दाराला कुलूप लावून शर्मिला घाईघाईनं बाहेर पडली. घड्याळाकडे तिनं एक नजर टाकली. सव्वा अकरा, म्हणजे लायब्ररी बंद व्हायला अजून पाऊण तास आहे. खाली येऊन तिनं स्कूटी सुरू केली. डोक्यावर हेलमेट चढवलं. हे हेलमेटचं झंझट नवीनच होतं. इतक्या वर्षात कधी सवयच नव्हती. आगरतळ्याला असतानाही नचिकेतची बाईक तीच जास्त वापरायची. पण तिथेही अशी हेलमेटची सक्ती नव्हती. शिवाय इथला घाणेरडा उकाडा, तो ही नव्हता तिथे!
आगरतळा... स्वप्नात तरी वाटलं होतं का तिकडे जाऊन आपण इतकी वर्षं राहू म्हणून? ओएनजीसीचा परिसर, तिथली कॉलनी, तिथे राहणारी सगळी भिन्नभाषिक कुटुंबं - त्या जगात शर्मिला आणि नचिकेत दोघांनीही स्वतःला बऱ्यापैकी रुळवून घेतलं होतं. अनुषालाही खेळायला मैत्रिणी होत्या, भलंथोरलं ग्राऊंड होतं, बाग होती...
अनुषाची शाळा सुटायच्या आत परत आलं पाहीजे. चौकात सिग्नलला थांबावं लागलं तसं शर्मिलानं पुन्हा एकदा घड्याळाकडे नजर टाकली. गेल्या महिन्यातच या लायब्ररीत तिनं आपलं नाव नोंदवलं होतं. आगरतळ्याला मराठी पुस्तकं आणि मासिकांची फार उणीव भासायची. तरी मित्रमैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून मागून नेऊन पुस्तकवाचनात शर्मिलानं होता होईल तो खंड पडू दिला नव्हता. पण गेल्या आठदहा वर्षांत मासिकांशी मात्र तिचा संपर्क पार तुटला होता. या लायब्ररीत पंधरा दिवसांतून एक पुस्तक आणि हवी तेवढी मासिकं अशी एक योजना होती. मासिकं वाचायला तिला मनापासून आवडायचं. म्हणूनच घरापासून जरा लांब असूनही तिनं हीच लायब्ररी निवडली होती.
शर्मिलाला तिथे पोचायला साडेअकरा झाले. आदल्या आठवड्यात नेलेलं पुस्तक आणि मासिक काऊंटरवर ठेवून ती आत गेली. आधी पुस्तकांचा विभाग होता. मधल्या इंग्लिश पुस्तकांच्या शेल्फकडे ढुंकूनही न बघता शर्मिला थेट मराठी पुस्तकांकडे वळली. इतकी वर्ष ओएनजीसी क्लबच्या लायब्ररीतून इंग्लिश पुस्तकं तर आणत होतो आपण. आता किमान वर्षभर तरी इंग्लिश पुस्तकांना हात लावायचा नाही असं तिनं सुरूवातीलाच ठरवून टाकलं होतं.
‘महानायक (ले. : विश्वास पाटील)’, पाहिल्यापाहिल्या तिनं ते जाडजूड पुस्तक लगेच उचललं. मागे एकदा स्टेशनवर टाटा करायला येताना तृप्ती आठवणीनं घेऊन आली होती. पण केवळ त्या पुस्तकाच्या वजनापायी शर्मिलानं ते नेणं रहित केलं होतं...
तृप्तीला फोन केला पाहिजे एकदा. अनुषाच्या ऍडमिशनचं काम झाल्यावर केला होता. त्यानंतर बोलणं नाही झालेलं. आपला नवीन मोबाईल नंबरही तिला कळवला पाहिजे.
सहा महिने होत आले आपल्याला आगरतळा सोडून! काहीही ध्यानीमनी नसताना अचानक नचिकेतचं प्रमोशन आणि मुंबईला बदली दोन्ही एकदम झालं. आईबाबा, सासूसासरे, अद्वैत-अमृता, किती खूष झाले होते कळल्यावर! आणि सोहम! वर्षा-दीडवर्षातून एखादेवेळीच भेटणारी त्याची अनुताई त्याला आता वरचेवर भेटणार होती...
