खरं सांगायचं म्हणजे ... (४)

मी करारी आहे तसा लहरी पण आहे, आणि मनाची लहर कधी कशी फिरेल ते सांगता यायचे नाही. एकदा आमच्याकडे श्राद्धानिमित्त वामनभट आले होते. श्राद्धामुळे जेवण सपाटून झाले होते आणि मला झोप येत होती. पण वामनभट आपले उगीचच पान तयार करीत आणि गप्पा मारीत वेळ काढीत होते.

" तर बरे का ... " ते म्हणाले. आणि पानाच्या शिरा काढून त्यांनी ते आपल्या तलम धोतरावर पुसून साफ केले. त्यामुळे ते पान फार लुसलुशीत दिसायला लागले. मी चटकन ते पान त्यांच्या हातातून हिसकून घेतले आणि पांढराशुभ्र वेलदोडा उशाला घेऊन त्यावर झोपी गेलो.

पण माझा खरा करारीपणा आणि चातुर्य दिसून आले असेल तर ते मी चिमणीवर फिर्याद केली तेव्हा. ही चिमणी माझ्या हॅटमध्ये घरटे बांधीत होती. माझी हॅट मी फक्त पावसाळ्यात वापरतो. इतर वेळी मी ती खुंटीला टांगून ठेवतो -- मी म्हणजे माझी बायको.

एक दिवस एक चिमणी तोंडात गवताची काडी घेऊन आत आली. दारावर बसून तिने एकदा माझ्याकडे पाहिले. मग रेडिओवर बसून तिने हॅटकडे पाहिले. तिच्या हालचाली संशयास्पद असल्याकारणाने मी तिच्यावर नजर ठेवली. तेवढ्यात सरळ ती माझ्या हॅटमध्ये शिरली आणि तिथे तिने ती काडी ठेवली. मग ती कौतुकाने हॅटकडे पाहात खिडकीच्या दारावर बसली.

मी ओरडून तिला म्हटले, " ती हॅट माझी आहे, आणि तिच्यात गवताच्या काड्या ठेवायच्या नसून माणसाचे डोके ठेवायचे असते. "

मी काय बोलतो ते न ऐकल्याचा बहाणा करून ती बाहेर गेली आणि गवताची आणखी एक काडी घेऊन आली. बरोबर तिने नवऱ्यालाही आणले होते. पुनः त्यांनी त्या दोन काड्या त्या हॅटमध्ये ठेवल्या. तसा मी तरातरा उठलो आणि त्या हॅटमधल्या काड्या बाहेर फेकून दिल्या, आणि दोन्ही हात उचलून ' हा ऽ ऽ ' केले.

चिमणा आणि चिमणी दोघेजण खिडकीच्या दारावर बसली. चिमणी चिमण्याला म्हणाली, " ही माणसे किती आप्पलपोटी आणि रानटी असतात, नाही ? "

चिमणा म्हणाला, " माणसे कसली ? कावळेच हे. "

चिमणी म्हणाली, " की गिधाडे म्हणावे हो यांना ? "

ह्या बोलण्याकडे अर्थात मी दुर्लक्ष केले. आणि ती दोघेजणे उडून जाईपर्यंत माझ्या हॅटचे संरक्षण करीत तेथे उभा राहिलो.

माझा स्वभाव तसा साधाभोळा असल्याकारणाने नंतर पंधरा दिवस मी माझ्या हॅटकडे पाहिले नाही. नंतर एक दिवस माझे मित्र प्रा. टकले माझ्याकडे आले. त्या टांगलेल्या हॅटच्या खाली असलेल्या खुर्चीवरच मी त्यांना बसवले. त्यांनी हॅट काढली आणि त्यांचे टक्कल प्रसन्नतेने चकाकले.

क्रमशः