खरं सांगायचं म्हणजे ... (२)

असाच मी एकदा 'मुस्कराहट' नावाचा सिनेमा पाहायला गेलो होतो. तो जंगल चित्रपट असावा अशी माझी कल्पना ! ब्रह्मपुत्रा नदीतल्या मगरीला मुस्कराहट म्हणतात हे सगळ्यांना माहीत आहे. माझ्या बायकोला अर्थात हे माहीत नाही. ती मुस्कराहट म्हणजे बंगाली पट्टेवाला वाघ असे समजते. बराच वेळ चित्रपट पाहिला तरी त्यात ब्रह्मपुत्रा नदीतली मगर दिसेना अगर बंगाली पट्टेवाला वाघदेखील दिसेना. तसा मी संतापलो. जाग्यावरून उठत मी संतापाने म्हटले, "ह्याचा जाब विचारलाच पाहिजे !" बायको 'अहो, अहो' म्हणून मला अडवू लागली. पण मी ताडकन उडी मारून पडद्यावर गेलो आणि सिनेमाच्या नायकाच्या हनुवटीवर ठोसा मारून त्याला खाली पाडले.नंतर झाडूने एका कागदाच्या तुकड्यावर त्याला ढकलले आणि त्या कागदाची पुरचुंडी करून खिडकीबाहेर टाकून दिली.

मग नायिकेकडे डोळे वटारून पाहात म्हटले, "अजून ब्रह्मपुत्रा नदीतली मगर मला कशी नाही दिसली ?"

"मगर ? " नायिका दात विचकून हसत म्हणाली.

"होय. होय. मुस्कराहट कशी नाही दिसली अजून मला सिनेमात ? "

" मी हसते आहे तर खरी सारखी सिनेमात. "

" हसते  आहे ? "

" मुस्कराहट म्हणजे हास्य. "

"Nonsense ! उद्या तू  Lackadaisical म्हणजे बर्फी असे म्हणशील. मुस्कराहट म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीतील मगर. " मी युक्तिवाद केला.

"छट !" ती नायिका अडाणीपणे म्हणाली.

"बरे आहे, मी सिद्धच करून देतो." असे जोरात म्हणून मी ताबडतोब दिल्लीला ग. ज. लॉर्ड मौंटबॅटन ह्यांच्याकडे गेलो. लॉर्ड माउंटबॅटन चीजचा डबा फोडत होते.

क्रमशः