अजून देहूमधील माती...!

............................................
अजून देहूमधील माती...!
............................................

दुभंगलेल्या मनात माझ्या तुझा तुकोबा अभंग आहे!
उदास वारीत जीवनाच्या मला तुझा साथसंग आहे!

खुशाल कोणासही दिसू दे वरून मी कोरडा कितीही...
उरात इंद्रायणीतला तो हरेक माझ्या तरंग आहे!

तरून आली कितीकितीदा मनात माझ्या तुझीच गाथा...
तुझ्या मनातील दुःख मी वाचण्यात अद्याप दंग आहे!

पुरूनसुद्धा उरेल माझ्याकडे तुझी शब्दसंपदा ही...
अता कुठे मी गरीब आहे? अता कुठे मी भणंग आहे?

लुळ्या-खुळ्या या मनास माझ्या तुझेच आयुष्य धीर देते...
तुझ्याविना सैरभैरसा मी..., तुझ्याविना मी अपंग आहे!

वनातल्या वृक्ष-वल्लरींना मनातली वाटलीस दुःखे...
म्हणून का रे तुझ्या व्यथांचा अजून हिरवाच रंग आहे?

जनात विजनातल्याप्रमाणे कसे जिणे हे तुझ्या ललाटी?
खरेच कोणासही न ठावे कसे तुझे अंतरंग आहे!

अणू नि रेणूत मावणारा... नभाहुनीही विराट, मोठा...
तुझी निराळीच रीत आहे! तुझा निराळाच ढंग आहे!

मनातल्याही मनात दिंडीत चालतो मी तुझ्याच संगे...
करात आहेत टाळ माझ्या, गळ्यात माझ्या मृदंग आहे!

कसा बरे पंढरीतल्या मी विठूस मानू खरा विठोबा?
खराखुरा मानणार मी तो, तुझ्यात जो पांडुरंग आहे!!

अजून देहूमधील माती मुके मुके हुंदकेच देते...
अजून डोळ्यांपुढे तिच्याही अखेरचा `तो` प्रसंग आहे!!

- प्रदीप कुलकर्णी

............................................
रचनाकाल ः ६ जुलै १९९८
............................................