झटपट लोहगड

भर उन्हाळ्यात कुठल्याही गिरीभ्रमणाला जायचे म्हणजे बहुतेकांच्या अंगावर काटा येतो. का न यावा? सकाळी आठचे ऊन झेलताना शहरात दम निघतो तर उघड्यावाघड्या डोंगरांवर काय होईल?

पण नको ते उद्योग करण्यातले पदव्युत्तर प्रशिक्षण घेतलेले असल्याने या उन्हाळ्यातही गिरीभ्रमणाचा नाद मी सोडला नाही. लोहगड हा तसा पाऊण दिवस पुरणारा किल्ला. तो झटपट करता येईल का हा विचार मनात आला, आणि त्याला प्रश्नात्मक उत्तरही मिळाले, "का नाही?"

झाले असे, की एका आस्थापनेत मी व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करतो आहे. तिथली काही मंडळी माझ्या प्रतिपादनावर विश्वास ठेवायला तयार झाली. माझे प्रतिपादन होते की लोहगड करून आपण पुण्यात बारापर्यंत परतू. हा विश्वास ठेवणाऱ्यांत एक ओक आणि एक कुलकर्णी होते. तसेच एक मुखर्जी आणि एक कोहलीही. ओक आणि कुलकर्णी पुण्यात असूनही लोहगडला न गेल्याच्या अपराधी भावनेतून हो म्हणाले होते बहुधा. कारण प्रत्यक्ष जायची वेळ आल्यावर त्यांनी अंग काढून घेतले. ओकसाहेबांना त्यांच्या मुलासाठी मुलगी बघायला जायचे होते. आणि कुलकर्णी म्यॅडमना त्यांच्या मामेबहिणीच्या केळवणाला जायचे होते. लग्न करून कुणाचे भले झाले आहे? या प्रश्नाला उत्तर नाही. पण कुणाचे बुरे झाले आहे? या प्रश्नाला अशी अनेक उत्तरे आहेत. असो.

म्हणजे उरला एक मुखर्जी आणि एक कोहली. दोघांनाही लोहगड कुठे आहे याबद्दल शून्य माहिती होती. दोघेही पंचविशीचे. मुखर्जी म्हणजे नावाप्रमाणेच दिसणारा, पुण्यात आठ वर्षे काढूनही बोंगाली भाषेचा लहेजा जिभेवर मिरवणारा. कोहली कॉकटेल होती. पंजाबन आणि गोव्यात वाढलेली.

सकाळी पावणेसहाला निघायचे ठरले. दोघेही सूर्यवंशी असल्याने मला धाकधूक होती. "तू झोपेतच चालत जा" असा ओकांनी कोहलीला सल्लाही दिला होता. त्यामुळे मी पाचलाच दोघांनाही SMS हाणले. दोघांचेही उत्तर आले. हुश्श. मंडळी निदान उठली तरी होती. "झोपेत कसा कोण जाणे, सेलफोनवर हात पडून तो स्विच ऑफच झाला" असे निर्विकारपणे प्रतिपादणाऱ्या मंडळींशी गाठ पडण्याची सवय झाली होती.

आवरासावर झाली आणि लक्षात आले की त्याच दिवशी आणि सकाळी आठच्या आतच पाठवली पाहिजे अशी एक ईमेल मी आदल्या रात्री पाठवली नव्हती. ती पाठवताना घरातून निघायलाच पावणेसहा झाले. पहिले गिऱ्हाईक कोहलीबाई होती. तिची पत्ता सांगण्याची पद्धत अचाट होती. पी एन जी, पुण्याई, या खुणांपासून तिचे घर कितीतरी अगोदर होते. पण तिने खूण सांगताना ती दोन ठिकाणे वापरल्याने माझे पुढे जाऊन 'मोरू परतुनी आला' झाले. त्यामानाने मुखर्जीमोशाय पत्ता सांगण्यात पटाईत होते. शिवाय कोहलिणीला (नाव सिमरन) उचलताना झालेल्या चुकीची पुनरावृत्ती नको म्हणून मी मुखर्जीबाबाला (नाव अरिंदम) माझ्या वाहनाचे वर्णनही करून ठेवले होते. त्यामुळे सिमरन आणि मी अरिंदम कुठे दिसतो का हे पाहत असतानाच तो हात हालवत सामोरा आला आणि आम्ही प्रस्थान ठेवले. चांदणी चौकातून पौडच्या दिशेने रथचक्र वळवले.

सिमरन नुकतीच अमेरिकेतून परतली होती. त्यामुळे तिने चांदणी चौक ओलांडल्या ओलांडल्या It's amazing चा जप करायला घेतला. त्याचा कंटाळा आला तर Awesome. शिवाय मधूनमधून Freak होतेच. त्यामानाने अरिंदम शांत होता. पुण्यासारखी अस्ताव्यस्त वाढलेली शहरे असतात तसेच त्या शहरांभोवती मोहक निसर्गदृष्येही असतात, त्यात फार काही कोकलण्यासारखे नाही हे त्याला पटले होते.

