कुत्र्यांच्या नाकाची क्षमता माणसाच्या चारशे पट जास्त असते असं वाचलंय कुठेतरी. एक उदाहरण होतं - की आपण डोळे मिटून एखादं सँडविच खायला घेतलं, तर आपल्याला त्यातल्या कांद्या-टोमॅटोचा वास येइल. फारच नाक तीक्ष्ण असेल तर स्लाईसमध्ये घातलेल्या पालेभाज्यांचाही वेगळा वास कळेल. कुत्र्याला या सगळ्याचा वास येईलच, पण त्याही पुढे जाऊन ते सँडविच बनविणाया आचाऱ्याने कुठलं अत्तर वापरलं होतं, किंवा त्याने कांदा कापायच्या सुरीने दोन दिवसांपूर्वी जे काही कापलं होतं, त्याचाही वास येईल!
अशा श्वानसमाजातसुद्धा त्यातल्या त्यात अधिक पावरबाज नाक असणाया जातींमध्ये लॅबचा समावेश होतो. बाँबस्क्वाड्स मध्ये, किंवा खिशाचा फक्त बाहेरून वास घेऊन आतील बनावट नोटा ओळखणाया कुत्र्यांमध्ये बहुतकरून लॅब्सच असतात की! (त्यातुलनेत श्रवणशक्तीत मात्र स्कोअर कमी, बरं का. खाली पडलेले कान हे त्याचं एक कारण).
आमच्या घरी पाहुणे आले, की भाव खाण्यासाठी आमचा एक खेळ ठरलेला आहे - सोयराला केवळ वासाच्या साहाय्याने काहीतरी शोधायला सांगण्याचा. हॉलला लागून असलेल्या स्वयंपाकघरात भिंतीच्या आड सोयराला घेऊन जायचं, तिच्याच एखाद्या रबरी खेळण्याचा तिला वास द्यायचा, आणि मग तिला "थांब" म्हणत ते खेळणं हॉलमधल्या एखाद्या खुर्चीच्या उशीखाली किंवा एखाद्या धीट पाहुण्याच्या पाठीमागे लपवून ठेवायचं. अशी तयारी केल्यावर "सोयरा, श्शोध! " अशी हाक दिली, की सोयरा "जिंकू किंवा मरू" च्या आवेशात हॉलमध्ये घुसते आणि नाक वर उचलून खोलीभर दमदार चकरा मारायला लागते. तिचा श्वास जलद होतो आणि ऐकायलाही यायला लागतो. मध्येच एखाद्यावेळी ती "त्या" खुर्चीच्या किंवा पाहुण्याच्या पुढे चार पावलं निघून जाते देखिल, पण मग अचानक कुणीतरी हाक मारल्यागत गर्रकन मागे वळून परत येते. शेवटी पाहुण्याच्या मांडीखाली किंवा खुर्चीच्या उशीखाली नाक खुपसून खुपसून ती वस्तू बाहेर काढल्याशिवाय तिला चैन पडत नाही. तिने अशी शिकार साधली, की पाहुणे टोटली इंप्रेस्ड होतात, आणि घडाघडा रामरक्षा म्हणून दाखवणाया पोराच्या पालकांसारखी आमची कॉलर ताठ होते.
सोयरा तिच्या डोळ्यांपेक्षाही नाकावर जास्त विसंबून असते याची मला तरी खात्री आहे. नाकाने ती जगाकडे पाहतेच जणू. समोर आलेली वस्तू खाण्याजोगी आहे की कसे, थाळीत वाढलेलं अन्न अति गार किंवा गरम आहे की बेताचं आहे, हे सगळं वासाने ठरतं. बाल्कनीत आठ फुटांवर बसलेल्या चिमणीच्या अस्तित्त्वाचा अभ्यासही त्या चिमणीकडे आपलं सूक्ष्मपणे थरथरणारं नाक रोखल्याशिवाय पूर्ण होत नाही. रेडियोने अँटेना उभारून लहरी पकडाव्यात, त्याप्रमाणे बाल्कनीतून वाहणाऱ्या हवेत नाक धरून दूरवरून येणारे वास पकडण्यात सोयराचा बराच वेळ जातो. आम्ही "बाहेर" निघालो आहोत हेही कळतं कसं, तर आम्ही कपाटातून काढलेल्या कपड्यांवर रेंगाळणाया "बाहेर"च्या वासामुळे!
