पर पप्पू कांट डान्स साला!

Image of: Rattus rattus (house rat)

चित्रपट हे एकंदरीतच आयुष्याबरोबर एक सुरेल लेहरा धरून आहेत. 'क्या करूं गुरुदेव, मेरे तो डायलॉगही खत्म हो गयें, वरना मैं आपकोभी मात दे जाता' यामागची वेदना, 'दोनों बातें हैं मां, जादा पैसा आयें, तो नींद नही आती, नींद आये तो जादा पैसा नही आता' यामागचा विचार आणि 'तुम उस लडकेसे शादी नही करोगी जिससे तुम प्रेम करती हो, तुम उस लडकेसे शादी करोगी जिससे मै प्रेम करता हूं, यानेके रामप्रसादसे'  यामागचा विनोद... हे सगळे आहे कित्येक वर्षांपूर्वीचे, पण आजही तेवढाच आनंद देऊन जाते. गाणी तर काय, नेहमीच आपले बोट धरून चालत आलेली आहेत. आणि हे सगळे फक्त कालच्या जमान्यात होते असे नाही. आजही एखादा 'तारे जमीं पर' एखादा 'रंग दे बसंती', एखादा 'मेट्रो', एखादा 'हनीमून ट्रॅव्हल्स' अगदी 'जब वी मेट' या चमत्कारिक धेडगुजरी नावाचा चित्रपट...  असा अपूर्व आनंद देऊन जातात. करमणूक, विरंगुळा आणि चार घटका सुखाच्या जाव्यात हा हेतू हे चित्रपटांच्या मागचे असावेत हे ठीक, पण एखाद्या चित्रपटाने काही घसघशीत प्रश्न समोर टाकले, एखाद्या प्रसंगाने अस्वस्थ, अंतर्मुख केले तर ते त्या चित्रपटाचे यशच म्हणावे लागेल. किंबहुना चित्रपट हे माध्यम प्रगल्भ झाल्याचे ते लक्षणच ठरावे. एका विशिष्ट वयानंतर किंवा वाचनानंतर फिक्शन वाचायचा जसा कंटाळा येतो, तसेच निव्वळ मनोरंजन करणारे उथळ चित्रपटही नकोसे वाटतात. करमणूक हे उद्दिष्ट असावे, पण फक्त तेवढेच असू नये इतकेच.

"तुम्हारी जनरेशन के पास सवाल बहोत है... " कुलभूषण खरबंदाच्या तोंडून गुलजारने हा प्रश्न विचारला त्यालाही बरीच वर्षे झाली. आजच्या पिढीसमोर खूप आहेत, पण किमान प्रश्न तरी आहेत असे समाधान त्या 'हुतूतू' या चित्रपटात मिळाले होते. पण तीही आता जुनी गोष्ट झाली. प्रश्न? आणि तेही चित्रपटात? छट! काहीतरीच काय! चित्रपट असे प्रश्न वगैरे टाकण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी काढायचा नसतो. असलाच तर प्रश्न असा असावा की मी माझी आत्ताची गर्लफ्रेंड (किंवा बॉयफ्रेंड) सोडून देऊन नवी / नवा कसा मिळवू? आणि हा काही कमी महत्त्वाचा प्रश्न नाही बरे!

'जाने तू ना जाने ना' हा आजच्या पिढीमध्ये कमालीचा लोकप्रिय झालेला चित्रपट असेच काही मौलिक प्रश्न समोर टाकतो. 'दिल चाहता है' जिथे संपतो तिथे 'जाने तू' सुरू होतो असे कुणीसे म्हणाले. 'दिचाहै' चांगलाच होता. प्रेम म्हणजे काय याच्या शोधातले तीन तरुण आणि प्रत्येकाला आपापल्या परीने त्याची झालेली उकल ही थीम दिचाहै मध्ये नीट व्यवस्थितपणे हाताळली होती. म्हणून उत्सुकतेने आणि तसा बऱ्याच उशीरा 'जातूयाजाना' ला गेलो.

