खरं सांगायचं म्हणजे ... (५)

आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्या ऐन रंगात आलेल्या असताना प्रा. टकल्यांच्या डोक्यावर एक काडी पडली. त्यांनी ती काडी घेऊन चावायला सुरुवात केली. माझ्या मनात मात्र एक दुष्ट शंका डोकावली.

तेवढ्यात दुसरी एक काडी टकल्यांच्या डोक्यावर पडली. त्यांनी ती काडी दुसऱ्या हातात घेतली आणि मग काही वेळ त्यांनी गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहिले. ते मला म्हणाले, " ह्या काडीचे काय करावे हो ? "

मी म्हटले, " मला वाटते, तिने कान कोरावा "

" छट ! " प्रा. टकल्यांनी नापसंती दर्शवली.

" तर मग ती तशीच डोक्यावर राहू द्यावी. " मी दुसरी शक्कल सुचविली. प्रा. टकल्यांना ते पटले. त्यांनी ती काडी माझ्या डोक्यावर ठेवली आणि ते पुढे बोलू लागले.

तेवढ्यात तिसरी काडी प्रा. टकल्यांच्या डोक्यात पडली. तेव्हा त्यांनी डोके हलवले. त्यामुळे त्यांना एकदम आपल्याला घरी जायचे आहे याची आठवण झाली. ते ताडकन उठले. त्याबरोबर हॅटला धका बसला, आणि एक पांढरेशुभ्र अंडे प्रा. टकल्यांच्या डोक्यावर पडले. तेथे क्षणभर स्थिरावले. मला भीती वाटली की, प्रा. टकले ते उचलून तोंडात टाकतील. पण तेवढ्यात त्यांनी हॅट डोक्यावर घातली आणि लगबगीने ते चालायला लागले.

मी त्यांच्या मागोमाग पुढे होत ओरडलो, " अहो अंडे, अंडे. "

प्रा. टकले मागे वळून हसत म्हणाले, " अच्छा, अच्छा ! शेक हँड ! "

निराशेने मी मागे परतलो. तेवढ्यात चिमणी लगबगीने हॅटच्या बाहेर पडली. मी तिला हटकले आणि ओरडलो, " आत्ताच्या आता माझ्या हॅटमधून आपले बिऱ्हाड हलव. "

चिमणी चीत्कारली, " भाडे नियंत्रण कायद्यान्वये मला जागा खाली करायला सांगायचा तुम्हाला मुळीच अधिकार नाही. मी मात्र प्रा. टकल्यांच्या विरुद्ध माझे अंडे चोरल्याबद्दल फौजदारी खटला करणार आहे, आणि त्यांचे साथीदार म्हणून तुमचेही नाव त्यात गोवणार आहे. "

आणि उद्धटपणे पंख फडफडावीत ती निघून गेली.

त्यानंतर काय झाले ती हकीकत वर्तमानपत्रातून जनतेला वेळोवेळी कळलेलीच आहे. प्रा. टकल्यांना ताबडतोब गिरफदार करण्यात आले आणि त्यांच्यावरचा आरोप शाबीतही झाला. प्रा. टकले आपले चोरून चुंबन घेतात असे त्यांच्या पत्नीने भर कोर्टात सांगितल्यामुळे त्यांना चोरी करायची सवय आहे ही गोष्ट पूर्णपणे सिद्ध झाली आणि त्यांचा बचाव करण्याचा मार्गच खुंटला.

मी मात्र केवळ माझ्या चलाखीने सुटलो.

क्रमशः