ह्यासोबत
या झगड्यात आलेल्या यशामुळे माझा आत्मविश्वास बराच वाढला. एक दिवस सगळ्या गणितांच्या पुस्तकांतील दशांश अपूर्णांक मी पळवून आणले आणि मुलाने विचारलेल्या गणितातल्या शंकांचे समाधान न करता येणाऱ्या नामुष्कीच्या प्रसंगातून सर्व आईबापांना वाचवले. एका सुप्रसिद्ध भावगीतगायकाचे गाणे बाटलीत भरून ते एरंडेल म्हणून विकण्याचा उपक्रम मी साधारणतः त्या वेळीच सुरू केला. नंतर पौर्णिमेच्या दिवशी मी चंद्राला गोळी घालून खाली पाडले आणि एका सिनेमा कंपनीला भाड्याने दिले. अलीकडे चांदणे पडत नाही ते त्यामुळेच. खगोलशास्त्रज्ञ ह्या बाबतीत खूपच चर्चा करीत आहेत हे मला माहीत आहे. पण माझा त्या गोष्टीला इलाज नव्हता. सिनेमातले खोटे चंद्र पाहून मी अगदी वैतागून गेलो होतो. मात्र खगोलशास्त्रज्ञांना तात्पुरता जर चंद्र हवा असला तर तो देण्याची व्यवस्था करता येईल. उत्तराकरता तिकिटे पाठवून पत्रव्यवहार करावा. व्यवहार जमल्यास चंद्र व्ही. पी. ने पाठवण्यात येईल. मधुचंद्राकरिता देखील चंद्र देण्यात येईल. मात्र मध ज्याचा त्याने स्वतः आणावा.
ह्या सगळ्या गोष्टी मी करीत असताना आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे मात्र माझे लक्ष वेधले नव्हते. पण परवा मी दाढीची पाती आणायला गेलो असताना अचानक त्या प्रश्नात मी गुरफटला गेलो.
दुकानदाराकडून मी एक पाते घेतले आणि त्याला एक आणा देऊ केला. तेव्हा दुकानदार म्हणतो, " नाही साहेब ! दीड आणा द्यावा लागेल तुम्हाला. "
" मग तुम्हाला पण मला आणखी अर्धे पाते द्यावे लागेल. " मी चाणाक्षपणे म्हटले.
" तसे नव्हे. पात्यांच्या किमती वाढल्या आहेत. " दुकानदाराने स्पष्टीकरण केले.
" का म्हणून ? " आवाज चढवला.
" कोरियातील युद्धामुळे "
" म्हणजे कोरियात अमेरिकन व चिनी सैनिक समोरासमोर बसून परस्परांच्या दाढ्या तासत असतात असे तुम्हाला म्हणायचे आहे की काय ? " मी त्याचेच म्हणणे त्यालाच स्पष्ट करून सांगितले.
" नाही साहेब. ते बंदुकांनी लढाया करीत असतात. "
" होय ना ? मग मूर्ख माणसा, ते सैनिक परस्परांच्या दाढ्या करतात असे तू का म्हटलेस ? जनतेच्या मनात विनाकारण गोंधळ व भीती निर्माण केल्याबद्दल तुला ताबडतोब अटक केली पाहिजे. " मी त्या माणसाला चांगलाच चमकावला.
नंतर मी तडक स्टॅलिनला भेटायला गेलो. स्टॅलिन आपले ऍटम बाँब मोजीत बसला होता, आणि मांजराने एक ऍटम बाँब खाल्ल्यामुळे त्याच्याशी भांडत होता.
क्रमशः