अभिनंदन अभिनव बिंद्रा. पण पुढे काय?


अभिनव बिंद्रा सुवर्णपदकासह
अभिनंदन अभिनव बिंद्रा!

अभिनव बिंद्राला १०मी एअर रायफलमधले सुवर्णपदक मिळाले.  आधुनिक
ऑलिंपिकची सुरुवात झाल्यापासून भारताला मिळालेले हे पहिले वैयक्तिक
सुवर्णपदक. ही आम्हा भारतीयांसाठी जेवढी अभिमानाची गोष्ट आहे किंबहुना तेवढीच
लाजिरवाणीही. ऑलिंपिक खेळांना सुरुवात झाली की भारताला
ऑलिंपिकमध्ये आणि ऑलिंपिक स्तरावरच्या खेळांत पदके का मिळत नाहीत, हा
प्रश्न पुन्हा एकदा सतावू लागतो. आणि आम्ही पुन्हा एकदा कारणे शोधू
लागतो. 

  • भारत अमेरिका, चीन,
    ऑस्ट्रेलियासारखे "स्पोर्टिंग नेशन" (खेळांत रूची घेणारा देश) नाही. आम्ही खेळ खेळण्यापेक्षा बघण्यात वेळ घालवतो. (फुटबॉलचा विश्वकप, विंबल्डन वगैरे वगैरे).  कारण १) आम्हाला खेळ प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा बघणे ( आणि बघत-बघत "फेडररचा बँकहँड केवळ अद्भुत", "झिदानचे बॉलस्किल्ज लाजवाब. त्याने काय थ्रू पास दिला" अशा टिपण्या करणे) आवडते किंवा २) भारतात मूलभूत सुविधांची (खेळांची मैदाने, स्टेडियम वगैरे, कोचिंग वगैरे
    वगैरे) दयनीय कमतरता आहे.

  • शालेय शिक्षणांत आणि शैक्षणिक धोरणांत खेळांना
    महत्त्वाचे स्थान नाही.

  • भारताचे राष्ट्रीय क्रीडा धोरण चुकीचे आणि कुठलीही दूरदृष्टी नसणारे आहे. खेळांच्या संघटनांत राजकारणच जास्त आहे. खेळांच्या विकासासाठी पुरेसे बजेट नाही.

  • भारतीयांना अशा स्पर्धांत भरीव कामगिरी
    करण्यापेक्षा स्पर्धापरीक्षांत (आयएएस ते लोअर डिविजन क्लर्क) यश मिळवून
    बाबूगिरी करणे किंवा अधिक आवडते आणि पालक पाल्यांना प्रोत्साहन देत नाहीत.

  • ज्या समाजाच्या मूलभूत गरजा (रोटी,कपडा आणि
    मकान) पूर्ण होऊ शकत नाहीत, खायचे वांधे आहेत, त्या समाजाकडून ऑलिंपिकमध्ये पदकांची अपेक्षा
    करणे चुकीचे आहे.

  • भारतीयांची शरीरयष्टी, आहार असा आहे की आम्हाला पदके मिळू शकत नाहीत. आम्ही खूप चांगली कामगिरी करू शकत नाही.

  • नेहमीप्रमाणे इतर खेळांच्या वाईट अवस्थेला क्रिकेटच कारणीभूत आहे.

ह्यापैकी कुठले कारण सर्वात महत्त्वाचे आहे असे तुम्हाला वाटते? ह्याशिवायही इतर कुठली कारणे असल्यास तीही सांगावीत.

कृपया आपली मते मांडावीत.