तिला खाली फिरायला नेताना खालच्या मजल्यावर पोचून लिफ्टचं दार उघडलं, की सोयरा जवळच्या पहिल्या गाडीच्या पहिल्या चाकासून अधाशासारखी वास घेत सुटते. अक्षरश: गावभर फिरून लाखो वास अंगावर ल्यालेल्या त्या गाड्यांचा इंचनइंच हुंगण्यात सोयरा स्वत:ला हरवून बसते. मग पुढचे दोन पाय मुडपून खाली झुकून गाडीखालचे वास घ्या, कधी एक्झॉस्टजवळचा वास घेताना पूर्ण कपाळ काळं करून घ्या, असे प्रकार चालू होतात. त्या वासांपासून तिला तोडावं-ओढावं लागतं, ते पार्किंगलॉटच्या फरशीवर तिच्या नखांचे नाखुश चरे उमटवूनच. इतरत्रही तेच. भिंतीला टेकवलेली वॊचमनची काठी दिसली, की त्या काठीच्या खालच्या टोकापासून वरच्या दिशेने नाकाचा स्कॆनर सरकायला लागतो, आणि वॉचमन जिथे मुठीने पकडत असेल नेमक्या त्याच जागी बराच वेळ रेंगाळतो. मग बाहेर पडल्यावर गवताचे वास, बारीकश्या फुलांचे वास, तुळशीच्या मंजिऱ्यांचे वास, प्लास्टिकच्या पिशव्यांचे वास ... असं करत करत आम्ही बिल्डिंग नंबर सातपाशी आलो, की वरच्या मजल्यावर बाल्कनीत बसलेल्या "झोरो"ला हमखास सोयराचा वास येतो, आणि त्याचं भुंकणं चालू होतं. अगदी ठरलेलं आहे!
कुत्र्यांच्या घ्राणेंद्रियांच्या अशा भन्नाट क्षमतेची कल्पना आली, की आपण एका परीने अपंग आहोत असं वाटायला लागतं - नव्हे, त्याची प्रचितीही येते! परवाचीच गोष्ट. आमच्या ओळखीच्या एका कुटुंबात नुकतंच कुत्र्याचं एक पिल्लू आणलं आहे, "खंडू" नावाचं. बऱ्याच दिवसांपासून मुक्ताचा आग्रह चालला होता त्या पिलाला बघायला जायचा, पण काही ना काही कारणांमुळे ते जमत नव्हतं. एकदा बायको एकटीच घराबाहेर पडली असताना काही काम निघालं म्हणून पटकन त्या घरी शिरून आली. साहजिकच खंडूलाही पाहून-भेटून आली त्या पाच-एक मिनिटांत. बायको घरी आली तेव्हा तिने मुक्ताला मुद्दामच हा प्रसंग सांगितला नाही, नाहीतर मुक्ता पिलाला भेटण्यासाठी अजूनच उतावीळ झाली असती. मुक्तापासून ती चोरी लपवली खरी, पण सोयरापासून मात्र ती अजिबात लपवता आली नाही. सोयरा बायकोच्या सभोवताली फिरून तिच्या हातापायांचा आणि कपड्यांचा नेमक्या अशा ठिकाणी वास घेत राहिली की जिथेजिथे त्या पिलाने स्पर्श केला होता. बोलता आलं असतं तर ती अगदी नक्की म्हणाली असती, "आम्हाला न घेता एकटीच गेलीस ना? ".
बाजूलाच बसलेल्या मुक्ताला मात्र या सगळ्याची "गंधवार्ता" ही नव्हती!
(क्रमशः)