निकृष्ट पत्रकारितेचा कहर

भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दैनिकात वाचलेली बातमी. ती वाचून वाटले की हे लोक स्वत:च्या वृत्तपत्राला वाचक मिळावेत म्हणून एखाद्या गोष्टीला मोठ्ठी करून सांगतात.

बातमी अमिताभ बच्चन ह्यांच्या आई श्रीमती तेजी बच्चन ह्यांच्या अंत्यसंस्काराची.
दि. २३ डिसे. २००७ ला मुंबई मिरर ह्या दैनिकाच्या पहिल्या पानावर लिहून होते, Surprize Visitor at Teji's Funeral.
ह्या बातमीत आत काय लिहिले होते?
"विवेक ओबेराय ने अचानक श्रीमती तेजी बच्चन ह्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचून इतरांना आश्चर्याचा धक्का दिला. अभिषेक/ऐश्वर्या त्यांच्याशी अंतर ठेवून होते. अमिताभ, अमर सिंग आणि निखिल नंदा ह्यांचे चेहऱ्यावरील भाव चुकवू नका. वगैरे वगैरे."

त्यांच्या संकेत स्थळावर आणखीही विचित्र प्रकारे छायाचित्रांना वाक्ये जोडलेली आहेत. अभिषेक-ऐश्वर्या एकत्र बसले असताना त्याचा मथळा लिहिला "जोडी कमाल की" आणि पुढे लिहिलेले- आम्ही दोघांना विचारांत गुंग असताना छायाचित्र घेतले.

अरे, काय चाललंय काय? [float=font:dhruvB;place:top;]एखाद्याच्या अंत्यसंस्काराला कोणी माणूस पोहोचला तर त्यात तुम्हाला एवढी मोठी बातमी बनवायची गरज काय?[/float] मी तर म्हणतो हक्कच काय? आणि त्यांना दु:खाच्या प्रसंगी तरी सोडा. जर त्यांना काही नाही आवडले तर ते बघून घेतील.

पूर्ण बातमी (वाचावीशी वाटल्यास) इथे  पहा.

तसेच टाईम्स ऑफ इंडीया मध्येही पहिल्या पानावर अभिषेक-ऐश्वर्याचे छायाचित्र आणि मथळा "कुछ ना कहो". अरे, फिल्मी ढंगात लिहायला ही बातमी पाहिजे का तुम्हाला? इतर ठिकाणी वाट लावताय ते पुरे नाही का?

लोक  कुठल्या थरावर जाऊन काय लिहितील ह्याचा काही नेम राहिला नाही असे वाटते. निकृष्ट पत्रकारितेचा हा कहर झाला असे वाटते. तो प्रकार इतरांना कळावा म्हणून हा लेख.