"तुला कानडी बोलता येतं?"
"हो!"
"मग सांग पाहू, कानडीत 'इकडे ये' ला काय म्हणतात?"
"इल्ली बा!"
"आणि 'तिकडे जा' ला?"
"सोप्पं आहे ... 'तिकडे' जायचं आणि म्हणायचं ... इल्ली बा!"
पाहा, अडलं का कुठं? सोयराच्या बाबतीतही आमचं भाषाज्ञान तुटपुंजं असलं तरी हल्ली आमचं काहीही अडत नाही. आमचे चारदोन शब्द तिला समजायला लागलेत, आणि तिची (मुख्यत: शारीर) भाषा आम्हालाही उमगू लागली आहे.
सोयरा तीनेक महिन्यांची असताना मात्र तिच्यात आणि आमच्यात चांगलीच कम्युनिकेशन गॅप असल्याची जाणवे. त्यातून गूगलबुवांनी सांगून ठेवलं होतं की तीनचार महिन्यांपासून शिकवायला सुरुवात करा, नाहीतर नंतर फार त्रास होईल वगैरे. आम्हा पहिलटकरांचे ते काळजीचे दिवस होते. सोयराचा आकार वाढायला लागला होता. आनंदाच्या भरात शेपटी हालवत एखाद्या पाचसहा वर्षांच्या पोराच्या छाताडावर पाय दिले तर पोराला जमिनदोस्त करण्याइतकं वजनही वाढायला लागलं होतं. तिला खाली फिरायला नेलं असताना, चारही पायांनी जमिन रेटत, गळ्याला फास लागेपर्यंत पट्टा ताणत ती आम्हा द्विपादांना तिच्यामागे फरफटत न्यायचा प्रयत्न करे, तेव्हा आम्हाला हटकून "डेक्कन" वरच्या त्या समंजस काळ्या लॅबची आठवण येई. किती छान द्रुष्य होतं ते! मालक मागे वळूनही न बघता रमतगमत चालला आहे ... त्याच्यामागे वीसेक पावलांचं अंतर ठेवून फुटपाथवरच्या ऐन गर्दीतून वाट काढत ती काळी पोटुशी लॅब निवांत चालली आहे ... एका भेळवाल्याजवळ ती थांबते ... भेळवाला कौतुकाने खाली वाकून तिला एक कुरकुरीत पुरी भरवतो, तिचे डोहाळे पुरविल्यासारखा ... तो मालक, या नेहमीच्या सीनची सवय असल्यागत क्षणभरच मागे वळतो ... आणि "आलेच हं" असं जणू म्हणत ती लॅब पुन्हा मालकामागे चालायला लागते! कित्ती शहाणी मुलगी! कित्ती गुणाची पोर!
बायकोचं स्पष्ट मत होतं की आपल्याला तिला सवयी लावायला जमणार नाही, त्यामुळे आपण सरळ सरळ एखाद्या ट्रेनरची मदत घेऊ. मी मात्र "लॅब्स फॊर डमीज" सारखी पुस्तकं वाचून कुत्र्यांना कमांड्स शिकवणं हे फारसं कठीण काम नाही, असा (खरं तर योग्यच) समज करून घेतला होता. ती जबाबदारी मी अंगावर घेतली.
पुस्तकातल्या सगळ्या जाणकारांचा "पॉझिटिव डिसिप्लिन" वर भर होता. म्हणजे शिक्षा करायच्या नाहीत, पण चांगल्या गोष्टींची वारंवार ओळख करून द्यायची. एक सोपा उपाय सांगितला होता: एक क्लिकर घ्या - काही मंडळी जपाची आवर्तनं मोजायला घेतात तसा (मी त्याऐवजी क्लिक्क्लिक करणारं बॉलपेन घेतलं). बऱ्याच वेळेला एकेक क्लिक करायची, आणि मध्येच एखादी "डबल क्लिक". डबल क्लिक वाजवली, की बिस्किटाचा तुकडा पुढे करायचा. दोनचार दिवस मधून मधून हेच चालू ठेवायचं; इतकं, की डबल क्लिक म्हणजे "शाबास", हे तिच्या डोक्यात फिट्ट बसलं पाहिजे. मग फिरायला जाताना पाचेक सेकंद पट्टा ओढला नाहीस? छान, डबल क्लिक, बिस्किट! थांब म्हटल्यावर थांबलीस? छान, डबल क्लिक, बिस्किट! असं करता करता नंतर बिस्किट वगळलं तरीही चांगल्या सवयी तशाच राहतात, असा तो साधा उपाय.