समोरची मासिकं न्याहाळताना अचानक ‘अंगण - मे २००८’ अशी अक्षरं शर्मिलाला दिसली. अंक तीनचार महिन्यांपूर्वीचा होता. तरी तिनं तो पटकन उचलला आणि उघडून अनुक्रमणिका बघितली. सोयरीक - पान नंबर १३. हे सदर अजूनही सुरू आहे तर! शर्मिलाचं मन झरझर अनेक वर्षं मागे गेलं. या सोयरीकमार्फत तर तिची आणि नचिकेतची पहिली भेट झाली होती. तिनं भराभर पानं उलटली...
शर्मिला ऑफिसमधून घरी आली तर हॉलमध्येच आईबाबा कुठलंतरी मासिक घेऊन बसले होते. दोघंही एकच मासिक वाचतायत? तिला गंमतच वाटली. वाचतावाचता मधूनच आई जवळच्या वहीत काहीतरी लिहून घेत होती. समोर टी-पॉयवर अजून तीनचार मासिकं होती. तिनं मान वाकडी करून नाव वाचलं. अंगण? हे कुठलं मासिक? आणि त्याचे एकदम इतके अंक?
"काय करताय? इतकं काय वाचताय त्या एकाच मासिकात? आणि बाबा, आज तुम्हाला चक्क बातम्यांचीही आठवण नाहीये? " त्यांच्यासमोर बसत शर्मिलानं विचारलं.
"तुझ्यासाठी नवरा नको का शोधायला आता? " वहीत पुन्हा काहीतरी लिहून घेताघेता आई म्हणाली.
"ईऽऽ! असा? मासिकात? तुम्हाला काय मॉडेल जावई हवाय की काय? "
"आम्हाला असा जावई हवाय जो इतरांसाठी मॉडेल ठरेल. " बाबांनी चष्म्याआडून तिच्याकडे बघत मिष्किलपणे उत्तर दिलं.
"तू सुद्धा ही मासिकं चाळ जरा" आई टी-पॉयकडे बोट दाखवत म्हणाली. "... त्यात सोयरीक नावाचं सदर आहे. त्यात स्थळांची माहिती येते दर महिन्याला. "
शर्मिलानं त्यातलं एक मासिक उचललं. सोयरीक - पान १९. तिनं ते पान उघडलं. तिथून पुढची पाचसहा पानं आईनं सांगितलं तशी इच्छुक वधूवरांच्या यादीनं भरलेली होती. आधी विवाहोत्सुक वधू, नंतर वर.
"अरे वा! वधूंची यादी आधी! या क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या पुढे गेलेल्या दिसतात. "
"चेष्टा पुरे! जरा नजर फिरव त्यावरून" आई जरा घुश्श्यातच म्हणाली.
शर्मिलानं ते पान काढलं आणि वाचायला सुरूवात केली.
‘२७/५-७/एमबीए/१०, ०००/पुणे/स्वतःचं घर’... नको! माझ्याच उंचीचा आहे. आपल्याला तर बुवा सहा फूट उंच नवरा पाहीजे. ती मनातल्या मनात म्हणाली.
‘सोलापूरस्थित वर, वय ३०, एम. कॉम. एम. बी. ए., मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी, १२०००’... एम. कॉम. एम. बी. ए. करेपर्यंत वय वाढलेलं दिसतंय याचं! नापास-बिपास झाला असेल मध्येच एखाद्या वर्षी! कल्पनेनंच तिला हसू आलं.
‘दिल्ली/एकुलता एक/सुस्थितीत/६-२/सी. ए. /स्वतःचा व्यवसाय/घरची जबाबदारी नको’... शहाणाच आहे! घरची जबाबदारी नको म्हणे! स्वतः एकुलता एक आहे म्हणून काय सगळ्या जगानं एकुलतं एक रहायचं की काय! रागच आला तिला वाचल्या वाचल्या!
काहींची माहिती अगदी त्रोटक होती तर काहीजणांचा सविस्तर परिचय दिलेला होता. काहीजण विशेष चौकटीतले होते.
