ह्यासोबत
कथा बरीच लांबते आहे या बद्दल क्षमस्व. शक्यतो लवकर सर्व भाग टंकित करीन.
मला विचारण्यात आले, " प्रा. टकल्यांच्या डोक्यावरचे अंडे तुम्ही पाहिले की नाही ? "
मी म्हटले, " हो "
" मग त्यांना चोरी करताना पाहून तुम्ही आरडाओरडा कसा नाही केला ? "
मी म्हटले , " प्रा. टकल्यांना डोक्यावर अंडे ठेवून फिरण्याची सवय आहे. त्यामुळे मला वाटले की ते अंडे त्यांचेच असावे. "
" प्रा. टकले अंडी घालतात, असे तुम्हाला सुचवावयाचे आहे की काय ? "
" होय, मला तसेच निक्षून सांगायचे आहे. शिवाय प्रा. टकल्यांना कॉलेजात उडत जाताना मी पाहिलेले आहे. " मी धीटपणे म्हणालो.
" मलाही ते कधी कधी 'उडत जा' असे म्हणतात ! " असे उद्गार काढून सौ. टकल्यांनी माझ्या बोलण्याला पुष्टी दिली.
त्यामुळे मी निर्दोषी ठरलो, आणि प्रा. टकले ह्यांच्याकडे बघण्याचा कोर्टाचा दृष्टिकोणही अजिबात बदलला. त्यांना तुरुंगात टाकण्याऐवजी न्यायाधीश महाराजांनी हिंदुस्थान सरकारला अशी शिफारस केली की, इक्वॅडोर देशातील मुलांना भेट म्हणून हत्ती पाठवण्याऐवजी प्रा. टकल्यांची तेथे रवानगी व्हावी.
त्यानुसार प्रा. टकले इक्वॅडोरला गेल्याचे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेले आहेच. डोक्यावर अंडे ठेवून काढलेला प्रा टकल्यांचा फोटो ' इलस्ट्रेटेड वीकली ' मध्ये आल्याचे सर्वांना स्मरण असेल. मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी त्यांना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला. त्यावेळी झालेल्या भाषणात त्यांच्या अंडी घालण्याच्या कर्तृत्वाचा विशेष गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे ही कर्तबगारी इतके दिवस उघड न करण्यात त्यांचा विनय दिसून येतो असेही म्हणण्यात आले. तेव्हा ते सरळ मनाचे गृहस्थ म्हणाले , " माझ्याप्रमाणेच तुम्हा सगळ्यांना देशोदेशी पाठवण्यात येईल, अशी आशा मी व्यक्त करतो. "
त्या खटल्यातून माझी सुटका झाल्यानंतर मी चिमणीवर कायदेशीर इलाज करण्याकरता ताबडतोब वकिलांच्याकडे गेलो. त्यांना एक कडक नोटिस लिहायला सांगितली. मी ती वाचली आणि म्हटले, " वकीलसाहेब ! मी तुम्हाला कडक नोटिस लिहायला सांगितलं होतं ना ? "
" होय, तशीच लिहिली आहे. "
" मग त्यात whereas हा कडक शब्द एकदाही नाही हे कसे काय ? हेच का तुमचे कायद्याचे ज्ञान ? "
" चुकलो, माफ करा. " वकीलसाहेब म्हणाले.
" मग whereas हा शब्द सात वेळा घालून ती पुन्हा लिहून काढा. "
त्यांनी तसे केल्यावर मी म्हटले , " आता पुढे असं लिहा : ' In testimony whereof is set the seal of the said university and the said chancellor ! '
वकीलसाहेब म्हणाले, " अहो, पण हे डिग्रीच्या सर्टिफिकेटावर लिहायचे असते. "
" त्याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही. ते कडक आहे की नाही ते बोला. " मी मूठ आपटून म्हटले
" वा ! कडक म्हणजे काय ? भलतेच कडक ! " वकील साहेबांनी कबुली दिली.
" तर मग ते अलबत् नोटिशीत घाला "
क्रमशः