प्रवास तीन चाकींचा

तीन चाकी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती बजाजची ऑटो रिक्षा. हो ना? तसा तीन चाकीचा प्रवास सुरू आहे तो साध्या सायकलच्या प्रेरणेतून बनलेली तीनचाकी सायकल जिथे एक मनुष्य ती सायकल चालवतो आणि मागे आपण बसतो. आज सुद्धा दक्षिण भारतात या सायकल पाहायला मिळतात. या सायंकालांना मानवी शक्तीची मर्यादा होती. एका ढोरा प्रमाणे सायकल चालक बसलेल्या प्रवाशांना ओढत न्यायचा. तंत्रज्ञान नेहमीच बदलते. २ पेक्षा जास्त प्रवासी वाहून न्यायच्या या वाहन प्रकारात सुद्धा तंत्रज्ञानाने प्रगती केली. मनुष्याच्या शक्ती ऐवजी येथे काही अश्वशक्तींचे इंजिन आले आणि चालक हा स्वतःची शक्ती न खर्च करता फक्त युक्ती खर्च करून प्रवाशांची ने-आण करू लागला.

हॅनसीट

आता या तीन चाकींना आपण ऑटो रिक्षा म्हणतो. आज हा वाहन प्रकार भारतीय वाहन उद्योगाचा आणि अनेक भारतीयांचा एक अविभाज्य भाग आहे. काही लोकांकरिता एक प्रवासाचे साधन म्हणून तर काहींसाठी रोजच्या रोजी रोटीचा एक भाग म्हणून. आजच्या घडीला ३ चाकी वाहने विचारात घेतल्यास नजरे समोर प्रथम येतात ती वाहने म्हणजे बजाजची ऑटो रिक्षा अथवा मिनिडोर. पण या वाहन प्रकारातले पहिले व्यावसायिक वाहन म्हणजे टेम्पो हॅनसीट. आजची फोर्स मोटर्स (पूर्वा श्रमीची टेम्पो इंडिया आणि त्या पूर्वीची बजाज टेम्पो), या कंपनीने अंदाजे चार दशकापूर्वी जर्मनीच्या विडॉल अँड सोह्न टेम्पो वेर्के या कंपनीच्या साहाय्याने भारतात हॅनसीटचे उत्पादन सुरू केले. टू स्ट्रोक इंजिन असलेल्या या वाहनाने भारतीय वाहन उद्योगात तीनचाकी वाहनांचा पाया उभा केला असे म्हणण्यास काही हरकत नसावी. हे वाहन बर्‍यापैकी निर्यात होत होते. तसेच कालानुरूप नामशेष देखील झाले पण सन २००० साला पर्यंत या वाहनाने भारतात आणि भारता बाहेर देखील भरपूर धंदा केला.

बजाज ऑटोची ऑटो रिक्षा

या वाहन प्रकारात सर्वाधिक काळ राज्य करणारे वाहन म्हणून आपण ओळखतो ती म्हणजे बजाजची (बजाज ऑटो ही - बजाज ऑटो होण्यापूर्वी म्हणजेच २५ नोव्हेंबर १९४५ पूर्वी ती बचराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन होती ) ऑटो रिक्षा. आपल्यातल्या अनेकांनी या ऑटो रिक्षांमधले अनेक बदल अनुभवले आहेत. पूर्वी हि रिक्षा एफ इ (म्हणजेच फ्रंट इंजिन) म्हणून ओळखली जायची. नावा प्रमाणेच या रिक्षांमध्ये चालकाच्या आसना खालील जागेत याचे इंजिन होते आणि इंधनाची टाकी देखील पुढेच असायची. कालमाना नुसार रचनेत बदल होत गेले. इंधन टाकी आणि इंजिन मागे आले आणि एफ इ चे आर इ (रिअर इंजिन) झाले. हि रिक्षा पेट्रोल इंधन म्हणून वापरायची आणि आसन क्षमता तीन होती/आहे - ३ प्रवासी.  या रिक्षांनी जनसामान्यांच्या मनात घर केले होते. काहींसाठी ती परवडणारी टॅक्सी होती, काहींसाठी काका/मामाची शाळेतून ने-आण करणारी गाडी होती.

या वाहन प्रकारात बजाज ऑटोची रिक्षा राज्य करत असताना जोरदार आगमन केले ते म्हणजे ग्रीव्हज गरूड या डिझेल रिक्शाने आणि बजाजच्या साम्राज्याला बर्‍याच प्रमाणात आव्हान दिले. रिक्षा चालकांना/मालकांना डिझेलावर चालणार्‍या रिक्षांचा पर्याय उपलब्ध झाल्याने फायद्यात वाढ झाली. तसेच टप्पा वाहतुकीला मान्यता मिळाल्याने ग्राहकांना सुद्धा स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आणि उपनगरी आणि शहरी भागात या रिक्षांचा सुळसुळाट झाला. या उपलब्ध झालेल्या पर्यायाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला एक पर्याय तयार झाला. डिझेल इंजिनाची कंपने हा अवगुण होता. पण छोट्या अंतराची वाहतूक करणार्‍या सर्वसामान्य प्रवाशाला त्याच्याशी काहीच देणे घेणे नव्हते.

