मियाऽऽउं! (भाग-२)

मियाऽऽउं! (भाग-२)

पहिलं मांजर गेल्यानंतर बराच काळ घरात मांजराचा विषय निघाला नाही. त्याला विसरणं सगळ्यांनाच कठीण जात होतं. पण एक दिवस आई नेहेमीप्रमाणे ऑफिसमधून घरी आली. उजव्या खांद्याला नेहेमीची पर्स आणि डाव्या हातात प्लॅस्टिकची पण जाळीदार आणि घटमूठ अशी एक पिशवी. "काय आहे?" माझा लगेच प्रश्न. "अगं बघ तर. तुला आवडेलच" आई म्हणाली. आईने जमिनीवर पिशवी ठेवली. त्याचं तोंड उघडलं. मी अधीरपणे पिशवीच्या जवळ गेले, जाळीतून कोणीसं बघतंय असं वाटलं. नीट पाहिल्यावर दोन छोटे गोल डोळे दिसले. मग मामला ध्यानात आला. आत माऊ असणार नक्कीच.

"मांजर आहे?" अतीव आनंदाने मी विचारलं. त्यावर आईने सांगितलं की तिच्या मैत्रिणीच्या मांजरीला बरीच पिल्लं झाली. त्यापैकीच हे एक. आईने ऑफिसनंतर तिच्या घरी जाऊन त्यातल्या एकाला जाळीच्या पिशवीत घालून लोकल ट्रेनमधून घरी आणलं. यावर "पिशवीत घातल्यावर शांत कसं काय बसलं, काहीच चुळबूळ केली नाही का, लोकलमधून गर्दीतून कसं आणलंस" असले प्रश्न नंतर आईला विचारुन भंडावून सोडलं.

बरं आता गृहप्रवेश करुन बराच वेळ झाला होता. पिशवीचं तोंड उघडून ठेवलंच होतं. उत्सुकतेने आम्ही भवती जमून मांजराविषयी गप्पा मारत बसलो होतो. त्याला बाहेर येण्यासाठी चुचकारुन झालं. पुढे दुधाची वाटी ठेवून बघितली. म्हटलं, आपण आसपास आहोत, आपल्या चाहुलीने, आवाजाने गांगरलं असेल बिचारं त्यामुळे बाहेर पडण्याचं नाव घेत नाहीये. एकदा वाटलं सरळ हात आत घालून बाहेर काढावं पण म्हटलं नको अजून एकमेकांना आपण अनोळखी आहोत त्यामुळे जबरदस्ती नको. नाहितर पहिल्याच दिवशी प्रसाद मिळायचा! शेवटी आम्हाला पण कंटाळा आला म्हटलं यायचं तेव्हा येईल बाहेर तर तोपर्यंत पिल्लालाही आतमध्ये कंटाळा आल्यामुळे त्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा कारण स्वारीने बाहेर डोकावून मुखकमल दाखवलं. आणि मग हळूच सर्व अंग बाहेर काढलं. काढलं तर समोर उशी दिसली. स्वारी उशी आणि भिंतीच्या मध्ये गॅप असते तिथे धावत जाऊन लपली. आता काही वेळ तिथेच मुक्काम होता. मी थोडंफार फिसफिस करुन त्याला बोलावू पाहिलं पण हे आपलं ढिम्म. बरं म्यावम्याव वगैरेचाही पत्ता नाही. "श्या: हे असं कुठवर चालणार...असं काय हे...यडंच दिसतंय" मी मनात म्हटलं. अर्थात काही तासांनी ते जरा धीट झालं कारण इकडे तिकडे हिंडत त्याचा आवाज त्याने सर्वांना ऐकवला. पण निश्चितच तेव्हा ते त्याच्या आईला आणि इतर भावंडांना शोधत होतं बहुतेक.

"काय गं हे काळंपांढरंच तर आहे. सोनेरी नव्हतं का एखादं?" तेव्ह्ढ्यात माझी तक्रारही करुन झाली. पण लगेच ते मी विसरुनही गेले. कुठल्याही मांजरावर तसं नाराज होणं कठीणच ना.. :) तळहातापेक्षा थोडं मोठं असं ते एक काळं पांढरं गोड पिल्लू होतं. त्याच्या शेपटीचं टोक गडद काळं होतं. पिल्लाचं नामकरण 'चिमा' असं करण्यात आलं. पुढे कायम आम्ही तिला (ती मांजरी होती) चिमा याच नावाने हाक मारत असू. नाव ऐकून लोक लगेच म्हणायचे "चिमा काय कामाची!". मग लहान वयातील अकलेला अनुसरून यातल्या शाब्दिक खुबीपेक्षा अर्थाकडे जास्त लक्ष वेधून मी फणकार्‍याने "काही नाही. कामाचीच आहे माझी चिमा" वगैरे म्हणायचे.

