कशासाठी ?

आजच्या वर्तमानपत्रात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये शालेय/ महाविद्यालयीन मुलांनी आत्महत्या केल्याचे वाचले. मनात प्रश्न आला की नेमकं असं काय होतं आपल्याला की एखादा जवळचा व्यक्ती आत्महत्या करेल इतकं टेन्शन या छोट्या मुलांवर येतं आणि जवळच्या व्यक्तींना ते कळतच नाही. सुशांत पाटील सहामाही परीक्षेत नापास झाला तरी त्याचे पालक शिक्षकांना भेटायला गेले नाही ? इतके बेजबाबदार कसे होवू शकतात पालक ? पैसा पैसा करता करता आपण काय हरवून बसतोय हेच कळत नाही ?

जी कथा सामान्य मुलांची तीच हुशार मुलांची. भजनप्रीत ह्या एम. बी. बी. एस.ला शिकणाऱ्या मुलीने २ विषयात नापास झाल्याने स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या केली. बातमीवरून असे दिसते की ती काही दिवस प्रचंड तणावाखाली होती. हा तणाव तिचे पालक कमी करू शकले नाही ? का ती नापास झाली म्हणून त्यांनीच तिला रागावले होते ?

कशासाठी ? मुलं जन्माला घालणे आणि पुढे ती वाट्टेल तशी वाढू देणे हेच पालकांचं कर्तव्य आहे ? शिकवणी, खेळ आणि गायन वा नर्तनाचे क्लास, त्यांच्या महागड्या फी देणे इतकंच पालकांना कळते का ? "तू बोलू नको, तुला काय कळते... तुझी बडबड बंद कर, मला काम करू दे", किंवा इतर काही वाक्यांव्यतिरिक्त आपल्याला संवाद साधता येत नाही का ?

नक्की काय चुकतंय ? मुलांचं की पालकांचं ? का गुणांच्या स्पर्धा वाढवत नेणाऱ्या सरकारचं ?

हे थांबायला हवं, हे कळतंय... पण वळत नाही.....

शेवटी मूल हवंय, कशासाठी ? आपल्या अपुऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ? का रेसचा घोडा बनवण्यासाठी ?

"आयुष्य सुंदर आहे" हे स्वतःलाच कळलं नसेल तर दुसऱ्याला काय सांगणार ? मग पालकांनाच शाळेत घालावं का ? बालसंगोपन हा लग्नानंतर एक आवश्यक कोर्स असावा, जेणेकरून मुलांना कसं जोपासावं हे कळेल. पण त्यातही मी ९५% मिळवले म्हणणारे "अती"शहाणे तयार झाले तर ..... ?