मिनीडोर

याच काळात अल्पावधीतच ग्रीव्हज गरूडाला एक जबरदस्त पर्याय आला, तो म्हणजे डिझेल इंजिनावरच पळणार्‍या परंतु आसन क्षमता ६ असणार्‍या टेम्पो मिनीडोरचा. या प्रकारात टेम्पो आपले वर्चस्व सिद्ध केले. भारत २ हे प्रदूषणाचे निकष पूर्णं करणारे इंजिन आणि ६ अधिकृत प्रवासी या दोन मोठ्या गुणांवर टेम्पोने बाजी जिंकली होती. या वाहनाने आजवर एकूण दीड लाखाच्या आसपास व्यावसायिक तयार केले आहेत. या वाहनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला एक पर्याय उभा केला अन शहरांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडू लागली. मिनीडोर प्रदूषण करते असे जनमत होवू लागले. पण शक्ती आणि इंधन क्षमता वाढवण्यासाठी चालकांनी अवैधरीत्या केलेले काही बदल प्रदूषणास कारणीभूत ठरते होते. तीन आसनी आणि सहा आसनी रिक्षा चालक/मालकांच्या संघर्षातून या रिक्षांना शहराच्या हद्दी बाहेर चालवण्याचे आदेश मिळाले.

याच दरम्यान पियाज्जिओ या इटालियन कंपनीने आपे ही तीन आसनी डिझेल रिक्षा आणली. आता एवढे सगळे सुरू असताना आपले बजाज शांत कसे बसेल? बजाजाने मधल्या काळात फोरस्ट्रोक इंजिनवाली पेट्रोल रिक्षा आणली. पण वाहन चालकांच्या तक्रारींपुढे त्यांना नमते घ्यावे लागले. आजच्या घडीला बजाज ऑटोने पेट्रोल-डिझेल-एलपीजी-सीएनजी या पर्यायांमध्ये टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक रिक्षा बाजारात आणल्या आहेत. मधल्या काळात विक्रम या कंपनीने सुद्धा ६ आसनी रिक्षा बाजारात आणली होती. पण त्यांना म्हणावे तितके यश मिळाले नाही. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे अधिकृतरीत्या ३ ते ६ प्रवासी वाहतूक करणार्‍या या सर्व वाहनांनी शक्ती ही ७ ते ९ अश्वशक्तीपेक्षा कमी म्हणजेच बाजारातल्या अनेक दुचाक्यांपेक्षा कमी असते. तसेच या वाहनांचा सर्वाधिक वेग तासाला ४५-६० किलोमीटर पेक्षा जास्त नसतो.

तीन चाकी वाहनांच्या या प्रवासात काही मुद्दे पुढे आले.

सकारात्मक मुद्दे :

  1. ज्याची स्वतःची चार चाकी घेण्याची क्षमता नाही अन दुचाकी चालवायची इच्छा नाही अशांसाठी एक चांगला पर्याय मिळाला.
  2. कमी वारंवारता असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय मिळाला.
  3. शा़लेय विद्यार्थ्याची वाहतूक करणे सोयीचे झाले.

नकारात्मक मुद्दे:

  1. राजकारण्यांच्या आणि प्रशासनाच्या दूरदृष्टीच्या अभावाने या वाहनांचा प्रचंड सुळसुळाट होवून आजच्या घडीला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पार कोलमडून पडली आहे. ती पुन्हा नव्याने उभारण्याच्या नावाखाली असणारी महामंडळे म्हणजे भ्रष्टाचार्‍यांसाठीचे कुरण झाले आहे.
  2. वाहनांमध्ये अवैधरीत्या केलेल्या बदलांमुळे प्रदूषणाचा मोठा प्रश्न उभा झाला आहे.
  3. आसन क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी भरून वाहतूक केल्याने सुरक्षिततेचा मोठा प्रश्न.
  4. रिक्षा चालक हि जणू नवी जमात बनली आहे. प्रवाशांची पिळवणूक करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क समजू लागले आहेत. संघटना करून कधी सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय करणे. राजकारणी आणि पोलिस यांच्याशी संगनमत करून सर्वसामान्य नागरिकाची लुबाडणूक करणे. मग ती प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष हे रिक्षा चालकांचे नित्यकर्म झाले आहे.

तीन चाकींच्या या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे या रिक्षा आता आणखी नव्या तंत्रज्ञानासह म्हणजेच कमीत कमी प्रदूषण, कमी कंपने इत्यादीसह येतील. जवळपास सर्वच कंपन्या या प्रकारच्या तंत्रज्ञानासह आपापली वाहने रस्त्यावर आणायच्या प्रयत्नात आहेत. पण आजवरच्या प्रवासात तीन चाकी रिक्षांनी अनेक रस्ते अस्ताव्यस्तपणे व्यापून, वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून रस्त्यांबद्दल, सुरक्षितते बद्दल, वाहतुकीच्या वेगांबद्दल अनेक प्रश्न उभे करून एक सामाजिक समस्या उभी केली आहे हे एक कटू सत्य आहे आणि या समस्येवर आपल्याला तोडगा हवा आहे.