खरं सांगायचं म्हणजे ...

ही एक गंगाधर गाडगिळांची गोष्ट आहे. एका जुन्या पुस्तकात सापडली. आवडली म्हणून इथे टंकित करत आहे.

विद्वान वक्त्यांनी हातांनी भोपळा सूचित करीत म्हटले, "To put in a nutshell ..." त्याच वेळी मी दचकून जागा झालो आणि मग एक धाडसी गोष्ट केली. मी खिशातून एक शेंग काढली. तिच्यातला दाणा खाऊन टाकला. मग सरळ स्टेजवर जाऊन विद्वान वक्त्यांना त्यांचे भाषण चालू असतानाच त्या पोकळ शेंगेत कोंबले व शेंग खिशात टाकून बाहेर पडलो. गंमत अशी की, श्रोत्यांना काय होतेय ते समजलेच नाही. ते आपले व्यासपीठाकडे पाहत भाषण चालूच आहे अशा समजुतीने बसले होते.

बाहेर पडल्यावर मी माझ्या घरासमोरच्या बगिच्यात खिशातल्या चाकूने एक लहान खड्डा केला. त्यात ती शेंग पुरून टाकली, आणि मग हात झाडीत चालायला लागलो. ह्यामुळे त्या वक्त्यांना जरा गुदमरल्यासारखे वाटणे शक्य होते पण लांबलचक भाषणे करायची हौस असेल तर मनुष्याने प्रसंगोपात्त असली गैरसोय सोसायला तयार असले पाहिजे

मी केलेल्या धाडसाबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत असेल. पण ह्य गोष्टी माझ्या अंगवळणी पडल्या आहेत. कारण वक्त्यांना पळवायची माझी ही सवय फार जुनी आहे. मूठ आपटून जडजंबाल बडबडणाऱ्या एका वक्त्यांची मूठ मी अशीच फार दिवसांपूर्वी लांबवली आहे. सध्या माझ्या टेबलावर पेपरवेट म्हणून मी तिचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे एका किडकिडीत क्रांतिकारक वक्त्यांच्या डोक्यावर मी भाषण चालूअसताना माझे पेन्सिलीचे टोपण लावले आणि त्यांना खिशात अडकवून घरी घेऊन आलो. आज अनेक वर्षे मी त्यांचा लाल पेन्सिल म्हणून उपयोग करीत आहे. मी पेपर तपासल्यावर बरीच मुले नापास होतात ह्याचे कारण ती लाल पेन्सिलच !

सध्या माझ्या बायकोला एका मोरांब्याच्या बरणीची आवश्यकता आहे. त्यामुळे मी गोड गोड भावगीते म्हणणाऱ्या एका गायिकेच्या शोधात आहे. अशी एखादी ठेंगू लठ्ठशी गायिका कुठे आढळल्यास कृपा करून मला ताबडतोब कळवावे.

क्रमशः