानंद होतोच होतो. हा नाच करताना ती जिथे जिथे जाते तिथे ओल्या फरशीमुळे आम्ही घसरण्याचा "क्लिअर अँड प्रेझेंट डेंजर" निर्माण होतो. एकदा हा धोका टाळण्यासाठी आंघोळी नंतर लगेच तिला गच्चीत नेण्याचा शहाणपणा मी केला. थंड पाण्याच्या आंघोळीनंतर तापलेल्या गच्चीचा सोयराने मनसोक्त उपभोग घेतला - गडाबडा लोळून - आणि तिच्या ओलसर केसांवर धुळीचा जाड थर चिकटल्याने पुन्हा खाली आणून आंघोळ घालायची पाळी आली.

मध्यंतरी पिसवांनी (fleas) उच्छाद मांडला होता. त्या पिसवांचा तिला शारीरिक आणि आम्हाला मानसिक त्रास होई. बघावं तेव्हा सोयरा काही ना काही खाजवत बसलेली असे. आपण पटकन तिच्या जवळ जाऊन खाजवत्या भाग न्याहाळला, की हमखास एखादी पिसू लगबगीने केसांत खोलवर बुडी मारे. माझ्या बोटांना ती कधीच पकडता आली नाही. मग एकदा बायकोने सोयराला ऎंटी-फ्ली पावडर फासली, तेव्हा डझनभर पिसवा केसांतून अवतीर्ण होऊन पळू लागल्या. त्यानंतर रोजच्या रोज तिचा ब्रशने खरारा करून आणि तिच्या पांघरुणांना वरचेवर धुवून (पर्यायाने पिसवांचं जीवनचक्रच उद्ध्वस्त करून) "राहत" मिळवली. आता तो त्रास जवळजवळ नाहीच.

घराच्या गुळगुळीत फरशीवर स्वत:चा तोल सांभाळेल इतक्याच बेताच्या वेगाने धावायची सोयराला सवय झालीय. शिवाय प्रत्येक नव्या गोष्टीवर आधी दहाएक मिनिटं भुंकून, आणि त्या वस्तूचा सगळ्या कोनांतून वास घेऊन, तिच्यापासून धोका नाही अशी खात्री झाल्यावरच तिला स्पर्ष करायची नैसर्गिक सवय आहेच. या सावधगिरीमुळे तिला आजवर म्हणावी तशी जखम वगैरे कधीच झाली नाहीये. त्यामुळे एकदा जमिनीवर रक्ताचे थेंब पाहून मला आश्चर्य वाटलं. दुसऱ्या खोलीतही तसेच थेंब. एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला. सोयराचं नीट निरीक्षण केलं तेव्हा खात्रीच पटली आणि आपसुक तोंडातून पुरुषसुलभ उद्गार बाहेर पडले, "आइच्चा!"

आईला तोवर उलगडा झाला नव्हता. "अगं, तिची ... अं ... चालू झालीय बहुतेक", मी म्हणालो. "आत्तच? आठच महिन्यांची आहे ना ती?" मलाही सगळं अनपेक्षितच होतं. नंतर केव्हातरी मित्राला ही बातमी कळली तेव्हा तो म्हणाला, "आयला, कुत्र्यांतही असतं का?" (खरंतर हे विधान म्हणजे, मानवी पोराटोरांसाठी "सस्तन प्राण्यांचे पुनरुत्पादन" या विषयावर गल्लोगल्ली प्रात्यक्षिकांसहित शिबिरं घेणाऱ्या अखिल श्वानजातीचा अपमानच आहे की नाही?) बाबांचीही रिऍक्शन तशीच. डाव्या तर्जनीवर उजव्या हाताच्या दोन बोटांची कात्री चालवत बाबा म्हणाले, "'हे' करून टाका बरं का ताबडतोब!"

सोयराचं "हे" करून टाकायला मुक्ताचा विरोध आहे. तिला सोयराच्या पिल्लांची स्वप्नं पडतात नेहमी (बरीचशी वर्चुअल पिल्लं वाटूनही झाली आहेत मैत्रिणींना). आमच्या त्या ट्रेनरलाही सोयरापासून "मिळणाऱ्या" आठ-एक पिल्लांवर पाणी सोडणं हा वेडेपणा वाटतो. आम्ही मात्र सोयराच्या आईचं बाळंतपण याचि डोळा पाहिलंय, आणि तसं काही पेलण्याची आमची अजिबात तयारी नाहीये. "कुत्र्यांना माणसासारखी मातृत्वाची भावना नसते" हा गूगलचा निर्वाळा, आणि "ऑपरेशन सोयराच्या आरोग्यासाठी फायदेशीरच ठरेल" हा तिच्या डॊक्टरांचा सल्ला, यांच्या आधारावर आम्ही स्पेइंगचा निर्णय घेतला आहे. लवकरच वेळ ठरवून ते पार पाडू (ऑपरेशनच ते!).

त्या दरम्यान पुन्हा एकदा सोयरा "हीट"वर आली, की दोनतीन आठवडे तिच्या मागोमाग जमिन पुसत राहायचं - ऑपरेशन नंतर हा त्रास कमी होईल या आशेवर.

(क्रमश:)

अवांतर: "मार्ली आणि मी" हे सुंदर पुस्तक नुकतंच हाती पडलंय. श्वानप्रेमींनो, आवर्जून वाचा. त्याच्या मुखपृष्ठावरचा फोटो पाहून वाटलं, की सगळे लॅब दिसायला सारखेच.