ईऽऽग् पेई (एकच प्याला)

मंगळवारी संघ्याकाळी थेट कचेरीतूनच ७.३० ला निघालो आणि विमानतळ गाठला. pyalaरात्री साडेअकराचे उड्डाण, सकाळी सकाळी - छे सकाळ कसली भल्या पहाटे सव्वा पाचला बँकॉक, पुढचे शांतो चे उड्डाण साडेअकराला, अर्ध्या तासाचा उशीर धरून दुपारी चारच्या सुमारास शांतो. देशप्रवेशाचे सोपस्कार संपवून सरकपट्ट्यावरऊन सामान घेउन बाहेर पडायला साडेचार. बाहेर नामफलकधारी हजर होताच, त्याच्या बरोबर गाडीत जाउन बसलो. हस्तसंच किणकिणला - नक्की हुंगयान असणार. तीच होती. बराच वेळ संपर्क होत नसल्याने समजून चुकली होती की विमान उशीराने येत असावे. ती हॉटेलवर वाट पाहत होती. एकूण मुक्कामी पोचुन खोलीत सामान भिरकावेतो साडेपाच होऊन गेले होते.  बाहेरच हुंगयान भेटली, आवरून ये, मग बोलु म्हणाली. आम्ही खोलिचे चावीपत्र नाब्यात घेतले व तिला, 'आलोच' असे म्हणत खोलीकडे झेपावलो. तब्बल वीस तास प्रतीक्षा-प्रवास-प्रतीक्षा-प्रवास यामुळे अक्षरशः: पकलो होतो.पण इलाज नव्हता. साडेसहाची वेळ ठरवुन बसलो होतो. झटपट तुषारस्नान केले आणि कपडे चढवणार इतक्यात खोलीतला दूरध्वनी घणघणला. डेला बोलत होती. त्यांचे संचालक शांघायला कामात अडकल्याने येऊ शकले नव्हते, त्यांच्यातर्फे दिलगिऱी व्यक्त करीत तिने बैठक रद्द झाली असली तरी भोजनाला जायचा आग्रह केला. पण संचालक नव्हते, त्यांना तसेही उद्या भेटायचेच आहे, तर आज न गेले तरी चालेल असा विचार करीत मी उद्याची वेळ नक्की करवित सुटका करून घेतली आणि संध्याकाळ मोकळी असल्याची बातमी हुंगयानला कळविली. 'ठिक, आहे बरेच झाले, दमला असशील थोडा आराम कर मग भेटु' म्हणाली. साडेसहाला मी स्वागतकक्षात आलो तर हुंगयान व चेन हजर होते.

 चीनी भाषेत हुंग म्हणजे लाल रंग. हुंगयान म्हणजे आकाशातला लालिमा, आरक्त भासणारे आकाश. गंमत म्हणजे तिच्या मुलाचे नाव लेइमिंग. म्हणजे उगवता सूर्य! वा रे वा. याला म्हणतात रसिकता. हुंगयान मोठी हुषार. मला इतक्या लवकर जेवायची सवय नाही. थकुन आल्यामुले व संध्याकाळ झाल्याने कुठे लांब भटकायला जाणेही शक्य नव्हते. तिने मस्त उपाय शोधला होता. आम्ही हॉटेलच्याच चहा-कॉफी पानगृहात आलो. संध्याकाळ घालवायला चहा आणि गप्पा यासारखा विरंगुळा नाही. मला चीनी छा आवडतो, विशेषत: चावज्झौ चा सुप्रसिद्ध कूंगफू छा हे तिला माहित होते.

f tea1 यावेळी मात्र मला नेहेमीचा कूंगफू चहा देण्या ऐवजी आपण जरा वेगळा 'हटके चहा' घेउया असे म्हणत तिने चहाची पुस्तिकाच माझ्या हातात दिली. बापरे, किती प्रकार त्या चहांचे. मग आज फुलांचा सुगंधी चहा घेण्याचे ठरले. आम्ही शेवंतीचा मंद सुगंधी चहा घेण्याचे ठरविले आणि तशी मागणी केली. आम्ही प्रवास कसा झाला, आता पुढील दोन दिवसात कोणा कोणाला भेटी द्यायच्या, सध्या बाजारपेठ कशी आहे वगैरे गप्पा मारत असतानाच सेविका पेले घेउन हजर झाली. kettleनेहेमीचे चिमुकले चिनी पेले न आणता यावेळी चक्क नाजुक असे काचेचे पेले आले होते. बरोबर दांडीच्या काचेच्या मोठ्या पेल्यांमध्ये प्यायचे पाणी होते. चहाचे साहित्य वा चहा मात्र दिसला नाही. मागुन येत असेल असे मनात म्हणत असतानाच बाईसाहेब काचेच्या पारदर्शक किटलीत हलक्या सोनेरी रंगाचा चहा घेउन आल्या. पेल्यांमध्ये सळसळता सोनेरी चहा ओतताच एक मंद सुगंध मनाचा थकवा दूर करून गेला. आम्ही पेले उचलून दोन घोट घेतो न घेतो तोच बाईसाहेब एक छीद्रे असलेली काचेची हंडी घेउन आल्या. त्या हंडीच्या तळात एक बैठी, जाडजुड अशी पांढरी मेणबत्ती होती. बाईंनी मेणबत्ती पेटविली आणि मग ती काचेची किटली त्या हंडीवर ठेवली. मंद आचेवर आमचा चहा थंड न होता उबदार राहणार होता. रटरटणार तर नाही पण निवणारही नाही अशी चहा देण्याची पद्धत मला फारच आवडली. बरोबरच आहे, फुलांचा चहा असा नजाकतीनेच पेश व्हावा! मंद प्रकाशयोजना असलेल्या त्या दालनात किटलीखालच्या हंडीतुन मेजावर झिरपणारा सोनेरी प्रकाश खुलुन दिसत होता. थकवा कधीच दूर पळाला आणि माझी संध्याकाळ सोनेरी झाली.

