सोयरा - ७

[संवदनशील व्यक्तींना, विशेषतः स्त्रियांना सूचना: सोयराच्या शस्त्रक्रियेबद्दल आणि इतरही काही नाजुक विषयांचे संदर्भ या लेखात आहेत.]

ऑपरेशनसाठी डॉक्टरांची आणि आमची वेळ एकदाची जुळली, आणि या गेल्याच शनिवारी संध्याकाळी पाच वाजता सोयराला घेऊन आम्ही कर्वे रस्त्यावरील दवाखान्यात पोहोचलो.

दवाखान्याच्या बंद दरवाजाच्या आड कुठली तरी इमर्जन्सी केस आहे असं कळलं, म्हणून आम्ही बाहेरच वाट पाहत बसलो. अर्ध्या तासानंतर दरवाजा उघडला, आणि गुंगीत असलेल्या एका कुत्रीला अलगद उचलून बाहेरच्या टेबलावर ठेवण्यात आलं. कुत्रीचा मालक नेमका आमचा मित्रच निघाला आणि त्याच्याकडून सगळी कहाणी समजली. मधाच्या रंगाच्या आणि कपाळावर पांढरा शंकरपाळा असणाऱ्या त्या लहानखुऱ्या गावठी कुत्रीचं नाव आहे "हनी". हनीही सोयरा एवढीच - चौदा महिन्यांची. तिच्या आधी मित्राकडे लॅबचंच एक पिलू होतं, पण आतल्याआत आतड्याला पीळ बसून ते दुर्दैवाने तीनच महिन्यात दगावलं. ती पोकळी भरून काढण्यासाठी एका गावठी पिलाचा - हनीचा - घरात प्रवेश झाला.

एरवी गावठी पिलांना मागणी जवळजवळ नाहीच. त्यामुळे हनी वयात येऊन "हीट" वर आली तेव्हा तिच्यावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवण्यात आली. तरीही काही दिवसांनंतर तिला पान्हा फुटू लागला, ती चिडचिडी झाली, गल्लीतल्या आजूबाजूंच्या श्वान सवंगड्यांवर दात विचकू लागली, दिलेलं जेवण जमीन उकरून खड्ड्यात पुरून लपवू लागली. मित्राने सांगितलेल्या इतिहासावरून डॉक्टरांनी निदान केलं "सूडो प्रेग्नन्सी" चं. या आभासी गर्भारपणात कुत्रीला गर्भारपणाच्या सगळ्या दशा-डोहाळे लागतात, पण गर्भारपण मात्र खरं नसतं. उपचार सुरू झाले. पण दुर्दैवाने, हनी खरंच पोटुशी होती! तिच्यावर ठेवलेली पाळत चुकवून कुठल्या तरी कुत्र्याने डाव साधला होता! शेवटी त्या दिवशी एक पिल्लूच बाहेर येताना दिसलं, तेव्हा झाला प्रकार उलगडून मित्राने तिला तातडीनं दवाखान्यात आणलं होतं.

ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. पिलं दगावली होतीच, पण हनी सुखरूप होती.

हनीनंतर सोयरासाठी ऑपरेशन टेबल रिकामं झालं. डॉक्टरांनी पुढे केलेला "कन्सेन्ट फॉर्म" भरला, आणि सोयराला आत नेऊ लागलो. तिथल्या वासामुळे की कशाने कोणास ठाऊक - पण मागच्या डॉक्टरभेटीच्या वेळेला दवाखान्याचा इंच न इंच हुंगणारी सोयरा आज आत पायही ठेवायला तयार नव्हती. [float=font:brinda;place:top;]शेवटी तिला उचलून वर ठेवलं. मिनिटभरात इंजेक्शनचा अंमल सुरू झाला, आणि बोटभर जीभ बाहेर काढून सोयरा उताणी पसरली.[/float]

आम्ही बाहेर आलो. सलाइन लावलेल्या हनीच्या कपाळावर हात फिरवत मित्र आणि त्याची बायको उभे होते. डॉक्टरांनी चोवीस तासाची धोक्याची मुदत सांगितली होती, त्याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