"असा यातून नवरा शोधणार तुम्ही माझ्यासाठी? "
"मग दुसरी कुठली चांगली पद्धत आहे का सांग मला? तूच बघ ना. चाळीस-पन्नास स्थळं ऍट अ ग्लान्स. आपण पहायची आणि हवी ती निवडायची. " बाबांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
बाबांचंही बरोबर होतं...
शेजारच्या बाईचा धक्का लागला आणि शर्मिला एकदम भानावर आली. हातातलं मासिक पुन्हा जागेवर ठेवून पुढ्यातला ‘माहेर’चा ताजा अंक तिनं उचलला आणि महानायक आणि तो अंक घेऊन ती बाहेर पडली.
बाहेरची इतर सटरफटर कामं उरकून ती घरी पोचेपर्यंत पाठोपाठ अनुषाची स्कूलबसही आलीच. शर्मिला आणि नचिकेतला वाटलं होतं त्यापेक्षा अनुषा बरीच लवकर नव्या शाळेत, नव्या वातावरणात रुळली होती. शिवाय आता दोन्ही आजीआजोबांना आणि मुख्य म्हणजे सोहमला वरचेवर भेटणं शक्य होतं. त्यामुळे ती खूष होती. अनुषा आणि सोहम, दोघांमध्ये पाचसहा वर्षांचं अंतर होतं. म्हणायला दोघं चुलत भावंडं होती. पण त्यांच्यात सख्ख्या भावंडांपेक्षाही जास्त जिव्हाळा, प्रेम होतं. आगरतळ्याला असतानासुद्धा दोघांच्या फोनवरून गप्पा, ई-मेल्स्, ग्रीटींग कार्डस्ची देवाणघेवाण सगळं जोरात सुरू असायचं...
जेवण करून दुपारी अनुषा अभ्यासाला बसली तसं शर्मिलानं महानायक हातात घेतलं. जाडजूड पुस्तकं पाहूनच तिच्या तोंडाला पाणी सुटायचं. आता हे पुस्तक बरेच दिवस पुरेल आपल्याला. पण वाचनात तिचं लक्षच लागेना. ‘सोयरीक’नं नकळत डोक्यात पिंगा घालायला सुरूवात केलेली होती...
शर्मिलाच्या संमतीनंच आईबाबांनी तिचं नाव अंगण मासिकाच्या सोयरीक वधूवरसूचक मंडळात नोंदवलं होतं. मासिकाकडून नियमित पत्रव्यवहार होऊ लागला. शर्मिलाच्या अटींत बसणारी काही स्थळं निवडून त्यांची माहिती दर महिन्याला घरी पाठवली जाई. इतर दोनतीन ठिकाणीही नावनोंदणी केली गेली होती. तिथून आणि सोयरीककडून कळलेल्या स्थळांबद्दल जास्त माहिती मिळते का ते पहायचं, त्यांच्याशी पत्रव्यवहार करायचा, त्यांची भेट घ्यायची यासारख्या कामांत दोघंही गढून गेले होते. त्यानंतर जेमतेम चारपाच महिने गेले असतील आणि एक दिवस सोयरीककडून तीन नव्या स्थळांची माहिती आली. त्यांतलंच एक नचिकेतचं होतं. अपेक्षा जुळल्या, अटी पटल्या, पसंती झाली आणि त्यावर्षीच्याच नोव्हेंबरमध्ये त्यांचं लग्न झालं...
"आईऽऽ, दूध दे आणि काहीतरी खायला पण... " आतल्या खोलीतून अनुषाचा आवाज आला. पुस्तक बाजूला ठेवून शर्मिला उठली. आज बुधवार नाही का, आज अनुषाचा ड्रॉईंगचा क्लास असतो.
नचिकेतप्रमाणेच अनुषाच्या बोटांत उपजत कला होती. चित्रकलेची एक परिक्षाही तिनं आदल्याच वर्षी दिली होती. त्यामुळेच मुंबईत आल्याआल्या तिच्या शाळाप्रवेशापाठोपाठ शर्मिलानं तिच्यासाठी चित्रकलेच्या चांगल्या क्लासचा शोध घेतला होता.
