गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ६

आम्ही तिकडे असताना काही भारतिय सण ही आम्हाला तिकडेच साजरे करावे लागले. आम्ही तिकडे असताना अशा सणांपैकी होळी, रंगपंचमी आणि महाशिवरात्री आम्ही तिकडे साजरे केले.

होळी तिकडे एके ठिकाणी असते असे संदिप ला माहीत असल्याने आम्ही संध्याकाळी ६ जण (तृप्ती, संदिप, सौजन्या, वेंकट, गिरीश आणि मी) असे त्या होळीच्या ठिकाणी गेलो. तिकडे खूप च गर्दी होती. एका मैदानात ती होळी होती. अगदी आपल्या इथल्यासारखी होळी होती. क्ष्णभर मला तर असे वाटू लागले की आम्ही भारतातच आहोत की काय. अगदी नारळाच्या झावळ्या ही होत्या. नंतर तिकडे हिंदी गाण्यांवर काही नृत्ये झाली. दुसऱ्या दिवशी सुट्टीच होती. नेहेमीप्रमाणे सकाळी खरेदी ला जायचे म्हणून मी आणि गिरीश उठून तयार झालो. नंतर तृप्ती ला फोन केला तर ती म्हणाली की सुरीनाम मध्ये होळी च्या दुसऱ्या दिवशी हे लोक फागवा म्हणजेच रंगपंचमी खेळतात. तर आज सगळी दुकाने बंद असतील. तरीही माझे आणि गिरीश चे आवरल्याने आम्ही घराबाहेर पडलो. खरेच सर्व सुरीनामी मंडळींची दुकाने बंद होती. पण काही चायनीज लोकांचे मॉल्स चालू होते. त्यांच्यात एक माणूस आम्हाला रंग खेळलेला दिसला. झाले! माझ्या आणि गिरीश च्या डोक्यात आले की आपण ही रंग खेळायचे. आणि मग आम्ही रंग शोधू लागलो. रंग काही मिळेनात. पण अखेर एका चायनिज मॉल मध्ये आम्हाला रंग सापडले. तिकडचे रंग पण छान होते. आपल्या पावडर च्या डब्यासारख्या डब्यात होते. आणि पावडर सारखेच मऊ होते. आम्ही दोन रंग घेऊन घरी गेलो.

घरी जाऊन मग आधी आम्ही तृप्तीच्या घराची बेल वाजवली. संदिप घरच्यांशी फोन वर बोलत होता. आधी आम्ही तृप्ती ला रंग लावला. आणि मग संदिपला बेडरूम मध्ये जाऊन च रंग लावला. त्याने तर फोन ठेवला आणि ते दोघेही आम्हाला रंग लावायला लागले. आम्हाला असे वाटले की सौजन्या कडे जाऊन ही रंग खेळावे. मग आम्ही सगळे जण अचानक सौजन्या ला फोन न करता तिच्याकडे गेलो. आधी तृप्तीनी तिच्या तोंडाचा रंग पुसला. आणि मग तिला बघून सौजन्यानी दार उघडल्यावर आम्ही सगळ्यांनीच आत जाऊन तिला आणि वेंकट ला रंग लावले. ते दक्षिण भारतिय असल्याने त्यांना हे नवीन च होते. पण रंग खेळणे त्यांना इतके आवडले की आम्ही सर्वानुमते असे ठरवले की ग्रुप मधल्या बाकीच्या मित्रांकडेही जाऊन खेळायचे. आम्ही गेलो तर त्या सहा जणांपैकी २ च जण उठले होते. बाकीच्यांना उठवून आम्ही खेळलो. त्यांच्या घराला मोठे पार्किंग असल्याने आम्ही तिकडे खूपच धमाल केली. पाणी घेऊन ही खेळलो. आणि नंतर मग वर जाऊन गरमा गरम कॉफी प्यालो.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला एका सुरीनामी कुटुंबात होळीचे आमंत्रण मिळाले होते तिकडे जायचे होते. तृप्ती, संदिपची डॉक्टर होती ती. तिच्या आईकडे आम्हाला जायचे होते. तिचे पण असेच काही पिढ्यांपूर्वीचे लोक भारतिय होते. तिने तृप्ती संदिप ला त्यांच्या मित्र मंडळींनाही घेऊन या असे सांगितल्याने आम्ही दोघेही चाललो होतो. त्या निमित्तानी आम्हाला एका सुरीनामी कुटुंबात जायला मिळणार होते आणि ते कुटुंब बघायलाही मिळणार होते. घर तसे खूप लांब होते. आम्ही कार मधून बराच प्रवास करून चाललो होतो. तिच्या घराजवळचा रस्ता हा पक्का रस्ता नव्हता. दोन्ही बाजूंनी गवत वाढले होते.  जाताना आमच्या कार च्या समोरच एक साप दिसला. तो आमच्या कारखाली च येणार होता पण गिरीशनी सफाईने कार थोडी उजव्या बाजुला घेतल्याने तो साप वाचला. आम्ही मागे वळून बघितले तर खूपच मोठा साप होता तो! पण तो वाचला होत. आम्ही त्या डॉक्टर कडे पोचल्यावर तो अनुभव सांगितला तेव्हा ते लोक ही म्हणाले की हे शहरापासून तसे दूर असल्याने इकडे कधी कधी साप दिसतात. त्या डॉक्टरची मुलगी खूपच गोड होती. आम्ही तिच्यासाठी गिफ्ट नेल्याने ती खूष झाली. तिकडे डॉक्टर च्या बहिणी, भाऊ आणि त्यांची कुटुंबे असे लोक आले होते. तिथे सुद्धा आमच्यासाठी खास veg अगदी साधे पण छान खाणे बनवले होते. शिवाय चिकन आणि बाकी non-veg  ही होतेच. शिवाय तिकडेही रंग खेळणे झाले. त्या डॉक्टर च्या आईने आम्हाला त्यांचे देवघर दाखवले. खूप देवांच्या तसबिरी होत्या त्यात. आणि फुले वाहून सुंदर पूजा केली होती त्यांनी. शेवटी आम्ही त्या सर्व मंडळींचे आभार मानून काही तासांनी घरी परत आलो.

महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही उपास केला होता. साबुदाणा, दाण्याचे कूट आम्ही नेलेच होते. आणि तिकडे रताळी, बटाटे मिळायचे. त्यामुळे आम्हाला काहीच अडचण आली नाही. आमच्या घरापासून काही अंतरावर एक शंकराचे मंदिर आहे असे कळल्याने आम्ही चौघे माहिती काढत तिकडे गेलो. त्या ठिकाणी (त्यांच्या) हिंदी भाषेतून प्रवचन चालले होते. प्रसन्न असे वातावरण होते. तिकडे काही वेळ थांबून मग आम्ही घरी आलो. शंकराचे असे सुरीनाम मध्येही दर्शन झाल्यामुळे मी आणि तृप्ती खूष होतो. आणि मी लगेच च घरी फोन करून आजीला शंकराचे दर्शन घेतल्याचे सांगितले.

(क्रमशः)