नटरंगाचा रंग

नुकताच नटरंग चित्रपट पाहिला. त्याचेविषयी वृत्तपत्रांतून समीक्षा वाचली होती. प्रत्यक्षात चित्रपट बऱ्याच बाबतीत पसंतीस उतरला व मनात रेंगाळत राहिला.

ही कथा मूळ एका तमाशावेड्या कलावंताची, एका शरीर कमावलेल्या पहिलवानाची, एका दारिद्र्यात दिवस काढणाऱ्या परंतु मनाने राजस्वप्ने पाहणाऱ्या, बायका-पोरांच्या जबाबदारीला न जुमानणाऱ्या मस्तान्याची!

त्याच्या आयुष्यात तो एक धाडसी निर्णय घेतो. तमाशाचा फड काढतो. त्यात नाच्याची भूमिका करण्याचे धार्ष्ट्य दाखवतो. खरे तर ती त्याची असहायता असते. भविष्याची आशा असते. आपण पाहिलेल्या स्वप्नाला मूर्त स्वरूप मिळावे म्हणून केलेली तडजोड असते. परंतु, काही काळासाठी करावी लागणारी ही 'भूमिका'च त्याच्या बाकी जीवनाला कसे गिळंकृत करते ह्याचे सार्थ चित्रण ह्या चित्रपटात केलेले आढळते. झी टॉकीज ने काढलेला हा चित्रपट अजून एका वेगळ्या उंचीला नेता आला असता. पण कदाचित दिग्दर्शकाने मूळ कथेला वेगळी कलाटणी देण्याचा मोह टाळला असावा. शेतमजूर असलेला 'गुणा कागलकर' स्वतःचा तमाशा तर काढतोच, परंतु त्यात वैयक्तिक आयुष्यात झळ, मनस्ताप, दुःख सोसून यशस्वी होतो. नाव, प्रसिद्धी, पैसा कमावतो. त्यासाठी व त्याच्या कलेच्या वेडापायी, एका विलक्षण जिद्दीने तो हा साहसी प्रवास करत जातो. एकदा बेचिराख झालेल्या आयुष्यातून हार न मानण्याच्या त्याच्या जिद्दीपायीच पुन्हा उभा राहतो व यश संपादन करतो. 

चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे अजय-अतुल यांचे कर्णमधुर संगीत होय. कथेत माझ्या मते एका प्रकारे फारसे नाविन्य नाही, मात्र ही कथा ज्या पार्श्वभूमीवर रेखाटली आहे, तिच्यात जी पात्रे आहेत ती पाहता ते अपेक्षितच आहे. कारण ह्यात समाजाच्या मानसिकतेचे, दुटप्पीपणाचे व संकुचिततेचे चित्रण आहे, जे प्रातिनिधिक आहे. तमाशाच्या वेगवेगळ्या अंगांना आजवर आपण चित्रपटांतून हाताळलेले पाहिले. परंतु एका नाच्याच्या आयुष्यावर प्रकाशझोत हेच ह्या चित्रपटाचे वेगळेपण! अतुल कुलकर्णी ह्यांनी 'गुणा'च्या भूमिकेत कमाल केली आहे. फक्त शरीरयष्टीच नव्हे तर संपूर्ण देहबोलीतील फरक घडवून आणणे सोपे काम नसते, जे त्यांनी साध्य केले आहे. मात्र त्यांच्या नाच्याच्या भूमिकेतील संवादांना अजून स्पष्टता हवी होती असे माझे व्यक्तिगत मत आहे. तसेच काही ठिकाणी त्यांच्या बोलण्यात 'सुशिक्षितते'ची झाक दिसते. उच्चारांतील फरक जाणवतो. 'गुणा'च्या पात्राभोवतीच कथानक फिरत असल्यामुळे मला एक स्त्री म्हणून ह्या कथेतील दोन्ही प्रमुख स्त्रियांवर, म्हणजेच 'गुणा'ची बायको व 'गुणा'ची प्रेयसी नयना ह्यांच्यावर जरा अन्याय झाल्यासारखे वाटले. पण येथे कथानक 'गुणा'चे असल्यामुळे ते अभिप्रेत आहे.
सोनाली कुलकर्णी ज्युनियर यांची तमासगिरीण झकास! लटके झटके, मुरके, अदाकारी नेत्रसुखद! बाकीही सर्व पात्रांनी उत्तम काम केले आहे. गाण्यांचे रेकॉर्डिंग व मिक्सिंग छान झाले आहे. गाण्यांचा ठेका, पार्श्वसंगीत मला आवडले.
शेवटी जी श्रेयनामावली येते त्याची संकल्पनाही आवडली.

थोडक्यात मराठी व ज्याला नेहमीच्या गुळमुळीत चित्रपटापेक्षा काही वेगळे पाहावयाचे आहे अशा प्रेक्षकांनी अवश्य पाहावा असा हा चित्रपट आहे.

-- अरुंधती कुलकर्णी

 दुवा क्र. १