रुपेरी पडद्यामागचा सिनेमा - गुड्डी

Guddi

गुड्डी म्हणजे गुडिया. बाहुली. दहावीत शिकणारी कुसुम अशी बाहुलीसारखीच आहे. निरागस, निष्पाप - काहीशी भोळीही - जे बघेल, ऐकेल त्यावर विश्वास ठेवणारी. वास्तवाशी जाण नसलेली, किंबहुना स्वप्ने सोडून जगात काहीतरी इतर वास्तव असते हेही माहिती नसणारी. हे वयच असे स्वप्नप्रधान असते. या वयात मन असे स्वप्नांत रमते. गुलाबाची अर्धवट उमललेली कळी, मावळत्या सूर्याचे रंग, एखाद्या लहान बालकाचे हास्य असे काही पाहिले की मनाचे फुलपाखरू होते. अशा वयात कवितांच्या पुस्तकात गुलाबाचे फूल वगैरे ठेवले जाते. मग या स्वप्नांत एखाद्या अबलख वगैरे घोड्यावरून स्वार होऊन कुठलासा राजकुमार येतो...

गुड्डीच्या स्वप्नात असाच एक उमदा राजकुमार आहे. धर्मेंद्र. तोच तो रुपेरी पडद्यावरचा हीरो धर्मेंद्र. आता तो आपल्याला अप्राप्य आहे, इतके गुड्डीला कळते आहे, त्याचे लग्न झालेले आहे, हेही तिला ठाऊक आहे. पण त्याने काय बिघडते? गुड्डीचे प्रेम हे मीरेच्या प्रेमासारखे पवित्र आहे. तिच्या हिंदीच्या पुस्तकात मीरेचा धडाच आहे 'प्रेम सच्चे असले की जगाची सगळी बंधने आपोआप गळून पडतात...' धर्मेंद्रच्या प्रेमात असाच सर्वस्वाचा त्याग करून संन्यासिनीचे आयुष्य जगणे ही गुड्डीची महत्त्वाकांक्षा आहे. पण हे सगळे तिच्या मनात, अगदी आतल्या आत आहे. तिच्या घरातल्या इतर लोकांना - तिचे वडील, मोठा भाऊ व वहिनी यांना याची अजिबात कल्पना नाही. गुड्डीवर आईसारखी माया करणाऱ्या तिच्या वहिनीच्या मनात गुड्डीसाठी आपला भाऊ नवीन आहे. नवीन हा इंजिनिअर - नोकरी शोधतो आहे -स्वभावाने जरासा गंभीर - वाचन, लेखन यांच्यात रमलेला -त्यालाही गुड्डी आवडते आहे. हे सगळं जमून आलं तर बरंच आहे, पण या सगळ्यात मध्येच घुसलेला तो धर्मेंद्र - त्याचं काय?

मग कधी ना कधी तरी फुटणारे हे बिंग फुटतेच. नवीन गुड्डीला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न करतो. स्वप्न आणि वास्तव यातला फरक. पण गुड्डीला हे काही कळतच नाही. तिचे वयच तसे आडनिडे आहे...

मग नवीनच्या मदतीला धावून येतात त्याचे मामा आणि मित्र प्रोफेसर गुप्ता. हे मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत, पण माणूस प्रोफेसर म्हणून शोभणार नाही इतका हसतमुख आणि गमत्या. त्यांना गुड्डीच्या मनातली ही उलाघाल बरोबर समजते. या मुग्ध बालिकेला वास्तव म्हणजे काय हे समजून तर सांगायचे, पण ते करत असताना तिला त्यात कुठेही मानसिक धक्का बसू द्यायचा नाही यासाठीची योजना ते आखतात. आणि त्यात त्यांना साथ मिळते ती खुद्द धर्मेंद्रची! अपेक्षेप्रमाणे ही योजना यशस्वी होते, गुड्डीच्या मनातले सिनेमाचे खूळ निघून जाते, तिला वास्तव आणि त्यातला तिचा हीरो नवीन दिसू लागतो, आणि त्या दोघांचे गोड वगैरे मीलन होते..
अशी ही गुड्डीची कथा.