अनुषा तीनचार वर्षांची असताना नचिकेतनं तिच्यासाठी प्रथम क्रेयॉन्स आणले होते. एवढीशी मुलगी, तिला काय कळणारे रंगीत खडूंचा उपयोग, कपडे-भिंती घाण करून ठेवेल, अश्या विचारांनी शर्मिला आधी वैतागलीच होती. पण दुपारची झोप झाली की एक कोरा कागद आणि ते रंगीत खडू यांच्यात अनुषा जी रंगून जायची ती पार तिचा अद्वैतकाका घरी येईपर्यंत. मग तासभर काकापुतणीची दंगामस्ती चालायची.
अद्वैतचं लग्न! सकाळी अंगणचा अंक पाहिल्यावर आधी तेच तर आठवलं होतं आपल्याला...
घरात अद्वैतच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. अंगण आणि सोयरीकचा पहिला अनुभव चांगला असल्यामुळे अद्वैतचं नावही तिथे नोंदवलेलं होतं. सोयरीकचं कार्यालय घरापासून जवळ होतं. त्यामुळे शर्मिलाच्या सासूसासऱ्यांच्या तिथे महिन्यातून दोनतीन चकरा तरी व्हायच्याच. एकदा तिचे सासरे पाय मुरगळून पडण्याचं निमित्त झालं. कुणाच्या आधाराशिवाय त्यांना घरात वावरणंही कठीण होऊन बसलं. त्यामुळे सासूबाईंनाही घरात अडकायला झालं आणि हे माहिती काढून आणायचं काम अगदी अनपेक्षितपणे शर्मिलावर येऊन पडलं.
शर्मिलाला तो दिवस आजही अगदी लख्ख आठवत होता. तिच्या स्वतःच्या लग्नाच्या वेळेला सोयरीकशी तिचा तसा थेट संबंध आलाच नव्हता. पण आता मात्र ती तिच्या धाकट्या दिरासाठी वधू शोधायला आली होती. एके काळी तिची स्वतःची माहिती विवाहोत्सुक वधूंच्या यादीत आली होती. मुलाकडचे म्हणून कोणकोण येऊन ती यादी धुंडाळून गेले असतील, कुणीकुणी तिची माहिती टिपून घेतली असेल. आता मात्र मुलाची थोरली भावजय म्हणून ती स्वतःच वधूंची माहिती धुंडाळणार होती.
सोयरीकच्या रिसेप्शन काऊंटरवर तिनं व्हिजिटर्स फॉर्म भरून दिला. अद्वैतचा नोंदणी क्रमांक सांगितला. फॉर्म वाचून काऊंटरवरच्या जाडगेल्या चष्मेवाल्या बाईनं शर्मिलाकडे थोड्याश्या आश्चर्यचकित नजरेनं बघितलं. तिच्या तश्या बघण्याचा अर्थ शर्मिलाला कळला नाही. पण त्याकडे फारसं लक्ष न देता ती आत गेली. वर आणि वधूंची माहिती दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये संकलित केलेली होती. ती ‘वधूंची माहिती’ असं लिहिलेल्या खोलीकडे वळली.
आत कुणीच नव्हतं. आपण एकट्याच? असं कसं?
आपसूकच समोरच्या ‘वरांची माहिती’ खोलीकडे तिचं लक्ष गेलं. तिथे चांगलीच वर्दळ होती.
अरे वा! विवाहोत्सुक वधू संख्येनं इतक्या जास्त आहेत? आणि इकडे वर एक पण नाही? वरांची खरंच इतकी कमतरता आहे की दुसरं... अजून... काही... कारण...? त्या विचारासरशी शर्मिला एकदम चपापली.
वरपक्षाकडून लोक येतात शोधाशोध करायला? हे काय भलतंच! उपवर मुलींच्या आईवडिलांनी, नातेवाईकांनी स्थळांची शोधाशोध करायची. वणवण भटका, माहिती काढा, पत्ते शोधा, फोन करा, पत्र टाका हे व्याप त्यांनी करायचे; फोनचा, पत्रांचा पाठपुरावाही त्यांनीच करायचा, करायलाच हवा! आम्ही मुलाकडचे, आमच्याकडे स्थळं चालून येतील... त्या रिकाम्या खोलीतून ही दर्पोक्ती शर्मिलाच्या एकदम अंगावर आली. मगाचच्या त्या काऊंटरवरच्या बाईची नजर हळूहळू उमगायला लागली...