झालं. एका हातात बॉलपेन आणि दुसया हातात ट्रीटची वाटी घेऊन मी सरसावलो!. खरंतर पहिल्या दहा मिनिटांतच डाव्या हातातल्या पेनाची डबल क्लिक ऐकल्यावर उजव्या हातातल्या वाटीवर अपेक्षेने नजर वळवेपर्यंत सोयराची प्रगती झाली होती. पण असा रँडम क्लिक्क्लिकाट करत घरभर फिरणाऱ्या माझी मात्र कुटुंबाकडून - विशेषत: बायकोकडून - चेष्टाच सुरू होती. शेवटी तिच्या अपेक्षेप्रमाणेच झालं. माझ्या तेरड्याचा रंग तीनच दिवस टिकला. इतर काही व्यापांमुळे या "अभ्यासाकडे" दुर्लक्ष झालं, आणि "क्लास" लावायला मी रडतकुढत होकार दिला.
बायकोने उत्साहाने फोन फिरवले आणि ट्रेनर शोधला. आठवड्यातून दोन वेळा तासभर शिकवणी, एकूण तीन महिन्यांचा "बेसिक ओबिडियन्स कोर्स", आणि महिन्याकाठी फी अडीच हजार रुपये - फक्त! (वाचकहो, ज्या फीच्या मोबदल्यात पुण्यातल्या एखाद्या चांगल्याशा शाळेत इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, नाशा, शास्त्र, गणित, चित्रकला, हस्तकला, आणि खेळाचे अनेक प्रकार शिकवून मिळतात, तेवढीच फी "उठ", "बस", "भुंक" असले शब्द शिकवण्यासाठी देताना माझ्या जिवावर आलं नसेल तरच नवल.)
ट्रेनर भाऊंनी पहिल्याच भेटीत आमच्या तोंडावर अनेक वजनदार रेफरन्सेस फेकले - माजी मुख्यमंत्र्यांच्या बहिणीचा कुत्रा, आजी खासदाराच्या बंगल्यावरची कुत्री, वगैरे. आम्ही इंप्रेस झाल्यासारखं दाखवलं. बुधवार/शुक्रवार असे दोन वार ठरले.
पहिल्या बुधवारी बायकोचा ऑफिसात फोन,
"मराठी शिकवायचं की इंग्लिश?"
"मराठी! आपलं ठरलंय ना ..."
"बघ, पुन्हा विचार कर. तो येतोय अर्ध्या तासात!"
क्षणभर मीही विचारात पडलो (खरंतर गोंधळलो - आपण सोयराबद्दल बोलतोय, की मुक्ताबद्दल)? अधिक विचारांती मराठीवर शिक्कामोर्तब झालं. बायकोने इंग्रजी आज्ञांची मराठी भाषांतरं करून एक यादी तयार केली, आणि ट्रेनरच्या हातात ठेवली. त्यालाही आव्हानच होतं. कारण सोयरा ही त्याची पहिली मराठी विद्यार्थिनी होणार होती!
बुधवारी मी घरी आली, तेव्हा बायको म्हणाली, "तिला शेकहॆंड विचारून बघ"! मी सहज "शेकहॆंड" म्हणत हात पुढे केला, आणि सोयराने खरोखरच तिचा पंजा माझ्या हातात ठेवला! आई ग्ग! पैसा वसूल! नंतरच्या दोन सेशन्स मध्ये "हळू खा" शिकून झालं. नेहमी हातातल्या बिस्किटावर गपकन झडप घालणारी सोयरा आता जुईचं फूल खुडल्यागत अलगद बिस्किट तोंडात घ्यायला लागली.
पण ही गम्मत फार काळ टिकली नाही. ट्रेनरचा वेग मंदावला. एक तर तो सोयराचा "क्लास" कधीच आमच्या समोर घेत नसे. सोयराला घेऊन तो गच्चीत जाई. तिथे तो नक्की काय करतो त्याचा अंदाज येत नसला तरी बिस्किटांच्या वाटीपेक्षा चेनचाच वापर जास्त होतोय हे जाणवायला लागलं. सोयराला अंमळ जास्तच "ऍटिट्यूड" आहे असं तो म्हणायला लागला, आणि तो आला, की सोयरा कान पाडून आणि तोंड फिरवून आमच्या मागे लपायला लागली. ती चक्क घाबरायला लागली. (त्या चेनचा तिनं इतका धसका घेतलाय, की आजही कधीमधी त्या चेनरूपी "बुवा" किंवा "पोलिस" ची धमकी आमच्या मदतीला धावून येते).