आत सोयराचं ऑपरेशन चालू असताना बाहेर एकेक पेशण्टस येत होते. "रेव्ह पार्टी" तून उठून आल्यागत दिसणारा एक दाक्षिणात्य तरूण त्याच्या आईसोबत आला होता. त्यांनी जाळीच्या पिशवीत घालून एक मांजर आणली होती - "स्वीटी". "हिला फिश कूप आवडते. त्या दिवशी कूप फिश खाल्ले आणि आता जुलाब होते. डोळ्यात पण कायतरी व्हाइट व्हाइट दिसते" वगैरे. बाजूला एका नवपरिणीत दांपत्याने त्यांच्याकडचं दीड महिन्याचं पिलू "बडी" आणलं होतं. बडीची लसीकरणाची पहिली वेळ होती. एक डिझायनर-वेअर घातलेली पॅरिस हिल्टनचा ऍटिट्यूड ल्यालेली तरुणी आणि तिच्याकडचं, डोक्यावर "बो" बांधलेलं "पूडल" ही होतं. किती वेगवेगळी व्यक्तिमत्वं आम्हा सगळ्याची! अकरा ते साठ वर्षांदरम्यान वयं असणाऱ्या त्या गोतावळ्यात, फक्त "पाळीव प्राणी" या विषयावर गप्पा चालू होत्या.

ऑपरेशन संपवून डॉक्टर बाहेर आले. सोयराला बाहेर आणलं. आम्ही आणलेली एक जुनी सुती साडी एखाद्या शिंप्याच्या सराईतपणे फाडून डॉक्टरांनी सोयरासाठी गाऊन तयार केला आणि तिला तो नीटसपणे घातला. भराभर उपचार करून त्यांनी "बडी", "स्वीटी" आणि त्या पूडलचीही बोळवण केली. आम्ही जायला निघालो तेव्हा त्यांना अजून एक इमर्जन्सी कॉल आला. चिंतित मुद्रेच्या एका माणसाच्या गाडीत बसून ते त्याच्या घरी गेले.

बेशुद्ध अवस्थेमुळे अजूनच जड वाटणाऱ्या सोयराचं धूड आम्ही अलगद गाडीत ठेवलं आणि निघालो. हनीला मात्र सलाईन संपेपर्यंत तिथेच थांबायला लागणार होतं.

घरी शुद्धीवर यायला सोयराला आठ दहा तास लागले. मागच्या दोन पायांच्या मध्ये पोटावर, चारेक इंचाच्या जखमेवर सहा सात टाके आहेत. त्यावर चिकटपट्टी आहे. त्या सगळयाचा तिला त्रास होतोय नक्कीच. गेलया तीनेक दिवसात कमीत कमी चालतेय. जागच्या जागी तासनतास बसून आहे (मात्र "बाथरूम" साठी बाल्कनीत मात्र जातेय, स्वतःहून). कान मागेच आहेत. घंटा वाजली आणि कोणी दाराशी आलं, की उत्साहात उठते, पण दहा पावलं चालली की टाक्यांची आठवण होऊन जागीच बसते, मागचे दोन्ही पाय पोटाशी ओढून, शांतपणे. वेदना असली, तरी कण्हणं नाही, की हू का चू नाही (डॉक्टरांच्या मते, अगदी हाड वगैरे मोडलं तरंच कुत्रा वेदनेने ओरडतो. एरवी नाही). डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तिला क्रोसीन दिलं तेव्हापासून जरा मोकळीढाकळी व्हायला लागली आहे. तिला रिझवण्याचे अनेक प्रयत्न होताहेत. शक्यतो चालायला लागू नये, म्हणून सतरंजीवरून सरकवत वर्दळीच्या जागी आणलं जातंय. ती सोफ्यावर चढून बसली तरी कोणी रागावत नाहीय सध्या.

आता डोळ्यात पूर्वीचे भाव यायला लागले आहेत. शेपटी हलायला लागली आहे. गुरगूर वाढायला लागली आहे. कधी एकदा सोयरा बेंबीच्या देठापासून भुंकेल याची मी वाट पाहतोय.

(क्रमशः)