जय राठोड, अदिती आणि त्यांची ग्यांग यांचा हा सिनेमा. हे सगळे नुकतेच कॉलेजातून बाहेर पडले आहेत. आता कुणाला (रस्त्यावर पडलेली सहज) नोकरी करायची आहे, तर कुणी एम. बी. ए. च्या गोष्टी करतो आहे. (बाळांनो, एम. बी. ए. असे सहज हाटेलात जाऊन डोसा खाऊन यावे तसे नाही रे करता येत! त्याला जानेवारीतच सीईटी द्यावी लागते, आणि नंत जीडीपीआय... जाऊ दे! ) जय राठोड या हीरोचे फक्त त्याच्या घट्ट मैत्रिणीनेच वापरायचे नाव  'पेट नेम' 'रॅटस' आहे ('रॅटस!'  दिवाण सर, एफ. वाय. ला तुम्ही 'रॅटस रॅटस' किती सुरेख शिकवले होते हो! 'रॅटस रॅटस, म्हणजे आपण रोज बघतो तो उंदीर! ' तुम्ही म्हणाला होतात. ऍनॉटॉमी आणि फिजीऑलॉजी...जाऊ द्या, नवी पिढी आहे, माफ करून टाका! )  आणि ती घट्ट मैत्रीण अगदी गळ्याबिळ्यात पडायला तयार असली तरी त्याची गर्लफ्रेंड बाकी नाही बरे! आता अगदीच मैत्रीण हे नाते न समजण्याइतपत मीही जुना झालेलो नाही. पण अद्यापि मैत्रीण इथे संपते आणि इथून गर्लफ्रेंड सुरू होते, गर्लफ्रेंड इथे संपते आणि फियान्से इथून सुरू होते आणि फियान्से इथे संपते आणि गुड ओल्ड बायको इथे सुरू होते या भौगोलिक सीमा न कळण्याइतपत माझा भूगोल कच्चा राहिलेला आहे. तेही उदाहरणार्थ असो.  तर या गर्लफ्रेंडचे - थांबा, थांबा, चुकलो वाटतं, हां,  या मैत्रिणीचं  नाव आहे - तसे तिचे नाव छान अदिती वगैरे असले तरी प्रत्यक्षातले बोलवायचे नाव आहे - म्याऊ. का तर म्हणे तिला मांजरे फार आवडतात. (चला,  म्हणजे आता ज्यांच्या घरी कुत्री असतील त्यांना 'वॉव' किंवा गेलाबाजार 'भू भू' म्हणण्याची सोय झाली. तमाम बळीराजांना 'हंबा' म्हणावे. कोण म्हणतो चित्रपट ज्ञानात भर घालत नाहीत म्हणून?)  या अदितीचे एक सुंदर घर आहे - म्हणजे पार्टी कुठे करावी हा महत्त्वाचा प्रश्न सुटला - तिचे अतिलिबरल आईबाबा आहेत,  ( वयात आलेल्या मुलींच्या बापांनो, इकडे लक्ष द्याः मुलीशी दोस्ती करायची असेल तर प्रथम तिच्या मैत्रिणीबरोबर बॉलडान्स करायला शिका. तरच व्हाल तुम्ही 'कूल' डॅडी!) तिचा एक विक्षिप्त पण म्हणे भयंकर टॅलंटेड असा चित्रकार भाऊ आहे. तो केसांची पोनीटेल बांधतो, येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येकाबरोबर उर्मटपणे बोलतो, आपल्या पांढऱ्या उंदराबरोबर खेळतो (लेखक दिग्दर्शकाला उंदराचे इतके आकर्षण का असावे? एक मानसशास्त्रीय अभ्यास. फ्रॉईड काय म्हणतो? ) आणि रंगाचे डाग पडलेल्या चड्ड्या घालून चोंदलेल्या आवाजात बोलत हिंडतो. (कलंदर चित्रकार, आठवते ना? आणि बब्बरसाहेब, ही रबरी आवाजाची देणगी आपण आपल्या पुत्राला दिली नसती तरी चालले असते हो!)