त्या चहापानाने माझ्या इथल्या पहिल्या चहापानाच्या आठवणी जाग्या झाल्या. अगदी पहिल्यांदा जेव्हा मी चावज्झौला आलो होतो, तेव्हा थूंग फु टी नामक दुकानात मंडळी मला घेउन गेली होती. आता बऱ्याच वेळा जा ये केल्यावर ठिकाण माझ्या साधारण लक्षात होते. ताई युवानच्या प्राचिन मंदिराकडे जायच्या मार्गावर गजबजलेला बाजाराचा रस्ता सुरू होण्या आधीच्या चौकात डावीकडे वळले की लगेच रस्त्याच्या उजव्या अंगाला हे दुकान होते. दुसऱ्या दिवशी मी सकाळीच हूंगयानला सांगितले की आज कामे संपली की संध्याकाळी कूंग्फु छा प्यायला जायचेच!

chahapaan1संध्याकाळी दुकानात शिरताच वुन, म्हणजे त्या दुकानाच्या मालकिणबईंना हुंगययानने सांगितले की हा परदेशी पाहुणा तुझ्या 'छा' ची तारीफ करत मुद्दाम पुन्हा एकदा आला आहे. वुनला अर्थातच आनंद झाला. मग स्वागत करीत वुनबाई आम्हाला आत मोठ्या मेजावर घेउन गेल्या. इथल्या छा पेक्षा मला भावले होते ते चहापानाचे संस्कार आणि सोपस्कार. 'उदर भरण नोहे' च्या चालीवर 'चहा ढोसणे नोहे' असे मनात आले. वुनने बोलबोलता सामग्रीची मांडामांड सुरू केली.  कोपऱ्यातला विद्युत जलतापक, शेजारी विजेवरच काम करणारी छोटी किटली, अलीकडे छा बनवायची किटली, sancha   सुरेख कोरीवकाम केलेल्या अंडाकृती तबकात मांडलेले भातुकली सारखे चिमुकले पेले, छा ची पत्ती डब्यातुन काढायचा मापट्याच्या आकाराचा लाकडी चमचा, गरमागरम छा भरलेली बोळकी उचलायचा लाकडी चिमटा असा एकुण जामानिमा होता. एकुणच छाचे वातावरण मस्त तयार झाले होते. इथले चहा प्यायचे पेले अक्षरशः: भातुकलीतल्या बोळक्यांसारखे. तीच गत किटलीची, तिही चिमुकली. चिनी मातीच्या पेल्यांचे व किटल्यांचे असंख्य रंगातले वा साध्या लालमातीतले व आतून झळाळी दिलेले असंख्य प्रकार. खाली त्याच रंगात चीनीमातीचे भांडे, वर भोके असलेली चीनी मातीचीच ताटली, ज्ययोगे सांडलेला छा खाली भांड्यात जमा होत राहील. हे असे चिमुकले संच अगदी रस्त्यापासुन ते विमानतळापर्यंत सर्वत्र विकायला असतात.

chahapaan3

सामानाची सिद्धता होताच वुनने नेम धरून मोठ्या विद्युत लिटलीतले गरम पाणी ओतले ते बरोब्बर छा ची पत्ती भरलेल्या छोट्या किटलीत. एक थेंबही न सांडता सगळे पाणी जागेवर गेले. आता हा छा तयार होइपर्यंत पुन्हा किटली पाणी तापवायला गेली. तबकातले ओळीने मांडलेले चीनी मातीचे लहानसे पेले जलतरंगाची आठवण करून देत होते, आकाराने लहान होते इतकेच. प्रथम ओतलेला छा हा प्यायचा नसतो. तो डाव देवाला! आतला फीक्क्या रंगाचा छा तसाच ओतुन टाकायचा आणि लगोलग पेले पुन्हा भरायचे. जसजसा हे चहापानाचे कार्यक्रम पार पाडत गेलो तसतसे त्यातले बारकावे समजु लागले. पहीला डाव देवाचा. मग पुढचे तीन पेले चढत्या क्रमाने गडद होत जाणारे. मग नंतरचे दोन तीन पेले मस्त कडक छा. विशेषत: थंडी असेल तेव्हा बारक्या पेल्यांमधले घोट एका मागुन एक घेत राहावेत असे वाटायचे. जणु तो एकच प्याला कधी संपुच नये असे वाटायचे. नाहीतरी इथे परत आल्यावर इतका निवांतपणा कुठला आलाय?

