सचिनला यात ओढू नका

सध्या महाराष्ट्रात जो भाषावाद व प्रांतवाद उसळला आहे त्यावरून सचिनला प्रश्न विचारणे हेच मुळात चुकीचे आहे, असे मला वाटते. चुकीच्या व्यक्तीला, चुकीचा प्रश्न विचारला की उत्तरही चुकीचेच मिळणार!

ज्या पत्रकारांनी सचिनला, "मुंबई कुणाची? " असा प्रश्न विचारला त्या पत्रकारांनी हे ध्यानात ठेवायला हवे की सचिन म्हणजे निवडणूकीला उभा असलेला राजकीय पक्षाचा नेता नाही. तो जेव्हा खेळतो, तेव्हा संपूर्ण देशासाठी खेळतो. त्याच्या खेळावर फक्त मराठी माणूसच नाही तर इतर भाषिकही खूष असतात. तो जेव्हा बाद होतो, तेव्हा मराठी माणसाइतकंच दु:ख इतर भाषिकांनाही झालेलं असतं. असं असताना, संपूर्णपणे खेळ या क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तिमत्त्वाला भाषा व प्रांतवादाविषयी प्रश्न विचारून उत्तर मागण्याचा वेडेपणा करू नये. (उद्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानतर्फे मराठी माणूस खेळला, तर सचिन त्याच्या चेंडूवर मुद्दाम बाद होईल का? )

भाषा व प्रांतवादावरून प्रश्न विचारायचा झालाच तर कुणाही पत्रकाराने सचिनला, "तू कुठल्या प्रांताचा? किंवा तू कुठल्या भाषेचा? " असा प्रश्न का विचारला नाही. प्रसारमाध्यमं कोणतीही बातमी आपल्या शैलीत खुलवून सांगतात. या पद्धतीमुळे सचिनचे उत्तर हे काही राजकीय पक्षांना जणू ’इशारा’ असल्यासारखे भासत आहे. 'सचिनला कोणत्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे समजत नाही', असं वाटणाऱ्यांनी कृपया हे समजून घ्यावं की जर सचिनने या प्रश्नाचे उत्तर दिले नसते, तर त्याला एका विशिष्ट प्रांताचा व भाषेचा ठरवून राजकीय पक्षांनी त्याचा बाऊ करायला सुरूवात केली असती. तीच गोष्ट त्याने उत्तर दिल्यावरही घडत आहे.

देशाचा एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून सचिनचा गौरव केला जातो तेव्हा प्रांतवादावरून व भाषावादावरून प्रश्न विचारून पत्रकार आपली संकुचित वृत्ती दर्शवतात. त्याला प्रांत व भाषेच्या चौकटीत अडकवून सचिनच्या कारकिर्दीला नजर लावू नका.