ह्यासोबत
तयार झालेली नोटिस मी चिमणीला दिली. चिमणीने ती आपल्या घरट्यात ठेवून तिच्यावर काड्या टाकल्या. मी त्या अपमानास्पद वागणुकीकडे दुर्लक्ष केले आणि नोटिशीची पावती मागितली. तेव्हा तिने शाईच्या पॅडवर पाय ठेवून मग त्याचा ठसा एका कागदावर उमटवला आणि ती पावती मला दिली.
त्यानंतर चिमणीने नोटिशीला उत्तर तयार करून आणले. त्यात whereas हा शब्द अकरा वेळा वापरलेला होता. शिवाय शेवटी एक उपनिषदातले अवतरण होते. त्याचा अर्थ असा : " माणसाला दोन पाय असतात, दोन कान असतात आणि डोळेही दोनच असतात. "
या कडक उत्तरामुळे मी मुळीच डरलो नाही. whereas या शब्दाने अथपासून इतिपर्यंत भरलेली नोटिस मी तिला दिली. नोटिशीच्या शेवटी, 'नेबुकडनेझर' व 'खतरनाक' हे अत्यंत कडक शब्द मी वापरले होते.
असे आमचे भांडण खूपच रंगले. एक दिवस मी माझ्या मुलाला कावळ्याचिमणीची गोष्ट सांगत होतो : " कावळ्याचे घर होते शेणाचे आणि चिमणीचे घर होते मेणाचे -- "
तेवढ्यात चिमणी तिथे येऊन म्हणाली, " नाही रे मुला. चिमणीचे घर मुळीच मेणाचे नसते. ते असते गवताच्या काड्यांचे आणि कापसाचे. "
आणि तिने स्वतःचे घर त्याला दाखवून त्याच्या मनातला माझ्याविषयीचा आदर नाहीसा करून टाकला.
या गोष्टीचा सूड म्हणून ' ... तिचे (चिमणीचे) वाटीएवढाले डोळे ' अशी ओळ असलेला अभंग पुन्हा पुन्हा मी रेडिओवर ऐकू लागलो.
चिमणी या गोष्टीचा निषेध करायची, चिवचिवाट करायची. पण मी पुन्हा पुन्हा तो अभंग लावायचो. रेडिओवर लागत नसला तर ग्रामोफोनवर लावायचो. मला वाटते की, तुकारामबोवांच्या पागोट्यातही चिमणीने घरटे बांधले असावे; आणि त्याच वेळी त्यांना हा अभंग सुचला असावा.
असो. अखेर माझ्या रेडिओवर ठेवलेल्या लाकडी हत्तीने आम्हा दोघात समझोता घडवून आणला. त्याद्वारे असे ठरले की, चिमणीची पिले मोठी होईपर्यंत तिला माझ्या हॅटमध्ये वास्तव्य करून राहण्याचा अधिकार असावा. त्यानंतर मात्र तिने शेजारच्या अरविंदाच्या हॅटमध्ये घरटे बांधावे. दोन्ही पक्षांनी आपापले कडक शब्द मागे घ्यावे.
क्रमशः