कार्यकक्षेचा सावळा गोंधळ

    मी सध्या ज्या कंपनीत काम करतो, तेथील व्यवस्थापनातील प्रत्येकाला विशिष्ट पद आहे. परंतु, अधिकारकक्षा कुठपर्यंत मर्यादित अथवा विस्तारीत आहेत, याची नेमकी सीमा निश्चित केलेली नाही.
    काही महिन्यांपूर्वी मी एक प्रस्ताव एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे घेऊन गेलो. त्याने त्या प्रस्तावाला फारशी चर्चा न करता लगेच मंजुरी दिली. अलीकडे तसाच एक प्रस्ताव घेऊन गेलो तर तो खेकसला, "हे थेट माझ्याकडे कशाला आणले? माझ्याआधी अमुकतमुक अधिकाऱ्याकडे जायला पाहिजे होते. तो अधिकारी मला अहवाल देतो, मला अर्ज करतो. त्याच्या सहीनंतर माझी सही होते." 
  एरवी तसा हा अधिकारी चांगला आहे.
  माझ्या आधीच्या कंपनीत यापेक्षाही सावळा गोंधळ होता. कंपनीत 'इन्फार्मल कल्चर' आहे, असे झेंडे फडकविण्यात येत होते. कोणीही कोणाशीही कोणत्याही शंकेसाठी संपर्क साधू शकतो, हे जणू काही ब्रीदवाक्य म्हणूनच मिरविण्यात येते होते. पुढे पुढे तर कोणीही कोणालाही या ना त्या कामासाठी बोलावू लागले, शंका बाजूलाच राहिल्या. नक्की कोणाचे ऐकायचे, कामाची पध्दत कशी असावी, अहवाल कोणाला द्यायचा, याबाबत कसलीच निश्चिती नव्हती.
  याच कंपनीत सिस्टिम अडमिनिस्ट्रेटरला साधा प्रिंटर टोनर विकत आणण्यासाठी केव्हाही कंपनीबाहेर पाठविले जात होते. हार्डवेअरशी संबंधित तो एकमेव माणूस कंपनीत होता. तो कंपनीबाहेर गेला आणि कोणाचा संगणक बंद पडला की तो येईपर्यंत एकमेकांना वारा घालण्याचेच काम उरत असे.
  अशा अवस्थेत नव्या कर्मचाऱ्यांची अवस्था जत्रेत वाट चुकलेल्या मुलासारखी होते. 
 
  असे कोणाला काही त्रासदायक किंवा गंमतीदार अनुभव ?
  असे का घडत असावे ? कार्यकक्षेबाबत सर्वच गोष्टी कागदावर मांडता येत नाहीत, असे असेल?