खरंतर ट्रेनरभाऊंच्या चेन तंत्राला आमचा आक्षेप नव्हता, पण इतर बाबतीत मात्र ते आमचा विश्वास गमावू लागले. सोयराच्या क्लासच्या दरम्यान ऊठसूठ मोबाइल वर बोलत बसणे, आमची तयारी असतानाही "घरचा अभ्यास" समजावून न सांगणे, "पुढे काय" याची कल्पना न देणे, या अपराधांचा डोंगर "महिना २५००" पेक्षा उंच झाला, आणि पहिल्या महिन्याअंतीच आम्ही त्याला अच्छा केलं.
खरं सांगायचं झालं तर या ट्रेनिंग मुळे म्हणा, किंवा तिच्या वाढत्या वयामुळे म्हणा, सोयरा आमच्या कह्यात येईल अशी स्पष्ट चिन्हं आम्हाला दिसायला लागली होती. मग ट्रेनर गेल्यावर आमचे आम्हीच तिला शिकवायला लागलो. तिला काहीतरी उसनं शिकवायच्याऐवजी, तिच्याकडून आपसूक होणाऱ्या क्रियांचा वापर करायचं तंत्र आमचं आम्हालाच कळायला लागलं. नाकाजवळून वर जाणारी मूठ बघण्यासाठी बूड टेकायला लावून मुक्ताने "बस" शिकवलं. टेबला खुर्चीखाली ठेवलेला बिस्किटाचा तुकडा घेण्यासाठी सरपटायला लावून मी "झोप" शिकवलं. एरवी कालवलेल्या जेवणाचा वास आला, की ते पुढ्यात येईपर्यंत आकाश पाताळ एक करणाऱ्या सोयरावर बायकोने एकदा असे काही डोळे वटारले, की त्या भुंकण्याची जागा अस्पष्ट अशा कुईकुईने घेतली.
तिलाही आमचे क्लूज कळायला लागलेत. तिच्या नजरेला नजर देत "च्चल!" असं म्हटलं, की कितीही आळसावलेली सोयरा झटकन उठून तयार होते. कारण "च्चल" चा अर्थ मी आधी रबरी बॉल शोधून, मग गच्चीची चावी घेऊन दार उघडणार आहे हे आता तिला पाठ झालंय. स्वयंपाकघरातल्या डावीकडून तिसऱ्या (च) कपाटाचं दार वाजलं, की घरात कुठेही असलेली सोयरा बिस्किटाच्या आशेने स्वयंपाकघरात धावते.
पण सोयराला "सग्ग्ळं सग्ग्ळं कळतं" अशी आख्यायिका जन्माला येतेय अशी चिन्हं दिसली, की मी लगेच सावध होतो. "मुक्ता मा...झी" असं म्हटल्यावर सोयरा एक्साईट होते, ते तिला वाटणाया हेव्यामुळेच असा दावा करणाया माझ्या आईला मी परवाच एक प्रयोग करून दाखवला. मी "मुक्ता मा..झी" च्या ऐवजी "भेंडीची भा...जी" असं म्हटलं, आणि तरीही सोयरा एक्साईट झाली. ते असो.
सोयराला बऱ्याच साध्या साध्या गोष्टी शिकवायच्या आहेत, आणि आम्हालाही तिच्या गोष्टी शिकायच्या आहेत. उदाहरणार्थ, तिला अजून "धर" आणि "सोड" हे शब्द कळत नाहीत, आणि ते शिकवताना आमच्याकडूनही सातत्य राहत नाही. सोयरा 'ध्वनी' लक्षात ठेवते, 'भाषा' नाही याचा विसर पडतो आणि "धर" च्या ऐवजी "घे", किंवा "सोड"च्या ऐवजी "टाक" वगैरे प्रतिशब्द वापरले जातात.
तरीही आहे त्या तुटपुंज्या शब्दसंपदेची मदत घेऊन आम्ही सुखाने एकत्र नांदत आहोत. मी कधीतरी केर काढत असताना सोयरा सारखी मध्ये येऊन केरात पाय देते. तिला शब्दाने दूर लोटणं मला जमत नाही. शेवटी वैतागून मी बायकोला म्हणतो. "बोलाव गं जरा हिला तिकडे". आणि बायको स्वयंपाकघरातून हाक मारते, "सोयरा ... (इल्ली बा!)".