क्षणभर ती खूप अस्वस्थ झाली. मनातल्या विचारांना दूर सारत तिनं त्या खोलीतल्या टेबलवरची २-३ जाडजूड बाडं उचलली आणि एका कोपऱ्यात चांगली उजेडाची, पंख्याखालची जागा पाहून ती बसली. बाकी कुणी आलं तर आपल्यामुळे खोळंबा नको.
पण खोळंबा व्हायला तरी इतर कुणी येणार आहे का इकडे??
या वेळेला मनाला त्या विचारांपासून दूर न्यायला तिला जास्त प्रयास पडले.
अद्वैतच्या इच्छा, अपेक्षा तिला माहीत होत्याच. घरात कितीतरी वेळा त्यावर चर्चा झाली होती. सोयरीकमध्ये द्यायचा बायोडेटा तिनं आणि अद्वैतनं मिळूनच तर तयार केला होता. तिनं एकएक करून मुलींची माहिती वाचायला सुरूवात केली...
एके काळी आपल्या आईबाबांनी आपल्यासाठी हे असंच सगळं केलं असेल. ते इथे असे प्रत्यक्ष आले असते तर फक्त त्या तिकडच्या खोलीत बसावं लागलं असतं त्यांना. तेव्हाही... ही खोली... अशीच रिकामी असेल...? आपल्या नोंदवलेल्या माहितीवरून फारशी कुणीच नजर फिरवली नसेल??
तिला आठवलं, बाबांनीच नचिकेतच्या वडिलांना प्रथम पत्र पाठवलं होतं, नंतर दोनतीनदा फोनही केले होते. आपल्याप्रमाणेच त्यांनाही पत्रिका वगैरे पहायची नाही हे कळल्यावर त्याच आनंदात होतो आपण. ते कळवणाऱ्या त्रोटक दोनतीन ओळींच्या उत्तराकडे तेव्हा आपलं फारसं लक्षच गेलं नव्हतं...
आता इतक्या वर्षांनी आपल्याला का आठवावं हे सगळं? केवळ सकाळी लायब्ररीत तो अंगणचा अंक दिसला म्हणून? पण मग हेच का आठवावं? त्याच्याशी निगडीत चांगल्या आठवणींचं काय?...
‘पुणे/२८/५-१०/केमिकल इंजिनीयर/खाजगी कंपनीत नोकरी/८०००’ - सोयरीककडून नचिकेतची प्रथम माहिती कळली होती ती अशी त्रोटकच. केमिकल इंजिनीयर ना, मग कोण देणार याला बारा-पंधरा हजाराची नोकरी असं म्हणून सुरूवातीला मनातल्या मनात शर्मिलानं त्याची चेष्टाही केली होती. उंचीवरून तर तृप्ती किती वेळा चिडवायची नचिकेतला - ‘सहा फुटाच्या खाली बघायला तयार नव्हती ही मुलगी! तू नक्की काय जादू केलीस रे हिच्यावर? ’
आईबाबांनाही जरासं आश्चर्यच वाटलं होतं. नाहीतर त्या डॉक्टर मुलाचं स्थळ आलं होतं ते, केवळ तो मुलगा उंच नव्हता म्हणून आपण त्याला नकार दिला होता. आईशी तेव्हा किती वाद घातला होता त्यावरून! नचिकेतला भेटल्यावर हा उंचीचा मुद्दा विसरूनही गेलो होतो आपण. तृप्तीला हे असंच म्हणायचं असावं काहीतरी...
