गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ९

आम्हाला एअरपोर्ट वर  पोचायला जवळ जवळ १. ३० तास लागला. पण आम्हाला सोडायला ड्राईव्हर आणि कार असल्याने काही वाटले नाही. तिकडे आम्ही पोचलो आणि व्यवस्थित चेक इन केले. वेन्कटनि सौजन्याला निरोप दिला  आणि तब्बेतीची काळजी घेण्यास बजावले. आम्हालाच ते पाहून डोळ्यात पाणी आले आणि आम्ही म्हणालो की आम्ही तिला व्यवस्थित नेऊ भारतात आणि तिला मुंबईहून हैदराबादच्या विमानातही बसवून देऊ. तू काळजी करू नकोस. 

आम्ही आत गेलो आणि आमच्या बॅग्ज चेक करायला लागले. माझ्याकडे भाजणीची थालीपीठे होती. (मला वाटतच होते की विमानात काही veg खाणे मिळेलच असे नाही. त्यामुळे मी घरूनच थालिपिठे करून आणली होती.) ती बाई विचारत बसली की हे काय आहे म्हणून? मी म्हणाले की भारतिय खाद्यपदार्थ आहेत. मग ती काहीच बोलली नाही.

सौजन्या ची बॅग चेक करताना तिनी त्या बॅग मधून 'ममा'ज हॉरलिक्स' आणले होते ते काढून दाखवायला लावले. मग बघून OK म्हणाली. नंतर फ्लाईट ला जरा वेळ होता म्हणून आम्ही असेच बसलो होतो. तर आमच्या फ्लाईट ची अनाउन्स्मेंट व्हायला लागली. नंतर च्या सगळ्या अनाउन्स्मेंटस डच मध्ये होत होत्या. त्यामुळे आम्हाला काहीच कळत नव्हते. पण आत्तापर्यंतच्या अनुभवामुळे काही खास सूचना नाहीत हे आम्हाला कळत होते. नंतर त्यांनी एक अनाउन्स्मेंट केली. ज्याच्यात ७ असा आकडा होता. आम्हाला वाटले की सीट नंबर वरून काहीतरी चालू असावे.(सीट नंबर ७० च्या पुढच्या लोकांनी जावे वगैरे.) म्हणून आम्ही त्या काउंटर वर जाऊन आमचे बोर्डिंग पासेस दाखवले. तर ती बाई आम्हाला म्हणाली की तुम्हाला चढायला अजून वेळ आहे. आत्ता मी फक्त वय वर्षे ७० पुढच्या लोकांना बोलावलेय. आम्हाला आमची फजिती बघून हसू आले.

शेवटी आम्ही फ्लाईट मध्ये बसलो आणि विमान निघायची वाट बघत होतो. डिपार्चर टाईम नुसार विमान काही सुटेना. काही कारण पण कळत नव्हते. मग नंतर एक माणूस एअर होस्टेसशी मोठ्या आवाजात काहीतरी वाद घालताना दिसला. तो डच मध्ये बोलत असल्याने आम्हाला काहीच कळत नव्हते. पण एअर होस्टेसला विचारून सुद्धा ती आम्हाला काहीच सांगेना. हे विमान वेळेत नाही सुटले तर ऍमस्टरडॅम वरूनची आमची कनेक्टिंग फ्लाईट चुकणार होती. सुरीनामला येताना आम्हाला आठ तासांचा मध्ये हॉल्ट असल्याने आम्हाला तेव्हा पूर्ण ऍमस्टरडॅम एअरपोर्ट बघता आला होता. खरेतर तेव्हा आम्हाला इतक्या मोठ्या हॉल्ट मुळे कंटाळाच आला होता. आणि परत जाताना अशी परीस्थिती होती की आमचे पुढचे विमान चुकणार तर नाही ना? त्यामुळे आम्ही चिंता करत होतो. असे करता करता शेवटी विमान नियोजित वेळेच्या एक तास उशिरा सुटले.

ते विमान ऍमस्टरडॅमला  पोचले आणि आम्हाला दुसरे विमान पकडायचे म्हणून आम्ही घाई करायला लागलो. पुढच्या विमानाची चेक इन ची वेळ पण टळून गेली होती. पण तिथे सुरीनामहून आलेल्या लोकांचे स्ट्रिक्ट चेकिंग करत होते. त्या लायनीत आमचा नंबर इतका मागे होता की आमचे पुढचे विमान चुकणारच ह्याची खात्रीच आम्हाला वाटू लागली. पण मग गिरीशने पुढे जाऊन आमचा प्रॉब्लेम सांगितला. आधी तो माणूस म्हणाला की नाही जायचे. सगळ्यांचेच स्ट्रिक्ट चेकिंग होणार आहे. पण मग आम्ही अजून थोडी विनंती केल्यावर त्याने आम्हाला जाऊ दिले. तरी पण पुन्हा आमच्या बॅग्ज चेक केल्या. मला एक बाई म्हणाली की तू तुझ्या बांगड्या काढून ठेवू शकत असशिल तर काढून ठेव. आधी मला वाटले की ते फक्त मेटल डिटेक्टर मधून जाण्यासाठी ती तसे म्हणतेय. म्हणून मी काढूनही ठेवल्या. पण मग नंतर माझ्या लक्षात आले की आता कायमच्याच इकडे ठेवाव्या लागतिल असा तिच्या म्हणण्याचा अर्थ आहे. तेव्हा मी लगेच पुन्हा हातात घातल्या. तेव्हा पुन्हा सौजन्या ला बॅग उघडायला लावली. मग मात्र आम्ही सौजन्याचे सामान आमच्या दोघांकडे घेऊन आमच्या मुंबईच्या विमानाच्या गेटच्या दिशेने अक्षरशः पळत सुटलो. आणि तिला म्हणालो की तू मात्र चालत ये.

(क्रमशः)