भूगाव, पिरंगूट मागे टाकून आम्ही पौडला पोचलो. अजून सगळी गावे झोपेतच होती. पौड बसस्थानकाच्या लगेचच नंतर उजवीकडे वळणारा रस्ता घेतला आणि पवनानगरच्या दिशेला निघालो. लौकरच तिकोना सामोरा आला. पण त्याला 'नंतर' असा निरोप दिला आणि पवनानगर धरणाच्या भिंतीच्या कडेला पोचलो. बरोबरच्या दोन्ही नमुन्यांनी धरण कधी पाहिलेले नव्हते. त्यामुळे धरणाच्या एका टोकाला गाडी थांबवल्यावर दोघांनी समोर दिसणारा तुंग आणि उजवीकडचे लोहगड विसापूर सपासप कॅमेऱ्यात बंदिस्त करायला सुरुवात केली. आम्ही इंग्रजीत बोलत असल्याचे पाहून तिथे म्हशी धुवत असलेल्या एकुलत्या एका ग्रामस्थाचे डोके फिरले. "फोटो निकालनेकू बंदी है. कॅमरा जप्त करेंगे वो लोग" असे त्याने सुनावले. दोघेही टरकले आणि कॅमेरा झटपट बंदिस्त करून गाडीपाशी पोचले.  एवढ्या भल्या सकाळी त्याच्याशिवाय (आणि त्याच्या म्हशींशिवाय) तिथे कुणीही नव्हते.  मागून जाताना मी त्या ग्रामस्थाला "आधी लै वेळा काढलेत फोटो" असे सुनावल्यावर तो म्हशी धुवायला गेला.

तिथून पवनानगरला पोचल्यावर डावीकडे वळून लोणावळ्याच्या रस्त्याला लागलो.  पवनानगर जलविद्युत केंद्र रस्त्यात दिसते ही खूण. वाटेत ओंगळवाण्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणारे अनेक बंगले दिसले. डोंगर उतारावर बंगले बांधायला बंदी असताना या लोकांना कशी परवानगी मिळाली असेल यावर मग एक चर्चासत्र घडले. ते फारच खोलात जाऊ लागल्यावर मी सिमरनला 'गोवा' हा विषय काढून बोलते केले. अरिंदम गप्प गप्प का? याचे उत्तर होते की तो गोव्याला कधीच गेला नव्हता. मग मी तिच्याशी गोव्याबद्दल आणि त्याच्याशी बंगालीत बोलून संभाषण वाहते ठेवले. या बंगाली लोकांना वय नसते बहुतेक. इंद्रजित बिश्वास नावाचा बंगाली मित्र शुचित्रा-उत्तॉमकुमार या नावांनी वीस वर्षांपूर्वी जसा गळा काढायचा तसाच गळा हा आमच्याहून अठरा वर्षांनी लहान अरिंदमही काढत होता. रोबिंद्रो शोंगीत आणि शोत्योजित रॉय हे होतेच. विषय परत वळवून गोव्याकडे नेला.

दुधिवरे खिंड ओलांडल्या ओलांडल्या जो रस्ता उजवीकडे जातो तो थेट लोहगडवाडीत, लोहगडाच्या पायऱ्यांशी निघतो. दुधिवरे खिंडीतल्या दोबाजूंच्या उत्तुंग पाषाणभिंती पाहून सिमरनने परत Amazing, Awesome, Freak हा मंत्र जपला. अरिंदमने "इथे फोटो काढायला हवा होता" अशी कुरकूरवजा टिप्पणी केली. एकदा गाडी चालवायला बसल्यावर परतपरत थांबवण्याच्या मला येतो कंटाळा. त्यामुळे मी काही त्याला भीक घातली नाही.

लोहगडवाडीकडे चढणारा रस्ता दोनचार ठिकाणी चांगलाच कस पाहणारा आहे. विशेषतः ज्या गाड्यांचा ग्राऊंड क्लिअरन्स कमी आहे त्यांचा. त्यामुळे 'खाली कुठे लागतेय की काय' या विवंचनेत अखेर लोहगडवाडीपर्यंत पोचलो. वाटेत 'अध्यात्म'छाप मंडळींनी आश्रम वगैरे उभारून ठेवले आहेत. त्यातल्या एका ठिकाणी डिजिटल प्रिंट केलेला रजनीशचा फोटो पाहून धन्य झालो.

मधले थांबणे आणि वळणावाकणाचा रस्ता धरून इथे आम्ही पावणेआठला पोचलो. माझ्या अंदाजापेक्षा पंधरा मिनिटे जास्त. आता पायऱ्या थेट नजरेसमोरच दिसत होत्या.

चढायला सुरुवात केल्याकेल्या सिमरनने तिची घाबरगुंडी दाखवून दिली. "कुणी प्रथमोपचाराचं साहित्य आणलंय का?"

मीही घाबरलो. "का? काय झालं?"

"नाही, झालं नाही काही, आपलं विचारलं."