मांजरं अधिक आकर्षक दिसतात ती त्यांच्या डोळ्यांमुळे असं माझं ठाम मत आहे. राखाडी पासून हिरव्या (त्यातही पिस्ता, गडद हिरवा), निळ्याशार आणि अगदी पिवळया ते तपकिरी भुर्‍या रंगाचे ते गोल मणी बहुतेकांना लबाड आणि धूर्त वगैरे वाटतात पण मला मात्र त्यांच्या डोळ्यात खट्याळपणा, थोडा वात्रटपणा आणि कमालीचं औत्सुक्य दिसतं. त्या पारदर्शक डोळ्यांतली बाहुलीची उभी रेघ काळोखात पाहिल्ये कशी रुंदावते? कुठे काही खुसपूस झाली की त्या गोल किंवा बदामाच्या आकाराच्या डोळ्यांमध्ये प्रचंड कुतुहल दाटतं आणि मग या औत्सुक्यापोटी पुढे घडणारी मजेदार पळापळ तुम्ही चुकवलीत तर एका मोठ्या आनंदाच्या ठेव्याला तुम्ही मुकलायत! आमच्या पहिल्या मांजराच्या डोळ्यांमध्ये हिरवट झाक होती तर चिमाच्या डोळ्यांचा रंग वाळक्या पानांसारखा होता. अर्थात दोघांचाही डोळ्यांत खट्याळपणा पुरेपूर दिसायचा. (चिमाच्या डोळ्यात थोडा लबाडपणाही!) तसेच त्यांचे उभे कान! बहुसंख्य वेळा एक कान समोर असतो आणि दुसरा कान मात्र वारंवार कडेला टवकारायचा उद्योग प्रत्येक मांजराचा सदैव चालू असतो. अगदी निद्रावस्थेतही कान पुढेमागे करणं आपलं चालूच असतं. कदाचित "आपल्या पाठीमागे शेजारच्या कॉलनीतल्या त्या चहाटळ मांजर्‍या काय बोलत असतात" हे जाणून घेण्याच्या औत्सुक्यापोटी मांजरं असं करतही असतील. मांजराच्या कानाला त्याच्या नकळत हलकेच बोटाने पटकन स्पर्श करुन बघा, संवेदनशील मांजर लगेच तो कान असा झटकेल आणि आरस्पानी डोळ्यांनी एक क्षण तुमच्याशी नजर मिळवून दटावेलही. चिमाला असा त्रास आम्ही भरपूर दिला. तिच्या शेपटीचं टोक तिच्या कानात घालणे किंवा तिला आरशासमोर नेणे असले सतावण्याचे उद्योगही चिक्कार केले.

निखळ करमणूक हवी असेल तर मांजर आणि आरशाची गाठ घालून द्या. पुढचा तासभर हसला नाहीत तर मला सांगा! मला आठवतंय, चिमाने पहिल्यांदा स्वत:ला आरशात पाहिलं तेव्हा बाईसाहेब चक्क घाबरल्या होत्या. तिथनं आधी तिने धूम ठोकली पण ही नवीन मांजरी कोण घरात शिरलीय हा विचारांचा भुंगा तिच्यामागे लागला असणार कारण हळूच, दबकत आणि कानोसा घेत घेत, शेपटी फुलारुन थोड्या वेळाने ती परत आरश्याजवळ आली. म्याव करुन पाहिल्यावर कळलं की आरश्यातलीसुद्धा म्याव करते. मग जरावेळ म्यावम्यावचं सेशन झाल्यावर आरश्यावर एक डावली मारुन झाली. तर तस्साच प्रतिसाद आरसावालीनेही दिला की! हे असं जवळजवळ अर्धाएक तास चालू होतं. चिमाचा एकंदर अविर्भाव, आरसावालीला देत असलेल्या हुलकावण्या आणि विविध पट्ट्यांमधलं म्यावम्याव पाहून हसून हसून पोटात दुखायची वेळ आली. या आणि इतर नानाविविध प्रकारे मांजरांशी खेळणं (आणि तितकंच सतावणं) इतकं केलंय ना की ’मांजरांशी खेळण्याचे एकशे एक मार्ग’ वगैरे आता मी लिहू शकेन.

म्हणता म्हणता चिमाबाई मोठ्या झाल्या. "काय म्हणतायत तुमच्या चिमाताई" लोक येताजाता विचारु लागले. आता आमच्या या उपवर कन्येची आम्हाला चिंता वाटू लागली कारण घरापेक्षा पंचक्रोशीत फिरणे तिला जास्त आवडू लागलं. पण मार्जारजगतातील जगरहाटीनुसार तिने लवकरच बाहेर कोणीतरी 'खास' शोधून काढले आणि आम्ही चिंतामुक्त झालो. त्याचा परिणाम तिचं पोट वाढल्यावर लक्षात आलाच आणि मग वाटलं किती पटकन मोठी झाली! कालपर्यंत छोटी चिमा होती की ही!

आईने गॅलरीतल्या ओट्याखाली चादरीचा आडोसा लाऊन चिमासाठी स्वतंत्र खोली केली. आणि तिथल्या त्या वेताच्या टोपलीत चिमाने दोन (होय फक्त दोनच) पुत्ररत्नांना जन्म दिला. दोघं स्वतंत्र पणे स्वत:च्या पायवर उभे राहून स्वत:ची काळजी घेऊ शकतील तोपर्यंत चिमाने त्यांना वाढवलं पण नंतर मात्र तिने बाहेर वेगळं जग शोधलं असेल म्हणा किंवा इतर काही कारण असेल पण तिचा आमच्याकडचा वावर कमी कमी होत गेला. नंतर ती आम्हाला कधीही दिसली नाही.