तर या जय आणि अदितीला अदितीचे आईवडील 'आता तुम्ही लग्न करून टाका' असे सांगतात तेंव्हा साक्षात्कार होतो की अरे, आपण मित्र असलो तरी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही आहोत. आता आली का पंचाईत! मग ते हात धुवून एकमेकांसाठी गफ्रे - बॉफ्रे शोधायला लागतात. मग अशा मारुनमुटकून जमवलेल्या जोड्यांचा माफक त्रयस्थ रोमान्स (म्हणजे क्लबमध्ये जाऊन व्हिस्की, वोडका किंवा वाईन पिणे व नाचणे - तिथे क्वचित एखादी माजी गर्लफ्रेंड तिच्या नवीन बॉयफ्रेंडसोबत भेटणे.... हे राम! ), आणि चित्रपटाच्या शेवटच्या काही रिळांत अरे, आपण उगीचच इकडेतिकडे शोधत बसलो होतो, खरे तर आपणच एकमेकांचे गफ्रे - बॉफ्रे आहोत असा साक्षात्कार होणे आणि मग हीरोने ('गुड्डी' मध्ये चित्रपटकथालेखक देशपांडे प्राध्यापक गुप्तांना सांगतो तसे, 'अंत में हीरो जब वीलन का पीछा करता है- कुछ कारो में, कुछ ट्रेनोंसे, कुछ घोडोंपर... ') धडपडत एअरपोर्ट्वर जाऊन दोन आठवड्याच्या सुटीसाठी म्हणून (आणि जमलं तर सहजच न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत फिल्म मेकिंगचा तीन वर्षांचा फिल्म कोर्स करायला) निघालेल्या हीरॉइनला थांबवणे आणि तिला एकंदर सातशे चाळीसावी मिठी मारणे, या सफल प्रेम कहाणीवरून प्रेरणा घेऊन आतापर्यंत आपण गफ्रे - बॉफ्रे आहोत की नाही या संभ्रमात असलेल्यांचे डोळे उघडणे आणि... मोद विहरतो चोहिकडे... दी एन्ड! 
असा हा 'जाने तू या जाने ना!'
चित्रपटाचे संगीत आणि गाणी याबाबत माझ्या मनात गोंधळ आहे. आता या चित्रपटात 'कभी कभी आदिती जिंदगी में कभी कोई अच्छा लगता है' असे एक गाणे आहे. वास्तविक हे लिहिताना यातल्या प्रत्येक अक्षरावर अनुस्वार द्यायला पाहिजे असे ते म्हटले आहे. हे सैगलच्या आत्म्याला छळण्याचे लोकांनी का मनावर घेतले आहे? 'पप्पू कांट डान्स साला' हेही तसेच एक अफलातून गाणे. 'पप्पू कांट डान्स साला' वा! काय काव्य आहे! आणि जर कुणाला इंग्रजी कळत नसेल तर पुढची ओळ आहे, 'पप्पू नाच नही सकता' अहो, गंगा आणि थेम्सचा संगम म्हणतात, ते दुसरे काय? 
मग 'जाने तू' या चित्रपटात आहे तरी काय? तर अनेक 'हॉट' तरुणी आहेत, तेवढच 'कूल' तरुण आहेत आणि चाळीशीतल्या 'सिक्स पॅक होल्डर' संत शाहरुखने दिलेल्या 

ऑल हॉट गर्ल्स पुट युवर हॅंडस अप ऍंड से
ऑल कूल बॉइज, कमॉन मेक सम नॉइस ऍंड से
ओम शांती ओम
या मंत्रानुसारच ते वागताहेत. उंची गाड्या उडवताहेत, छान छान घरांमधून राहताहेत, डिस्कोथेकमध्ये नाचताहेत, वोडकाचे शॉटस घेताहेत, मांजरीची शोकसभा घेताहेत आणि यातून वेळात वेळ काढून स्वतःसाठी किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसाठी जोड्या जमवताहेत.
रत्ना पाठक ही या चित्रपटातल्या नायकाची आई. कॉलेजची तीन ( की किती कुणास ठाऊक! ) वर्षं गेली कुठे हे कळालंच नाही असं म्हणणाऱ्या नायिकेला ती प्रेमळ स्वरात म्हणते, "फोनपर, बेटा. फोनपर".
नव्या पिढीविषयी एवढं कळूनसवरुनही आमिर खानला असा चित्रपट काढावासा वाटला, हे नवल.