नुकतेच वाचनात आलेले २ 'मु. रा. वि. '

'मुद्राराक्षसाचे विनोद' मनोगतींकरता वाचण्यास देत आहे. हे 'मुरावि' कदाचित यापूर्वी वाचले असल्यास, पुनश्च आनंद घ्यावा. त्याचबरोबर जमल्यास मुरलेल्या 'मुरावि' ची भरही घालावी.

१. द. मा. मिरासदारांचा किस्सा.

हा किस्सा द. मा. नी काही वर्षापूर्वी डोंबिवली येथे एका भाषणात सांगितला होता.

अनेक वर्षांपूर्वी द. मा. एका वृत्तपत्रात नोकरी करत होते. एका बातमीत वाक्य होते की, 'मा. मंत्र्यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांना २५ सुवासिनींनी ओवाळले'. छापताना हे वाक्य 'मा. मंत्र्यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांना २५ सुवासिनींनी आवळले', असे छापले गेले. हे ऐकताच सभागृहात हास्याचा स्फोट झाला,

तो जरा विरतो ना विरतो तर द. मा. नी आणखी एक स्फोट केला. ते म्हणाले, "अहो, त्यांचे 'आकारमान' लक्षात घेता आवळायला २५ जणी लागणारच! ".

यानंतर उसळलेल्या हास्याने सभागृहाचे छत कोसळायचेच बाकी होते.

२. एका मंत्र्याच्या आजारपणा विषयक बातमीत असे छापले होते.

'वार्ताहर सदर मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले असता ते गाढव शांतपणे झोपले होते. '

(मूळ वाक्य होते 'वार्ताहर सदर मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले असता ते गाढ व शांतपणे झोपले होते. ')