ओळख चिन्हांची

लहानपणापासून मला गणित या विषयाशी कधी जमवून घेता आलंच नाही. असं का झालं कोण जाणे. पण अजूनही ह्या विषयाबद्दलचा तिटकारा माझ्या मनातून  गेलेला नाही. पण आज मला  लहान मुलांसाठीचं शिक्षण अशा  विषयावरचं एक पुस्तक वाचताना सहजच वाटलं की आपल्याला शाळेत (मराठी माध्यमाच्या) गणित शिकवताना चिन्हांची ओळख शब्दातून व्यवस्थित दिली जाते का? माझा ह्या (चिन्हांची ओळख)  बाबतीतचा गोंधळ अजून ही कायम आहे हे मला आज उमजलं.  

आपल्याला शिकवलेल्या गणिता मध्ये '=' ह्या चिन्हाला काय म्हणायचे?   व त्या पाठोपाठ एखादं गणित बरोबर सोडवलं की बाई म्हणायच्या की, हे बरोबर आहे. त्या वेळी ते  बरोबर म्हणत एक चिन्ह लिहायच्या त्या चिन्हाला काय म्हणायचे? (काही कारणास्तव इथं ते चिन्ह टंकता येत नाही. )

लहानपणापासून मला (उदा. ) २ + ४ = ६ म्हणजे 'बरोबर' कसे? असा (अशा प्रकारचा) प्रश्न पडायचा. हा प्रश्न कुणासमोर सांगितला की मला म्हटले जायचे की, अरे वेड्या हेच 'बरोबर' आहे.

ह्या अशा उत्तराने मला खूप गोंधळ व्हायचा व मलाच वेड्यात काढल्याचा राग ही यायचा. राग इतका होता की अजून पर्यंत मला गणित विषय आवडत नाही. खरंच, मला कुणी सांगेल का? 'बरोबर' म्हणजे 'equal to' की 'correct' ते? की दोनही अर्थ एकच आहेत.