श्रावण मोडकांचा तिढा

खरे तर मोडकांचा तिढा म्हणावे की मोडकांची तिढा  म्हणावे या संभ्रमात जे प्रथम मनात आले तेच टंकले गेले. हे लिखाण आहे श्रावण मोडक यांच्या 'तिढा' या नवीन कादंबरीच्या निमित्ताने. (संदर्भ http://www.loksatta.com/daily/20080803/lr10.htm) श्रावण मोडक हे जालावरचे अनियमित लेखक म्हणून आपल्याला परिचित आहेतच. ('मनोगत' वरचे म्हणून नवीन वादाला निमंत्रण देत नाही! ) यापलीकडील मोडकांची विविध सामाजिक प्रश्नांचा अभ्यासक आणि कार्यकर्ता म्हणून आपल्याला फारशी ओळख नाही. अर्थात मोडकांच्या लिखाणातील वैविध्य आणि अनुभवांमधील जिवंतपणा ध्यानात घेता एखाद्याच्या ध्यानात हे येईलही म्हणा. या पार्श्वभूमीवर शासन, औद्योगिक विकास, विस्थापित आदिवासी आणि लोकसंघटना असा चौकोन धरून बांधलेली त्यांची 'तिढा' ही कादंबरी असावी असे 'लोकसत्ता' मधील परीक्षणावरून वाटते.  लोकसंघटनांमध्ये  दिशाहीनता, त्यांमध्ये फरपटत जाणारे तळमळीचे कार्यकर्ते अशा विषयांवर मिलिंद बोकीलांचे सुरेख लिखाण - कथाच - आहेत. मोडकांचेही गोत्र तेच आहे. झोप येण्यापूर्वी डोळ्यांसमोर धरायची चार अक्षरे लिहिणे हे लिखाणाचे साधे आणि सुखाचे पांघरुण सोडून अशा अंतर्मुख करणाऱ्या विषयांना हात घालणे हा साप पकडण्याचा उद्योग करणे सोपे नसते. ते लोक का करतात, हे जे ते करतात त्यांनाच ठाऊक असते.
या कादंबरीच्या आणि या परिचयात्मक लेखाच्या निमित्ताने श्रावण मोडक यांचे अभिनंदन. आता कुणीतरी या कादंबरीचे रसग्रहण लिहावे, आणि या कादंबरीच्या प्रेरणेबाबत स्वतः मोडकांनी काहीतरी लिहावे, अशी अपेक्षा ठेवावीशी वाटते.