हे जीवन सुंदर आहे....!

मी एक बँक अधिकारी म्हणून म्हणून निवृत्त झालो. दीर्घकाळ शाखा व्यवस्थापक होतो. कर्जे देणे हा नित्याचा व्यवहार. अनेकदा कर्ज वितरणानंतर संबंधित कर्जदार पुनश्च शाखाधिकाऱ्यांच्या कक्षात यायाचा. विचारायचा-" साहेब कर्ज मिळाले. आता तुमचे किती?" मी त्याच्यावर मूळीच रागवयचो नाही. म्हणायचो, " बाबारे, मला काय द्यायचे ते बँक देते, तेवढे पुरेसे आहे. अणखी काही देशील तर माझी आज छान लागणारी झोप नाहीशी होईल. ती तू हिरावू नकोस. कर्जाचे म्हणशील तर , घेतलेल्या कर्जाचा योग्य वापर कर; दिलेल्या हप्त्यांनुसार नीट परतफेड कर म्हणजे झाले. कर्ज फिटले की मला कळव; अगदी माझी दरम्यान बदली झाली तरीही!" आणि खरेच अशी अनेक पत्रे नंतर ही येत राहात आणि मनाला खूप आनंद होई.

एकदा माझी बदली मुंबईस झाली. एरवी प्रत्येक बदली बरोबर माझे कुटुंबिय माझ्यासोबत असत.यावेळी मात्र मी एकटाच मुंबईत होतो. एक घरकर्ज वितरित करायचे होते. सर्व औपचारिकता पार पडल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष कर्ज-वितरणापुर्वी मला प्रशिक्षणासाठी पुण्यास बोलावले गेले. कार्जदाराला घाई होतीच. त्याची गरज लक्षात घेऊन मी माझे शनिवारचे येणे एक दिवस पुढे ढकलले. (प्रशिक्षण सोमवारपासून सुरू व्हायचे होते. रविवार सुट्टी होती.) शनिवारी उशीरपर्यंत बसून संबधित कर्जदाराचे दस्तऐवज पुरे केले. रविवारी त्याला त्याच्या घरी जाऊन बोलावून अणले. त्याच्या व त्याच्या जामिनदारांच्या सह्या घेतल्या व कर्ज वितरणाची पूर्ण तयारी केली. माझ्या अनुपस्थितीत कर्ज वाटप व्हायचे होते, म्हणून माझ्या सहकाऱ्यासाठी पत्र लिहून ठेवले.

 हे सर्व झाल्यावर कर्जदार त्याच्या जामिनदारांना बाहेर जाऊन पोचवून परत आला. आता तो व मी दोघेच होतो. मला म्हणाला "साहेब, हे दहा हजार घ्या! अधिक मागू नका, माझी ताकद नाही! " मी म्हटले, "मला एक पैसाही नको.मला काही हवे म्हणून केले नाही. " त्याची प्रतिक्रिया होती, " मला या घरकर्जासाठी आवश्यक कागदपत्र मिळवायला आतापर्यंत दहा हजारांचा खर्च आलाच आहे; तुम्ही घरी जायचे टाळून, रविवारीही सर्व सह्या घेतल्यात तेव्हा तुमची फार मोठी अपेक्षा असणार हे मी गृहितच धरले होते.त्यानुसार मी खुषीने देत आहे ते घ्या. " अर्थात त्यास मी पुनश्च नकारच दिला. तो भारावला. नंतर त्याने मला त्याच्या घरी जेवावयास बोलावले. ते मात्र मी आनंदाने गेलो.

अशा कैक घरांतून (हॉटेल्समध्ये नव्हे! ) मी त्या त्या ग्राहकांच्या घरात, त्यांच्या बायका-मुलांत जेवणे घेतली आहेत.

असाच मुंबईतील अणखी एक किस्सा!

इथे ही घरकर्ज मंजूर, वितरित झाल्यावर सदर गृहस्थांनी त्यांचा नव्या घरी जेवावयास बोलावले. सोबत माझ्या वृद्ध आईस ही आमंत्रण होते. आम्ही गेलो. रात्रीची जेवणे झाल्यावर त्यांनी मला एक चांदीचा तांब्या भेट म्हणून दिला. मी नाकारला तरी ही तो जवळ जवळ माझ्या पिशवीत कोंबलाच! आग्रह प्रेमाचा होता, हे स्पष्ट होते. लोकांचे प्रेम मला हवेच असते. पण त्याचे असे प्रतिक मला चालणारे नव्हते. मी थोड्याशा नाराजीनेच परतलो.

रात्री झोप आली नाही. चैन पडेना! दुसरे दिवशी भल्या सकाळीच उठलो. त्यांचा तांब्या "इदं न मम" म्हणत परत केला, तेव्हाच मन शांत झाले. इतके करून देखिल संबंधित सद्गृहस्थांचे मन मोडणार नाही अशी खबरदारी माझ्या बोलण्यातून अवश्य घेतली.

आज निवृत्ती नंतरचे देखील माझे जीवन अत्यंत सुखा-समाधानाचे आहे.

हे सर्व सांगण्याचा माझा हेतू स्वतःची टिमकी वाजवण्याचा नक्कीच नाही. अशी प्रामाणिकपणे नोकरी करणारा मी काही एकटाच नाही. माझे हजारो सहकारी - मग ते लिपिक असोत की अधिकारी- याच प्रकारे अत्यंत चांगल्या प्रकारे काम आज ही करित आहेत. तेव्हा माझी वागणूक काही नवलाई नव्हे!

होते काय, कुत्र्याला माणूस चावला की त्याची बातमी होते. जरा कोणी वेडावाकडा वागला जग साऱ्यांच्याकडेच संशयाने पाहू लागते. तसे होऊ नये म्हणून हा लेखन प्रपंच!