तृप्ती म्हणायची तशी खरंच काही जादू असते किंवा नाही ते शर्मिलाला माहीत नव्हतं. पण पुणे, २८, ५-१० असल्या शब्दांमुळे अशी काही जादू-बिदू होत असेल यावरही तिचा विश्वास नव्हता. ती जादू, तो वेगळेपणा समजायला सहवास घडावा लागतो. सुरूवातीच्या त्रोटक माहितीतून आणि एकदोन भेटींमधून कळणाऱ्या गोष्टी, बांधलेले आडाखे पुढच्या आयुष्यात कितपत परिणामकारक राहतात? फारसे नाहीत, किंबहुना अजिबातच नाहीत. प्रत्येकजण आपापल्या परिनं काहीएक वेगळेपणा जपतच असतो. समोरच्याचं काम असतं तो वेगळेपणा ओळखणं, त्याला मान देणं. नचिकेतचा, त्याच्या घरच्यांचा वेगळेपणा आपल्याला हळूहळू उमगत गेलाच की! तरीही अद्वैतच्या लग्नाच्यावेळेस आपण ते तसे नकारात्मक विचार का करत होतो? शर्मिलाला स्वतःचंच पुन्हा एकदा नवल वाटलं...
त्यादिवशी सोयरीकच्या कार्यालयातून घरी येतानाही तिला स्वतःचं असंच नवल वाटलं होतं. रस्ताभर ती विचार करत होती. कार्यालयाच्या त्या खोलीत कुणी नव्हतं या बारीकश्या सुतावरून कुठला स्वर्ग गाठला आपण! तो केवळ योगायोग असू शकतो. आपण दररोज सकाळ संध्याकाळ पहायला जाणार आहोत का तिथे कोणकोण येतं किंवा नाही ते? त्या खोलीचं आत्ता असं रिकामं असणं आपल्याला अस्वस्थ करतंय की आपल्या लग्नाच्या वेळीही ती तशीच रिकामी असेल या शंकेनं खोलवर कुठलंतरी वादळ उठतंय? पण त्या शंकेला आता का थारा द्यायचा? आपल्या लग्नाला चारपाच वर्षं उलटून गेल्यावर? नचिकेत, अद्वैत, सासूसासरे आता आपल्या आयुष्याचं अविभाज्य अंग बनून गेले आहेत. ना कधी ती दर्पोक्ती आपल्याला जाणवलेली, ना कधी तशी वागणूक वाट्याला आलेली. आपण स्वतःला त्या सर्वांपासून वेगळं कल्पूच शकत नाही आता. मग ही अस्वस्थता का? बाकी जग आपणहून नको जाऊ दे वधूंची माहिती शोधायला पण आपल्याला किंवा आपल्या सासूसासऱ्यांना नाही ना वाटत त्यात कमीपणा, मग झालं तर.
मनाचा खूप गोंधळ उडाला होता. स्वतःचाच थोडासा रागही येत होता.
आपल्यासाठी स्थळं बघतानाही असेच वरचष्मा मिरवणारे काही अनुभव आलेच होते की वाट्याला...
अमेरिकेतून आठ दिवसांसाठी आलेला तो मुलगा - भारतात काय ठेवलंय, अमेरिकाच कशी चांगली, तिथलं त्याचं घर, तिथे मी कसा स्वतःच्या हिमतीवर सेटल झालोय हे असलं बोलण्यातच गर्क होता. पाहिल्या पाहिल्या अगदी मनात ठसला वगैरे नव्हता पण माझ्याशी लग्न करणारीला कायमचं तिकडे येऊन राहावंच लागेल, नोकरी करावीच लागेल असं त्यानं सांगताक्षणीच तो मनातून उतरला होता एवढं मात्र नक्की.
अजून एक जण, तो सांगलीचा - पत्रिका पहायची आहे म्हणून बाबांना किती दिवस लटकवून ठेवलं होतं त्या लोकांनी. दर तीन चार दिवसांनी बाबा त्यांना फोन करायचे. शेवटी पत्रिका जुळत नाही असा निरोप आला त्यांच्याकडून. नकार द्यायला काहीतरी कारण, दुसरं काय! आणि तो तिसरा, पुण्यातलाच, कोण बरं, नावं पण आठवत नव्हती कुणाची आता...
फोनची रिंग वाजली तशी शर्मिला दचकली. नचिकेतचाच फोन होता. घरी यायला उशीर होईल, साडेदहा-अकरा वाजतील असं सांगून त्यानं घाईघाईत फोन ठेवून दिला. यालाही नेमका आजच उशीर होणार आहे, रोजच्या वेळेला घरी आला असता तर निदान आपलं या आठवणींकडे जरा दुर्लक्ष तरी झालं असतं, तिला वाटून गेलं. नचिकेतजवळ या गोष्टींचा तिनं कधी उल्लेख केलेला नव्हता. उल्लेख करण्याजोगं होतंच कुठे काय फारसं?