tea scene

या चहापानगृहात एक चीनी शैलीतले एक सुंदर असे चित्र लावलेले होते. लांब कुठेतरी निसर्गाच्या कुशीत एखाद्या विश्रामस्थळी राजे साहेब आणि राणीसरकार पट खेळत आहेत, दासी वारा घालते आहे, दास हातातल्या तबकात छा चे पेले घेउन उभा आहे. शेजारीच एका दालनात छाचे सहित्य मेजावर मांडलेले आहे. मला खूप पूर्वी हसमुख चहाच्या दुकानातली दाराच्या पत्र्यावर रंगवलेली देव आनंद, हेमामालिनी वगैरे चित्रतारकांची हातात चहाचा पेला घेतलेली चित्रे आठवली.

su बाकी आपला देश असो वा चीन. चहाच्या बाबतीत एक साम्य मला आढळून आले. गाडी अडली आहे असे वाटले, बोलणी खुंटत आहे असे जाणवले तर मदतीला चहाचा पेला धावुन येणार. सु महाशयांच्या कचेरीत आमची बोलणी एका जागी अडकली. तोडगा निघणे आवश्यक होते. विचारमगग्न सु महाशयांनी त्यांचे मेज सोडुन मला पलीकडील बैठकीत निमंत्रीत केले व सरळ छाच्या तबकाला हात घातला. क्षणात पाणी उकळून तयार झाले, सु महाशयांनी जातीने छा बनविला आणि पटापट पेले भरयला सुरुवात केली.

wash

चहापानातली चहा बनविण्या इतकीच महत्त्वाची आणि कौशल्याची गोष्ट म्हणजे हात न भाजता प्रत्येक चहापान फेरी नंतर चिमुकले पेले गरम माण्याने विसळणे! छा पिऊन झाला की सर्वांचे पेले पटापट उचलून तबकात गोळा करायचे. आता पहिला छा दिला तेव्हा पत्तीमध्ये पाणी पुन्हा घातलेले असते, पुन्हा छा तयार झालेला असतो. तो काढा व्हायच्या आत झटपट गरम पाण्याने सगळे पेले धुवायचे आणि पुन्हा ताजी फेरी सुरू करायची.

wash1

हे काम वाटते तितके सोपे नाही हे डेलाने सांगताच बघुयाच काय ते असे म्हणत आम्ही सरसावलो. मात्र भांड्यात गरमागरम पाणी भरताच ते उचलायचे म्हणजे सोपे नाही हे लक्षात आले. मग डेलाने ऐटीत पेले उचलत दाखवले की प्रथम एका पेल्यात गरम पाणी भरायचे, व एक एक करत सर्व पेले त्यात हात भाजायच्या आत गोलगोल फिरवुन विसळायचे व शेवटी तो पेला रिकामा करून त्याव्रून पाणी टाकुन घ्यायचे. डेलाची भांडे पटापट गोल फिरविणारी बोटे आमची दाद घेउन गेली.

ranga chahachaछा ची आणखी एक गंमत म्हणजे जेवणाच्या आधी घ्यायचा क्षुघावर्धक छा वेगळा आणि जेवण झाल्यावर निवांतपणे घोट घोट घ्यायचा पाचक छा वेगळा. जेवण झाल्यावर मी हात अजमावला आणि दोन - तीन पेले भरले. लगेच फेनीने मला दाखवुन दिले की नीट पाहताच सर्व पेल्यातला चहा कमी अधिक गडद दिसत होता. मग तिने स्मितहास्य करीत मला त्यातली गोम शिकवली. छा एकीकडे मुरत असतो. त्यामुळे शेवटच्या पेल्याशी येई पर्यंत तो अधिक गडद होतो. यासाठी सगळे पेले शेजारी ठेवायचे आणि संततधार ओळीने सर्व पेल्यात नाचवित न्यायची म्हणजे सर्व पेल्यातल्या छाचा रंग एकसारखाच दिसतो. एकंदरीत प्रत्येक चहापानात काहीना काही नवे समजते असे म्हणायला हृरकत नाही. मात्र एक खरे, की पेले चिमुकले असल्याने आपण आग्रहाखातर एक एक पेला घेत राहतो आणि मग किती चहा सामावुन घेतला ते आपल्यालाच समजत नाही. तर असा हा एकच प्याला. धावपळीच्या, दगदगीच्या रोजच्या जीवनात थोडा विरंगुळा देणारा, चार आनंदाचे क्षण देणारा.