मग मी तिला अजूनच घाबरवून सोडलं. "इथे प्रथमोपचाराच्या साहित्याचा उपयोग होत नाही. इथे अपघात म्हणजे पाय घसरणे. आणि तसे झाल्यावर प्रथमोपचार करायला वेळच मिळत नाही. अंतिम उपचारच, म्हणजे संस्कारच करावे लागतात." तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. तिने एका पायरीवरच बसकण मारली. मी बधलो नाही. एवढा नाजुकपणा दाखवायचा तर यायचंच कशाला? शेवटी अरिंदमने आपला बंगाली श्रेष्ठत्वाचा मुखवटा बाजूला ठेवून तिची समजूत काढली.

किल्ला चढलो आम्ही पंचवीस मिनिटांत. पण त्या वेळात धापा टाकीत Freak या शब्दाचा काहीशे वेळा तरी जप झाला. वर पोहचल्यावर सभोवतालचे दृष्य पाहून मग Awesome आणि Amazing. एवढे शब्ददारिद्र्य असलेली व्यक्ती पहिल्यांदा पाहिली.

गडावर एक देऊळ आहे नि एक मशीद/दर्गा. मुसलमानांचा काहीतरी कार्यक्रम होता बहुतेक. त्या मशीद/दर्ग्यात पन्नास-साठ माणसे बूड टेकून बसली होती. मंद आवाजात लावलेल्या लाऊडस्पीकरवर काहीतरी बडबड चालू होती ती ते ऐकत होते.

वरती सर्वात उंच टेकाडावर या दोघा वीरांना चढवले. सोपे दिशादर्शन केले - लोणावळा कुठे, पुणे कुठे, तुंग कुठे, तिकोना कुठे, विसापूर कुठे आदी. ते संपताच त्यांनी एकमेकांचे फोटोसेशन केले. मी तोवर चिवडा खाऊन घेतला. मग दोघांना घेऊन विंचूकाट्याकडे प्रयाण केले. विंचूकाटा म्हणजे गडाच्या पश्चिमेकडे (साधारणपणे लोणावळ्याच्या दिशेला) गेलेली चिंचोळी माची. गडाकडे येण्याची मुख्य वाट उत्तरेकडून (मळवली स्टेशन रेल्वेने, किंवा कार्ल्याचा फाटा जुन्या रस्त्याने) आहे. तिथून जो लोहगडाचा विस्तार दिसतो, त्यात विंचूकाटा जवळजवळ चाळीस टक्के लांबीचा आहे.

वाट थोडी फसवी आहे, पण झेपण्यातली आहे. एकदोन ठिकाणी सिमरनने गुरुत्त्वाकर्षण अद्याप आहे हे सिद्ध केले. सुदैवाने तिची मनोवृत्ती शास्त्रीय नसल्याने ती पुनःपुन्हा प्रयोग करीत बसली नाही. मध्ये एका ठिकाणी सरळ जाऊन परत येऊन मग वाट सापडते. शेवटपर्यंत जाऊन आमचा झेंडा लावला नि परतलो.

खाली गाडीपाशी पोचलो तेव्हा जेमतेम साडेदहा होत होते. अशारीतीने झटपट लोहगड करून आम्ही बाराला पुण्यात पोहचलोदेखील.

टीपः (१) सिमरन चढू शकली म्हणजे सात ते सत्तर वयोगटातल्या कुठल्याही व्यक्तीला चढण्याला 'नाऱ्हरकत' प्रमाणपत्र मिळाले.

(२) उष्माघातापासून बचाव करण्यासाठी माणशी तीन लिटर साधे पाणी आणि एक लिटर साखर-मीठयुक्त पाणी जवळ बाळगावे.

(३) पुणे लोणावळा लोकलने येऊन उन्हाळ्यातसुद्धा हा ट्रेक करता येईल, मात्र तो एवढा झटपट होणार नाही. सकाळी पावणेसहाची लोणावळा लोकल घेतली तर मळवलीला सातला उतराल. ऊन नसल्याचा फायदा घेऊन फारसे न रेंगाळता पाऊल उचलले तर जास्तीतजास्त सव्वाआठपर्यंत पायऱ्यांपर्यंत पोहोचाल. म्हणजे वरती पोचायला पावणेनऊ. साडेदहापर्यंत खाली लोहगडवाडीमध्ये उतरलात तर पावणेबारापर्यंत परत मळवली. बाराच्या आधीचे ऊन खूपच सुसह्य असते. तरीही टोप्या/छत्र्या जवळ असू द्याव्या. बाराची लोणावळा पुणे लोकल घेऊन सव्वापर्यंत पुण्यात परत.

(४) लोहगडवाडीत जेवणाची व्यवस्था होऊ शकते. पण मग चारपर्यंत थांबून उन्हे उतरल्यावर परतीचा प्रवास. पुण्यात पोचायला सात वाजतील.

(५) 'भर उन्हाळ्यात असले उद्योग करायला सांगितलेत कुणी?' या प्रश्नाला या टीपेद्वारे मी 'पास' म्हणत आहे.