तेजस्वी नायिकेसमोर केवळ एखाद्या शामळू बंगाली तरुणाला फिल्म लायनीत 'चान्स' द्यायचा म्हणून नायक म्हणून सादर करणे हे अगदी बिमल रॉयपासून (परख) सगळ्या बंगाली दिग्दर्शकांनी केले आहे. जया भादुरीसमोर समीत भांजा म्हणजे जी. ए. कुलकर्णींसमोर वि. आ. बुवा, कुसुमाग्रजांसमोर चंद्रशेखर गोखले, शेरलॉक होम्ससमोर 'साता जन्माच्या गाठी', चिकन बिर्याणीसमोर फोडणीची पोळी, स्मिरनॉफसमोर आंबलेली ताडी... या सिनेमात अमिताभला हीरो म्हणून न घेण्याचा ऐनवेळी हृषिदांनी घेतलेला निर्णय त्यांच्या कारकीर्दीमधील ('झूट बोले कौव्वा काटे' बनवण्याच्या निर्णयाखालोखाल) सर्वात चुकीचा ठरला असेल. सुमीता संन्याल बाकी या सिनेमात गुड्डीची सालस वहिनी म्हणून अगदी शोभून दिसते.

उत्पल दत्तविषयी काय लिहावे? कुणालाही आपला मामा असाच असावा असे वाटेल. एकमेकांना 'स्टॅच्यू' करून थांबवण्याची तशी बालिश कल्पना उत्पल दत्त आणि जया भादुरी यांनी काय पातळीवर नेली आहे! चांगला दिग्दर्शक , चांगले संवाद असले की जातीचा कलाकार कसा लखलखून उठतो, ते उत्पल दत्तचा अभिनय पाहून शिकावे. एकच प्रसंग लिहितो. गुड्डी आणि नवीनच्या लग्नाची डायनिंग टेबलवर चर्चा सुरू असते. उत्पल दत्त पुडिंग खात असतात. गुड्डी या चर्चेविषयी नाराज होऊन फुरंगटून "मामाजी.." असे म्हणते. त्यावर हा प्रोफेसर मामा म्हणतो,"अरे भाई, इतनी जल्दी भी क्या है, पहले पुडिंग तो खत्म करने दो, फिर देख लेते है.." या सहजसुलभ संवादाला आणि दत्तसाहेबांच्या 'टायमिंगला' दाद द्यावी तितकी कमीच. आपल्या भाच्याला, नवीनला, प्रत्येक वेळी नवीन नावाने बोलावण्याची -कधी 'रामप्रसाद' कधी 'मुरारीलाल' त्यांची अदाही भन्नाटच.  

असे लहानलहान पण चिरोट्यासारखे अरळ आणि पदर सुटलेले प्रसंग ही हृषीकेश मुखर्जींच्या चित्रपटांची खासियत. गुड्डीचे निवृत्त वडील हंगलसाहेब. सतत बुद्धिबळात गुंतलेले. नवीन गावाहून आल्याआल्या त्यांच्याशी खेळायला बसतो. दोघेही खेळात हरवून जातात. नवीनची बहीण तिथे येते. "मामाजीका क्या हाल है?" ती विचारते. खेळात बुडालेला नवीन म्हणतो,"बहुत बुरा है, घोडा मर गया है"! गुड्डी धर्मेंद्रच्या प्रेमात पडली आहे हे ऐकून मामाजी खदखदून हसत विचारतात, "धर्मेंद्र? वो शरमीला धर्मेंद्र? फिल्म हीरो?", धर्मेंद्रला भेटण्यासाठी फिल्म लायनीत ओळख असलेल्या आपल्या देशपांडे नावाच्या मित्राला गुप्ताजी फोन लावतात तेव्हाचे देशपांडेंचे फिल्म लायनीविषयीचे विचार मुळातूनच ऐकले पाहिजेत. "....अंत में जब हीरो विलन का पीछा करता है... कुछ घोडोंपर, कुछ ट्रेनोंमें, कुछ पैदल..." असे सगळेच कमर्शियल सिनेमाची खिल्ली उडवणारे. प्रत्यक्षात धर्मेंद्रला भेटल्यावर गुड्डीसारख्या हजारो मुली तुमच्या प्रेमात पडल्या आहेत (हे ऐकून धर्मेंद्र मिश्किलपणे म्हणतो" मै तो आजकल राजेश खन्ना का नाम सुन राहा हूं!)  याची मानसशास्त्रीय कारणे गुप्ताजी सांगतात, "तुम्ही लोक विमानातून उडी मारता आणि तुम्हाला काहीही होत नाही .... इतनाही नही उठके फिर गानाभी शुरू कर देते हैं." गुड्डीला फिल्मी दुनियेतला खोटेपणा कळावा म्हणून मामाजी तिला शूटिंग दाखवायला नेतात, त्यावेळी छोट्या छोट्या प्रसंगांत दिसणारे दिलीपकुमार, नवीन निश्चल, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना गंमत आणतात. अशोककुमारचा एक सीन तर खलासच.