अनुषा क्लासहून घरी आल्यावर शर्मिलानं तिचं आणि स्वतःचं ताट वाढलं. शर्मिलानं आपल्यासाठी वाट बघत ताटकळत जेवायला थांबावं असा नचिकेतचा कधीच आग्रह नसायचा...
नचिकेतला उशीर होणार असेल तेव्हा अनुषाला झोपवल्यावर शर्मिला आणि अद्वैत इच्छुक वधूंची माहिती पुढ्यात घेऊन बसायचे. ते दोघं आणि सासूसासरे - चौघांच्या चर्चा सुरू व्हायच्या.
‘५-३/बी. कॉम. /गहूवर्ण/गृहकृत्यदक्ष’ - मुलींच्या वर्णनात गहूवर्ण हा शब्द आला की अद्वैतचं एक वाक्य ठरलेलं असायचं - इथे गहूवर्ण लिहिलंय म्हणजे ती नक्कीच काळी असणार! नको, फुली मारा त्या स्थळावर!
‘५-२/मुंबई/एम. एस्सी. /गोरी/’ - यावर सासूबाईंची तात्काळ प्रतिक्रिया यायची - मुंबईची मुलगी आणि वर डबल ग्रॅज्युएट म्हणजे नंतर ही फार डोईजड होणार, ही नको!
राहण्याचं ठिकाण, पदवी आणि स्वभाव यांचा असा संबंध जोडलेला पाहून शर्मिला थक्क व्हायची. अश्या प्रकारची टिप्पणी तिला नाही म्हटलं तरी खटकायची, मनाला कुठेतरी टोचायची. त्यांच्या बोलण्यात हेटाळणीचा सूर असायचा का? की आपल्यालाच तो तसा वाटायचा?
पहिल्याप्रथम चेष्टा तर तिनंही नचिकेतची केलीच होती. पण ती स्वतःशी, मनातल्या मनात. उघडपणे ती असं काही बोलली असती तर आईबाबांना ते आवडलं नसतं. पण इथे अद्वैतच्या मनाला तो विचार शिवलेलाही दिसत नव्हता. त्याच्या अश्या प्रतिक्रियांचं सासूसासऱ्यांनाही फारसं काही वाटलेलं दिसत नव्हतं. हे असं का? त्यांची बाजू मुलाकडची म्हणून? नीट बघून पारखून शहानिशा करून घ्यायची गरज तर दोन्ही बाजूंना असते. पण त्यातही तोलूनमापून शब्द वापरण्याची, सर्व गोष्टी विनम्रतेनं हाताळण्याची जबाबदारी फक्त वधूपक्षाचीच?
पण कोण म्हणतं की फक्त त्यांच्यावरच तशी जबाबदारी आहे म्हणून? पिढ्यांपिढ्या चालत आलेले विचार हे, दुसरं काय! आपल्या मनावरही त्याच विचारांचा पगडा आहे की! मुलाकडचे आणि मुलीकडचे, वरपक्ष आणि वधूपक्ष अशी भाषा वापरून आपणही या चर्चांकडे त्याच नजरेतून पाहतोय त्याचं काय? खरं काय आणि खोटं काय? चूक काय आणि बरोबर काय? या विचारांना कितपत महत्त्व द्यायचं, शंकांना कितपत थारा द्यायचा, काहीच नक्की कळायचं नाही.
अद्वैत अमृताचं लग्न झालं आणि चारसहा महिन्यातच नचिकेतला ‘ओएनजीसी’ची नोकरी मिळाली. अनुषाला घेऊन नचिकेत आणि शर्मिला आगरतळ्याला गेले. घरापासून लांब गेल्यावर, नवीन जागेची, नव्या गावाची सवय करून घेता घेता शर्मिलाच्या मनाचा अस्वस्थपणाही हळूहळू कमी होत गेला...
