"म्हणत राहा, मित्रांनो, श्रीराम, जयराम जयजयराम..श्रीराम, जयराम जयजयराम.. " अद्वैतच्या वडिलांनी शववाहिकेच्या खिडकीतून बाहेर बघत हात जोडले. हळू हळू वेग घेत ती गाडी इस्पितळाच्या आवाराच्या बाहेर पडली. आजूबाजूला हुंदके देत उभ्या मुलामुलींनी एकमेकांच्या खांद्यावर डोकी ठेवली. चौदा पंधरा वर्षांची ती मुलं मुसमुसत रडू लागली.
पुन्हा डोळे पुसून मी वर पाहिलं. निरभ्र आभाळ. चांदण्यांचे क्षीण डोळे. हवेत किंचित गारवा. डोळ्यांच्या एका कोपऱ्यातून दिसणारी इस्पितळाची भव्य इमारत. वेगवेगळ्या विभागांच्या पाट्या. त्यातल्या पहिल्या मजल्यावरचा अतिदक्षता विभाग. त्यातली एकशे तीन क्रमांकाची खोली. आणि आता त्या खोलीत नसलेला अद्वैत. कुठेच नसलेला अद्वैत. सर्व जाणिवांच्या पलीकडे गेलेला अद्वैत.
हे असं होणार याची मानसिक तयारी करायला दोन आठवडे मिळाले होते. पंधरा दिवसांपूर्वी अद्वैत रानडेला बसची धडक बसली आणि तेंव्हापासून तो अत्यंत गंभीर अवस्थेतच होता. रोज त्याच्याविषयी वेगवेगळ्या, पण निराशाजनकच बातम्या येत होत्या. त्याच्या शाळेतले मित्र आणि त्या मित्रांचे आमच्यासारखे पालक - आम्ही सगळेच प्रचंड तणावाखाली होतो. काही चमत्कार झाला, तरच तो यातून वाचेल, हे उघड झालं होतं. पण असला काही चमत्कार सहसा होत नाही, हे वैज्ञानिक मत खोटं ठरावं, असं अंतर्मन सतत म्हणत होतं.
आणि आता हे सत्य पचवताना मन बधीर झालं होतं. मानवी प्रयत्न, योजना, अभिलाषा, महत्त्वाकांक्षा यांच्यातला फोलपणा ध्यानात यावा असा हा क्षण. सगळं समजून काहीच न समजण्याचा हा क्षण.
अद्वैत हा माझ्या मुलाचा वर्गमित्र. दहावीतला. या वयातली मुलं जशी उत्साहानं आणि जीवनरसानं रसरसलेली असतात तसा. बोलक्या डोळ्यांचा हा चुणचुणीत मुलगा लहानपणापासून घरी यायचा. त्याची बुद्धीमत्ता, त्याने मिळवलेली बक्षिसं, त्याचं गाणं, लहानपणापासून त्यानं नाटकात केलेली कामं याचं कौतुक वाटायचं. वाढदिवसाला एखाद्याच्या घरी जमायचं, काहीतरी भरपूर हादडायचं,एका खोलीत जमिनीवर गाद्या घालायच्या आणि रात्रभर गप्पा, मोठमोठ्यांदा हसणं, रात्री मध्येच उठून रस्त्यावर भटकायला जाणं असं करून रात्र जागवायची असले या मुलांचे प्रकार बरेच दिवस होत असत. पुढं ही मुलं मोठी झाली तशी हळूहळू पालकांपासून सुटी होत गेली. मग त्यांचे आपापसात चाललेले खालच्या आवाजातले संवाद, एकमेकांना टाळ्या देऊन मोठ्यांदा हसणं, वरती घरात न येता तासनतास फाटकाशी आपापल्या सायकलींना रेलून गप्पा मारत राहाणं , एकमेकांना एसेमेस फॉरवर्ड करणं व नेटवर चॅटिंग करत राहाणं सुरू झालं. त्यांचे कोवळे चेहरे आता काहीसे निबर होऊ लागले. बऱ्याच दिवसांनी त्यांच्यापैकी कोणी दिसला तर तो अचानकच ताडमाड उंच झाल्यासारखा वाटत असे. लहानपणी गोबरे गाल असलेल्या कुणाचा चेहरा एकदम बदलल्यासारखा वाटे. कुणाच्या ओठावर मिशीची रेघ उमटल्यासारखी वाटे. धड बालपण नाही, धड तारुण्य नाही अशा या आडनिड्या वयातली ही मुलं, त्यांचे कधी बालीश तर कधी प्रौढ असे विचार, त्यांचे ग्रूप्स आणि त्यातली घट्ट मैत्री हे बघताना मजा येत असे. स्वतःच्या भूतकाळात चालत जाण्यासारखेच असे ते. दहावीचं वर्ष, त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या शिकवण्या, पुढचे बेत यात गढून गेलेला असे. त्यातूनच एकत्र येऊन कधीतरी त्यांची धमाल चाले. आता त्यांचे वाढदिवस मॅक्डोलाल्डसमध्ये व्हायला लागले होते. मध्येच कधीतरी ही मुलं गंभीरपणानं ' आता आम्ही सगळे एकत्र असं हे शेवटचंच वर्ष. पुढया वर्षी कोण कुठल्या कॉलेजात असेल, मग आम्ही सगळे एकत्र असे कसे भेटणार? ' असा विचार करत.
