अंधाऱ्या बोळाच्या टोकावर (लोकल गोष्टी-२१)

स्टेशनच्या मागच्या बोळातून मी एकटी अशी पहिल्यांदाच चालले होते.. पायाखाली चिपचिपीत उखडलेला रस्ता, अपुरा प्रकाश, अनोळखी वाट.. तशी अगदीच वर्दळ नव्हती असे नाही.. गेली तीन-चार वर्षतरी मी लोकांना इथून येजा करताना बघत होते. मीना बरोबर असताना याच्या पलीकडच्या रस्त्याने आम्ही बऱ्याचदा चालत घरी जायचो, तिच्याच सोबत एकदा या बोळातून ही गेले होते. ते तेवढंच.

त्या दिवशी लोकल नेमकी सहा नंबर प्लॅटफॉर्मावर गेली. दोन दोन जिने चढून उतरून जायचं जाम जिवावर आलं होतं, म्हणून मग या बोळाने बस डेपोकडे जायला निघाले. पावसाचं इथे तिथे साचलेलं पाणी, त्यातून चालता यावं म्हणून मध्ये-अध्ये टाकलेले दगड.. फुटक्या फारशांचे तुकडे, खडी-रेतीचे ढिगारे, त्या तशा पावसात साचलेल्या पाण्यात ब्रिजचं छप्पर पाहून थाटलेला उघड्यावरचा संसार, रेल्वे लाइनला लागून असलेल्या बोळकांडात उघडणारी घरांची गेटं, मध्येच मरून पडलेला उंदीर, आणि त्या तशा अरुंद बोळातून येणारी जाणारी माणसं.. (ज्यांची एकाच वेळी आधार आणि भीती वाटत होती. )

त्याच्या पलीकडच्या टोकाला ती उभी होती. बेढब सुटलेलं अंग.. त्यावर गुंडाळायची म्हणून गुंडाळलेली झिरझिरीत साडी.. तिचा वारंवार ढळणारा कधी तसाच अर्धवट ओघळू दिलेला पदर.. चेहऱ्यावर थापलेला मेकअपचा भडक रंग.. तोंडात भरलेला पानाचा तोबरा.. पिचकाऱ्यांनी लाल लाल झालेली शेजारची भितं.. पायातली तुटकी चप्पल.. हातात मोबाईल फोन.. रंगलेल्या ओठांवर तशाच रंगेल गाण्याची धून.. अंगाला आळोखे पिळोखे देत घेतलेल्या उत्तान पोझेस.. गिऱ्हाईकं शोधणारी तरबेज नजर.. एवढं सगळं लिहिल्यावर हे कुणाच वर्णन आहे ते वेगळं सांगायलाच नको.

याच्या आधी बघितलेल्या वेश्या अगदी साध्या-सुध्या गरीब बायकाच वाटल्या होत्या. त्या आणि घरोघरी जाऊन धुणी भांडी करणाऱ्या बायका यांच्यात वरवर बघता काहीच फरक करता आला नसता. तसेच रापलेले हात, खंगलेलं शरीर, त्रासलेले चेहरे, आणि थकलेली मनं.. मुलं-बाळ, नवरा गळ्यात मंगळसूत्र असलेल्या या बायका आणि त्यांच्यासाठी झटणाऱ्या संस्था, यांच्याबद्दल मनात थोडी आस्था निर्माण झाली. त्यांनाही समाज, शासन, कायदा यांची मदत मिळाली पाहिजे आवश्यक ती माहिती, वैद्यकीय उपचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत असं मनापासून वाटलं. त्या सात-आठ जणी पैकी एकही स्वतःहून या धंद्यात उतरलेली नसावी. आणि त्यांच्यातली ती छोटी मुलगी तिचा संकोच, तिच कसनुसणं तिचं ते निरागसपण तर कित्येक वर्ष झाली तरी विसरता येत नाही.

(त्यांच्यात आणि हिच्यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे त्या  सात-आठ जाणीना मी एका समाजसेवा करणाऱ्या संथेत पाहिलं होतं.) ही तिकिट घराच्या बाजूला स्ट्रीट लाइटच्या पोलखाली म्हटलं तर आडोशाला म्हटलं तर भर वर्दळीत राजरोसपणे गिऱ्हाईकं हेरत होती. ही अशी धंद्यासाठी उभी असलेली वेश्या मी पहिल्यांदाच पाहिली. मुर्दाड चेहरा.. नजरेतलं आव्हान.. क्षणभर काहीतरी विचित्र पाहिल्या सारखी नजर आकसली. अंधारा बोळ तिथेच संपला होता.. समोर उजेडात न्हाणार तिकीट घर होतं.. पलीकडे बसेस, रिक्षांचा नेहमीचा गजबजाट होता..

पुढे पावसाळा संपला.. कच्च्या वाटेवर रेती पसरली गेली टाईलस लागल्या.. माझ्या पायांना या वाटेची आणि डोळ्यांना तिला बघून बघायची सवय झाली.. (या दरम्यान,ती तिची गिऱ्हाईकं, तिचे लटके झटके, तिच फोनवरचं बोलणं, तिची साथीदार वगैरे बरंच काही दिसलं.. ) लाइट लावले गेले अंधार कमी झाला.. वर्दळ वाढली.. आणि मग कधीतरी ती दिसेनाशी झाली.

===================================
स्वाती फडणीस......................................... २३-०२-२०१०