पुन्हा एकदा फोनची रिंग वाजली. इतक्या उशीरा म्हणजे नक्कीच घरून फोन असणार असं मनाशी म्हणत शर्मिलानं फोन उचलला. पलिकडून अमृता बोलत होती. तिची दोनचार वाक्य बोलून होत नाहीत तोपर्यंत सोहमनं तिच्या हातून फोन काढून घेतला. त्याच्या शाळेत झालेल्या टीचर्स डे सेलिब्रेशनबद्दल त्याला त्याच्या अनुताईला कायकाय गंमती सांगायच्या होत्या. अनुषा आतल्या खोलीत क्लासमधलं अर्धवट राहिलेलं चित्र पूर्ण करत बसली होती. शर्मिलानं तिला बाहेर बोलावलं आणि फोन तिच्याकडे दिला.
आपल्याला जे जाणवलं ते अमृतालाही कधी जाणवलं असेल का? - शर्मिलाच्या मनात आलं. ती आणि आपण एकाच तर बोटीतल्या प्रवासी. काहीकाळ आपल्याला दुसऱ्या बोटीतून जावं लागलं आणि आपलं मन असं सैरभैर झालं. पण तिच्या दृष्टीनं तर आपणही मुलाकडच्या, सासरकडच्यांपैकीच एक! मग तिची या बाबतीतली मतं काय असतील? तिनं यावर कधी काही विचार केला असेल का? की आपण एकट्याच या वेटोळ्यात फिरतोय?
वरपक्ष आणि वधूपक्ष अश्या दोन गटांचं स्वतंत्र अस्तित्व तर आपण मान्य करतोय. दोन वेगवेगळे गट म्हणजे त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्यं आली - काही चांगली, काही वाईट; काही समांतर, काही छेदून जाणारी. एकदा ही बाब स्वीकारली की त्यामागून येणाऱ्या इतर बाबीही स्वीकारायलाच हव्यात... सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आता चौदा पंधरा वर्षांनी या सगळ्या गोष्टींवर विचार करत बसणं कितपत संयुक्तिक आहे?
छे! आज हे विचार का पाठ सोडत नाहीयेत?
आणि तिनं अचानक चमकून अनुषाकडे पाहिलं. फोनवर सोहमशी बोलण्यात ती अजूनही गर्क होती.
असं तर नव्हे की आता आपण या सगळ्याकडे नव्यानं बघतोय? एका वयात आलेल्या मुलीची आई म्हणून? अद्वैतच्या लग्नाच्यावेळेस वरपक्षाच्या म्हणून ज्या गोष्टी दिसल्या, जाणवल्या, खटकल्या, ज्यातला आपला गृहित धरलेला सहभाग आपल्याला नकोसा वाटला त्याच सगळ्या गोष्टी पुन्हा अनुषाच्या लग्नाच्या वेळी वाट्याला येतील का? तेव्हा आपण पुन्हा नव्यानं वधूपक्ष स्वीकारलेला असेल. अद्वैतच्या लग्नाच्यावेळेस आपण घरच्या सर्वांना सगळ्या गोष्टींत साथसोबत केली, आता घरचे सगळे आपल्या सोबत असतील... असतील ना? मग तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया, टिकाटिप्पण्या कश्या असतील? कश्या बदलतील? तेव्हा त्यांच्याही मनात असाच विचारांचा गुंता होईल? कोण जाणे!
कुणी सांगावं, अजून काही वर्षांनी कदाचित अनुषाही इंटरनेटवरच्या मॅट्रीमनीच्या साईटस धुंडाळेल, सोहमसाठी एखादी मुलगी शोधेल. तेव्हा तिला काय अनुभव येतील? तेव्हा असंच काहूर तिच्याही मनात उठेल? कोण जाणे!
पार्किंगमध्ये नचिकेतच्या बाईकचा परिचित आवाज शर्मिलानं ओळखला.
हे सगळे मुद्दे खरंच इतके वादग्रस्त आहेत की फक्त आपल्याच मनाचे खेळ आहेत? कधीतरी नचिकेतशी याबद्दल बोलावं का? त्याची काय प्रतिक्रिया असेल या सगळ्यावर? कोण जाणे!