आणि अचानक एखादा आघात व्हावा तशी अद्वैतच्या अपघाताची बातमी आली. तो अतिदक्षता विभागात आहे आणि अत्यंत गंभीर अवस्थेत आहे हे सांगताना माझ्या मुलाचा आवाज कापरा झाला होता. आणि ते कापरेपण लपवणे काही त्याला जमत नव्हते. शर्थीचे वैद्यकीय उपचार सुरुच होते. शाळेत त्याच्यासाठी प्रार्थना सुरू झाल्या. एरवी उत्साहानं फुललेल्या या मुलांचे चेहरे एकदम काळवंडून गेले. त्याला इस्पितळात भेटण्याची तर कुणालाच परवानगी नव्हती. पण त्याच्या पालकांना भेटून आलेली ही मुलंही दबकल्यासारखी झाली होती. 'आपण त्याला हाका मारू आणि त्याचं रेकॉर्डिंग करून ते त्याच्या उशाशी वाजवत राहू म्हणजे तो लवकर जागा होईल' असं या मुलांचं त्याच्या मित्रांशी बोलणं ऐकलं आणि मी त्या खोलीतून बाहेर पडलो. 'बाबा, ही इज सिंकिंग' असं माझ्या मुलानं मला नजर टाळत सांगितलं आणि त्याचाकडं बघून काही बोलणं मलाही जमलं नाही.
आणि आज हे.
इस्पितळात अद्वैतच्या वडिलांना सामोरं जायचा धीर होत नव्हता. सर्वस्वाची होळी होत असताना गुढग्यांना मिठी घालून एकटक नजरेने समोर पाहात ओढ्याकाठी बसलेले 'बिटाकाका' आठवले. 'त्याला भेटा, तो एकशे तीनमध्ये आहे.. ' ते कसेबसे म्हणाले. त्यांच्या 'भेटा' या शब्दाने आतवर खोल काहीतरी भळभळू लागलं.
भेटलो. मृत्यूची चिरशांती पांघरलेला अद्वैत. पंधरा वर्षांत संपून गेलेलं एक आयुष्य. मन पूर्ण कोरं करणारा क्षण.
परत निघालो. गाडीत कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. माझ्या मुलाशेजारी त्याचा एक मित्र बसला होता. एरवी दिवसेदिवस तरुण होत जाणारी ही मुलं आता अगदी लहान, अगदी असहाय वाटत होती. हवा अगदी स्वच्छ होती. माझ्या चष्म्यामागे मात्र मळभ दाटून येत होते.
घरी आलो. अंथरुणावर पडलो. झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. विविध प्रसंगांचे, आठवणींचे तुकडे मनात उलटेसुलटे फिरत होते. मृत्यूच्या विक्राळ दर्शनाने बावरलेल्या, हादरून गेलेल्या त्या कोवळ्या मुलांचे चेहरे डोळ्यासमोरून हालत नव्हते. डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते.
शेवटी उठलो. एक आवडते पुस्तक काढले. शेवटचे पान उघडले आणि वाचू लागलो...
समजते ती एकच गोष्ट. अत्यंत विशाल असा अश्वत्थ वृक्ष गदागदा हलत आहे आणि दर क्षणाला त्यावरील पाने तुटून वाऱ्यावर भरकटत येऊन मातीत पडत आहेत. गडकरी यांच्या अंगणातील पिंपळाची मास्तरांनी आणलेली पाने उडालीच, पण खुद्द गडकरी गेले व दातार मास्तर देखील गेले. राम-लक्ष्मण, शिकंदर, व्यास, वाल्मिकी नाहीसे झाले. त्याप्रमाणेच दादा, आई, आजोबा ही पाने देखील गेली. टेक्सासमध्ये दूर कुठेतरी एक ओळखीचे पान आहे, पण ते देखील फार दिवस टिकणार नाही. माझा देखील कधी तरी अश्वत्थाशी असलेला संबंध तुटेल, आणि मातीच्या ओढीने मला खाली यावे लागेल.
अशव्त्थाची सळसळ अखंड चालूच असते, आणि भिरभिरणाऱ्या पानांचे तरंगत खाली येणे हे कधी थांबतच नाही. प्रत्येक पान खाली उतरताना कदाचित 'समजत नाही, समजत नाही' असे म्हणत एक उच्छ्वास सोडत असेल. त्यांच्या उच्छ्वासामुळे वाऱ्याला सातत्य मिळते, त्याचा वेग जास्तच वाढतो व आणखी काही पाने खाली येतात व येताना म्हणतात' समजत नाही, समजत नाही, समजत नाही'
की 'समजत नाही, समजत नाही ' हेच ते साऱ्याबाबतचे अखेरचे शब्द असतील? ते देखील समजत नाही .