सोयरा - १

"'सरमा' कसं वाटतं?", बायकोने हुकुमी एक्क्याची उतारी केल्याच्या अविर्भावात माझ्याकडे पाहिलं.

नावामागचा संदर्भ माहीत होता. लगेच गूगल करून खात्री करून घेतली. "सरमा: इंद्राच्या हरवलेल्या गाईंचा पाताळापर्यंत जाऊन शोध घेणारी स्वामीभक्त कुत्री". पर्याय जोरदारच होता. तरीही मी सुचवलेल्या 'सोयरा' ची शान त्यात नाही असं मला राहून राहून वाटत होतं. त्यातून सुदैवाने जी मुलगी 'जिंजर', 'कुकी', 'लिसा' असल्या काहीशा नावांचा हट्ट धरेल असं वाटत होतं, तिलाही 'सोयरा' पहिल्या फटक्यात आवडलं होतं. मग मी, "पिल्लू आणायचं ते पोरीसाठी, त्यामुळे नावाच्या बाबतीतही तिची निवड महत्त्वाची!" असा मतलबी आव आणला, आणि पिलाचं नाव नक्की झालं - सोयरा!

--

कुत्र्याचं खूळ प्रत्येक लहान मुलाप्रमाणे मुक्तालाही होतं. काकणभर अधिकच असेल. कुत्रा पाळायचा आग्रह तर नेहमी व्हायचा. सात आठ वर्षांची असताना असंच पुन्हा एकदा तिने विचारलं आणि मी नेहमीप्रमाणे लंगड्या सबबी दिल्या. "मालकाने जागेच्या कॊंट्रॆक्ट मध्ये 'नो पेट्स' असं बजावून सांगितलं आहे", "आपलं घर लहान आहे", "त्याचं सगळं आम्हालाच करावं लागेल", वगैरे. मग तिने विचारलं, "आता नाही तर नाही, पण मी सोळा वर्षांची झाल्यावर तरी आणाल?". "हो", मी बिनधास्तपणे म्हणालो.

पण यावेळी ते प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाही. दुसया दिवशी मुक्ताने माझ्या हातात एक कॊंट्रेक्ट पेपरचा प्रिंटाउट ठेवला. त्यावर तिच्या आवडत्या फाँटातला मजकूर होता:

ऒन धिस डे ११/२७/०४,
आय प्रॊमिस टु माय डॊटर,
मिस मुक्ता,
दॆट व्हेन शी इज सिक्स्टीन इयर्स ओल्ड,
ऒन हर स्वीट सिक्स्टीन पार्टी,
आय विल बाय,
विथ माय ओन मनी,
माय डॊटर,
अ रिअल,
अ लिविंग,
अ ब्रीदिंग,
डॊग.

"सापडलात की नाही", अशा नजरेने मुक्ताने माझ्याकडे पाहिलं होतं, आणि कौतुकाच्या भरात मी त्या कागदाखाली सही ठोकून दिली होती!

आता या चिटोऱ्याकरिता का होईना, पण आपणही कधीतरी कुत्रा घेऊ असं मला हळू हळू वाटू लागलं.

(क्रमशः)