जया भादुरीचा हा पहिला चित्रपट. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी ट्वेंटी मॅचमध्ये युवराजसिंगने जसे केले तसे काहीसे या सामान्य चेहऱ्याच्या, लहानखुऱ्या चणीच्या आणि भावपूर्ण डोळ्यांच्या मुलीने केले आहे. धर्मेंद्रची 'डाय हार्ड' फॅन असलेली ही मुलगी दिलीपकुमारच्या चित्रपटांविषयी बोलताना 'दलीप' ची नक्कल करते तो एकच प्रसंग आठवा. जया भादुरीची यापुढील स्तुती करणे वाचकांच्यावर सोपवतो...

असरानी या चित्रपटात 'हीरो' बनण्याच्या स्वप्नाने पछाडलेल्या आणि मुंबईत येऊन स्वप्नभंग झालेल्या एका प्रातिनिधिक तरुणाची भूमिका करतो. त्याचे कपडे, विस्कटलेले केस -  जुल्फेंच म्हणाना - , त्याच्या स्वतःविषयीच्या अवास्तव कल्पना ... हे असले कित्येक 'कुंदन' आपल्या आसपास वावरत असतात. आपण हीरो होणार आहोत हे आपल्या आईला सांगताना आपली हिरॉईन म्हणून "सुना है साधना से बात कर रहे हैं वो लोग.." हे त्याचे किंचित लाजून म्हणणे ऐकावे. यावर त्या अडाणी निरक्षर आईचे "साधना? कौन? वो बन्सी की चाची?" हा खास हृषिदा पंच! केश्तो मुखर्जीही एकाच प्रसंगात जबरदस्त भाव खाऊन जातो. 

'गुड्डी' मध्ये हृषिदांनी फिल्म लायनीवर काही गंभीर भाष्यही केले आहे. प्राणसारख्या अट्टल खलनायकाचा सज्जनपणा (प्राण बाकी या सीनमध्ये प्रचंड अवघडलेला आणि कृत्रिम वाटतो, ते सोडून द्या!), कवडीचुंबकाचा रोल करणाऱ्या ओमप्रकाशचा दिलदारपणा आणि शिराजसारख्या गेल्या जमान्यातल्या नटावर दुय्यम -तिय्यम रोल करण्याची आलेली वेळ... या सगळ्यात 'हीरो' चे फोटो काढण्यासाठी धडपडणाऱ्या फोटोग्राफरची अगतिकता आणि जळून खाक झालेल्या स्टुडिओमध्ये भूतकाळात हरवून गेलेला धर्मेंद्र... हे सगळे कुठेतरी खोल जाऊन पोचते. आपल्यालाही थोडे थांबून सगळेच तपासून बघावे असे वाटते. 

'गुड्डी' मधली गाणी गुलजार यांची आहेत आणि संगीतकार वसंत देसाई. 'पपीहरा' तर ऑल टाईम ग्रेट आहेच, पण 'हमको मनकी शक्ती देना' ही प्रार्थनाही सुरेख. 'आजा रे परदेसी' हे बाकी हृषिदांना यात का घ्यावेसे वाटले असेल, काही कळत नाही.

कधी वाटते की गुड्डीसारखी एक धाकटी बहीण असावी. तिचा हात हातात घ्यायला नवीनसारखा एखादा सज्जन मुलगा सामोरा यावा. तिच्या आयुष्यातील गुंता सोडवणारा एखादा देवमाणूस प्रोफेसर गुप्ता भेटावा, आणि शेवटी 'आणी मग राजा-राणी' सुखाने नांदू लागली' च्या धर्तीवर सगळे आबादीआबाद व्हावे, आणि आपण गुप्तासरांसारखेच आभाळाकडे हात जोडून कृतज्ञतेने म्हणावे, "जय धर्मेंद्र!"
हृषिदांचा 'गुड्डी' असा माणसातल्या चांगुलपणावर परत  विश्वास टाकावा, असे वाटायला लावणारा आहे.