ह्यासोबत
मी हाक मारली, " लॉर्ड माउंटबॅटन ! "
" ओ. "
"खाली ठेवा तो चीजचा डबा ! "
" हा ठेवलाच. चहा मागवू का ? " लॉर्ड माउंटबॅटन अदबीने म्हणाले.
" कसली पावडर वापरता ? "
" लिप्टन. हिरवे लेबल. "
" बरे, चालेल. पण ह्यापुढे गुलाबी मिक्श्चर वापरत चला. "
लॉर्ड माउंटबॅटननी ताबडतोब माझ्या अध्यक्षतेखाली ह्या प्रश्नाचा खल करण्याकरिता एक तज्ज्ञांची कमिटी नेमली.
ते झाल्यावर मी त्यांना म्हटले, " ह्या देशात काय भयंकर गोष्टी चालल्या आहेत त्याची तुम्हाला कल्पना आहे का ? "
" नाही बुवा. काय ? "
" मुंबईत लोक मुस्कराहट म्हणजे हास्य असे म्हणायला लागले आहेत. "
" काय म्हणता काय ? " लॉर्ड माउंटबॅटन आश्चर्याने थक्क झाले.
" अलबत् " मी ठासून म्हटले.
" मग सैन्याच्या हालचालींना सुरुवात करू म्हणता ? "
" नाही. सध्या तुम्ही एक ऑर्डिनन्स काढा आणि मुस्कराहट म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीतील मगर असे जाहीर करा. "
"अच्छा. " लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले, आणि त्यांनी ऑर्डिनन्स लिहायला सुरुवात केली --
" मी हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय असा आनंदाने हुकूम काढतो की, ब्रिटिश हिंदुस्थान, हिंदी संस्थाने, अंदमान व निकोबार ही बेटे -- "
मी म्हटले, " ब्रह्मदेश, सिलोन व एडन ह्यांचादेखील समावेश केल्यास बरे होईल. "
" तसे करायला मला आनंद वाटला असता. पण माझा अधिकार -- "
" अच्छा - अच्छा. तुम्ही चिंता करू नका. मी सहाव्या जॉर्जना त्या बाबतीत जाऊन भेटेन. "
लॉर्ड माउंटबॅटननी थोडे पुढे लिहिले, आणि ते पुन्हा थांबले. मी प्रश्नार्थक भुवया उंचावल्या.
लॉर्ड माउंटबॅटन पेन्सिल चावीत म्हणाले, " सध्या हिंदुस्थानचा अन्नप्रश्न फार गंभीर आहे, हे देखील आपण इथे विचारात घेतले पाहिजे. "
" तेही खरेच. " मी रिकामा चहाचा कप खाली ठेवीत म्हटले.
" तेव्हा मुस्कराहट म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीतील मगर असे जाहीर न करता उकडलेले रताळे असे जाहीर करणे फायद्याचे ठरेल. आपली काही हरकत नाही ना असे करायला ? " लॉर्ड माउंटबॅटननी माझ्या कपात चहा ओतला.
" अन्नप्रश्न खरोखरच इतका बिकट आहे का ? " मी विचारमग्नपणे म्हटले.
" हो. " माउंटबॅटन हनुवटीवर पेन्सिल आपटीत म्हणाले.
" तर मला वाटते की, मुस्कराहट म्हणजे उकडलेले रताळे असे न ठरवता उकडलेला बटाटा असे ठरवावे. "
" फारच हुषार बुवा तुम्ही. " लॉर्ड माउंटबॅटन उद्गारले, आणि ऑर्डिनन्स पुरा लिहून त्यांनी माझ्या हातात दिला.
मग तो ऑर्डिनन्स मी त्या नटीपुढे आदळला.
ती नटी आश्चर्याने म्हणाली, " हे काय ? "
" ह्यात असे लिहिलेय की, तुझे तोंड उकडलेल्या बटाट्यासारखे आहे आणि त्या नायकाचे उकडलेल्या रताळ्यासारखे आहे. " असे मार्मिक उत्तर देऊन मी पडद्यावरून उतरून माझ्या जाग्यावर जाऊन बसलो.
असा माझा स्वभाव करारी आहे, आणि अशा मी अनेक अचाट गोष्टी करीत असतो. लोकांच्या मात्र हे ध्यानात येत नाही. कारण मी जनरीतीप्रमाणे टाय लावून कॉलेजात लेक्चर देतो आणि लोकात चारचौघांसारखा वागतो.
क्रमशः