नुसती बोलतेस माझ्याशी

नायक : नुसती बोलतेस माझ्याशी
कि असे प्रीतिबीतिचा हेतू?
नायिका : हृदयाचे न गूज तुज कळते
किति साधासुधा सख्या रे तू!।ध्रु।
नायक : वससी रोज तू मनी माझ्या
कधि परि जीवनात येशिल तू
न सरो जन्म काळजीतच ह्या
ग दया यौवनावरी कर तू
नायिका : कशी मी सांगु तुला
अडवे लाज मला
समजुन हृदयकंपना घे तू ।१।
नायिका : सुरभि अबोधतेस निष्ठेची
तुज सर्वस्व का न अर्पावे?
मज सांगे अधीर मन माझे
तव छायेस आज बिलगावे
नायक : सुहृदय भाव तुझा
न ठरो डाव तुझा
मजवर का प्रसन्न व्हावे तू?।२।

नायक :
असशी सर्वदाच माझी तू?
कि मला फसवतेस? सांग खरे
तुज घ्यावे मिठीत किति वाटे
मज प्रोत्साहसी कशास बरे?
नायिका : असुदे धीर तुला
न भिता भेट मला
"मन राखीन" वचन घे हे तू ।३।

१ पाठभेद :

सुरभि अबोधता करी निष्ठा (हो. सुरभि म्हणजे सुगंध नसून सुगंधी असा अर्थ आहे म्हणे.) किंवा सरळ
फुलत अबोधतेमधे निष्ठा - असे म्हणावे.

२ पाठभेद :

ममताभाव तुझा - किंवा जिवलग भाव तुझा (किंवा - प्रेमळ भाव तुझा - असे वृत्तात बसले नाही तरी चालीत बसते)

किंवा

मजसी मेळ तुझा - न ठरो खेळ तुझा

३ पाठभेद :

"मन राखीन" लिहुन घे हे तू

४ पाठभेद :

कि असे प्रीतिचा तुझा हेतू

किंवा

कि असे प्रीतिचा मनी हेतू

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )
ध्रुवपद आणि कडव्यातल्या लांब ओळी : ललगा गालगाल गागागा
आखूड ओळी : ललगा गाललगा

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )