हातातला खजिना

रोज सकाळी राजसला शाळेत सोडल्यावर मी ऑफिससाठी स्टेशन गाठायचे.. राजसची शाळा पावणेनऊला सुरू व्हायची त्यानंतर अगदी चालत आले तरी नऊ सव्वा नऊ पर्यंत मी पार्ले स्टेशनवर पोहचायचेच. माझ्या कडे तसा बराच वेळ असायचा.. दोन नंबर प्लॅटफॉर्म वर चेंगरा चेंगरीत घुसून लोकल पकडावी लागायची नाही. सहा नंबर प्लॅटफॉर्म वर नऊ अठरा चर्चगेट लोकल लागलेली असायची. ती मी आरामात पकडू शकायचे.. आणि जरी काही कारणांनी ही लोकल चुकली तरी पुढच्या लोकलनी मी वेळेत ऑफिसला पोहचायचे. त्यामुळे तसा बराच निवांतपणा होता. आणि मन निवांत असलं की त्याला आजूबाजूच दिसतं.. किंवा दिसलेलं आपल्या पर्यंत पोहचत अस म्हणायला हरकत नाही.

मी स्टेशनवर पोहचायचे तेव्हा लोकल ट्रेन मध्ये.. पिना, टिकल्या, कानातले.. अशा बारीक-सारीक वस्तू विकणाऱ्या बायका त्यांची हातातला खजीना व्यवस्थित लावण्यात मग्न असायच्या.. एकात एक दाबून बसवलेले शर्टाचे बॉक्स त्यातल्या तऱ्हे-तऱ्हेच्या वस्तू पूर्णंपणे उसकटून ठेवलेल्या असायच्या.. आणि या बायका एकमेकिंशी बोलत त्या सगळ्या वस्तू नीटनेटक्या आहेत की नाहीत हे तपासून पुन्हा त्याच शर्टच्या बॉक्स मध्ये मनाप्रमाणे लावण्यात गुंग झालेल्या असायच्या. त्यांच्या मांड्यांवर त्यांची तान्हुलीही निवांत पहुडलेली असायची.. मग कोणीतरी चहावाला येऊन या बायकांना चहा आणि पाण्याचे ग्लास देऊन जायचा..
ट्रेन येईपर्यंत मी रोज या बायका, त्यांची आवर-सावर, त्यांच्या हालचाली, त्यांची मुलं, त्या उत्सुकतेने बघायचे.

बघता बघता मला या बायका आवडायला लागल्या.. विशेषतः त्यांच्यातल्या पंधरा सोळा वर्षांच्या कोवळ्या लग्न झालेल्या मुली काही वेगळ्याच दिसायच्या.. त्यांचे ते चापून-चोपून बसवलेले केस, भांगात भरलेला सिंदूर, कपाळावरची उठून दिसणारी ठसठशीत टिकली त्या खाली लावलेली गंधाची हलकीशी रेघ. केसांमध्ये माळलेला गजरा.. अगदी साधी पण नीटनेटकी नेसलेली साडी त्यावर कॉंट्रास मॅचिंग साधणारा ब्लाऊज, त्यांची रेखीव अंगकाठी, आणि मला सगळ्यात जास्त आवडणारे त्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस कोवळे भाव.

त्यांच्यातलीच एक मुलगी/बाई मी ज्या ट्रेन मध्ये चढायचे त्या ट्रेन मध्ये चढायची.. तिच्या हातात एक टीकल्यांचा बॉक्स, एक लहान मुलींसाठी केसांना लावायच्या रंगीबेरंगी फुला मण्यांनी सजवलेल्या पिनांचा बॉक्स, एक प्लॅस्टिकच्या छोट्या मोठ्या केसांना लावायच्या चिमट्यांचा बॉक्स त्यात बनाना क्लिप, बटरफ्लाय क्लिप, बिडस असे काय काय असायचे, आणखीन एक वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेस्लेट आणि गळ्यातल्यांचा स्वतंत्र गुच्छ तिच्या हातात असायचा.. ट्रेनला फारशी गर्दीही नसायची त्यामुळे काही जणी तिच्या हातावरल्या दुकानातल्या वस्तू बघण्यात रस घेत. मलाही ब्रेस्लेट, टिकल्या, पिना असे काही बाई घ्यायला आवडायचे.. तरी रोज रोज काय घेणार..? एखादं वेळा टिकल्याची तीन-चार पाकीट घेतली की ती एक-दोन महीने सहज पुरतात. कधीतरी दोन-तीन पिना घेतल्या.. एकदा दोन ब्रेस्लेट घेतली. ही मुलगी ही अतिशय निरागस अन कोवळी होती.. सकाळी सकाळी तर ती खूपच ताजी तवानी प्रफुल्लित वाटायची.. आता रोज रोच चेहरे बघून माहीत झाल्यामुळे ही मुलगीही मी काही घेतलं नाही तरी तिच्या बॉक्स मध्ये मला उचकपचक करू द्यायची.. आणि कधी मधी काही वस्तू घेतल्या असल्यामुळे मलाही तिचे बॉक्स मागून घ्यायला भीड वाटायची नाही.

ट्रेन मध्ये विशेष गर्दी नसताना या अशा फेरी वाल्यांचे डब्यात येणे चूक की बरोबर असा विचारही मनाला शिवायचा नाही. पण तेच गर्दी मधून प्रवास करताना किरकोळ सामान विकणाऱ्या या बायका, लहान मुलं, विक्रेते बनून किंवा भीक मागायला म्हणून डब्यात चढणारी आंधळी अपंग माणसं.. नकोशी वाटतं. कधी मधी कोणी त्यांना डब्याच्या दाराशी अडवायचं.. कोणी त्यांच्या विक्रीसाठी चालवलेल्या उंच स्वरातल्या हाकाळ्यांनी वैतागायचं.. तर कोणी त्यांना डब्यात चढल्या बद्दल बोलत असायचं.. पण तेच काम करून पोट भरणारीही माणसं दुसऱ्या दिवशी परत डब्यात दिसायची.

मला रोज सकाळी दिसणाऱ्या त्या बायकांनाही यातून जावं लागत असेल..! असं कधीतरी मनात येऊन जायचं. आणि तेवढ्यात डब्यात चढलेली माझी ती सुमुखी दिसायची.. ती दिवसेंदिवस आणखीन आणखीनच सुंदर दिसू लागली होती. तिच्या गळ्यातली काळी पोत. नाकात चमकणारी चमकी.. आणि त्या चमकीहून जास्त लखाकणार तिच्या ओठांवरच हसू.. या सगळ्या विचारांना कुठच्याकुठ दूर सारून टाकायचं.

या सुमुखी कडे पाहीलं की नेहमी वाटायचं लोक सौंदर्याची फक्त व्याख्या गोऱ्या रंगाशी कशी काय बांधून ठेवतात बरे..! त्यांना काळ्या सावळ्या रंगातले हे रेखीव नाक डोळे, पांढरं शुभ्र निर्मळ हास्य, काटक प्रमाण बद्ध अंगकाठी दिसतच नाही की काय..?
खरं तर सौंदर्य स्पर्धांच्या मंचावर या मुलींना उभं करायला हवं. एका हाता तीन-चार वजनदार खोकी आणि दुसऱ्या हातात लटकती झुंबर घेऊन डौलात चालण्याच त्यांचं कर्तब कॅटवॉक ची भाची म्हणवण्याच तोडीच.

आता तर माझी सुमुखी दिवसेंदिवस अधिकाधिक सुंदरच दिसत होती.. तिच्या काटक शरीरावरची गोलाई उठून दिसू लागलेली.. तिचा हसरा मुखडा वेगळ्याच तेजानं उजळला होता. काही दिवसातच ती थोडी पाठीमागे झुकल्या सारखी वाटायला लागली.. तिचं पोटही कळून येण्या इतकं पुढे आलं होत.. तरी ती तशीच अंगावरचा आणि खांद्यावरचा भार पेलत सराईतपणे तिच्या कडच्या वस्तूंची विक्री करतच होती.

कसलं कौतुक नाही.. की कोणती तक्रार नाही. चेहऱ्यावर तेच स्वर्गीय भाव..! आणि मध्येच एक आठवडा-पंधरा दिवसांपुरती ती कुठेशी गायब झाली.. आणि परतली ते पोटावरची गोलाई पाठीवरती तोलतंच. पण आता मात्र ती पूर्वीसारखी दिसत नव्हती. या आठवड्या-पंधरा दिवसात तिची पूर्ण रयाच गेली होती. नाकात चमकी होती, गळ्यात काळी पोत होती, कपाळावर मोठी टिकली होती.. चापून-चोपून बसवलेले केस अस्ताव्यस्त विस्कटले होते.. नीट-नेटकी साडी अंगाला गुंडाळल्या सारखी दिसत होती.. आणि चेहऱ्यावरील हास्याची जागा थकव्यानं घेतली होती. आताही ती चालत होती.. अंगाखांद्यावर ते जुनंच ओझं तोलत होती.. गिऱ्हाईकांशी बोलत होती.. तिच्या जवळच्या वस्तू विकत होती.. पण सगळं कसं यंत्रवत. तिचा आत्माच जणू तिला सोडून गेला होता.

आता ती इतर विक्रेत्यांसारखीच दिसायला लागली होती. बऱ्याचदा ती जवळून गेली की घामट पारोसा की कसला कोणजाणे वास यायचा.. त्या नंतर ती नेहमीच पुढे किंवा मागे वाकलेल्या अवस्थेत दिसू लागली.. आणि तसं तशीच जुनाट, निब्बर.. कर्कश वाटू लागली.. आता मी तिच्या कडून पूर्वी पेक्षा जास्त वस्तू खरेदी करू लागले.. कधी कधी अगदी जरूर नसतानाही टिकलीच एखादं पाकीट, एखादी पीन मी घेऊन टाकायचे.. तेवढाच तिला हातभार..! पण त्या नंतर तिच ते स्वर्गीय हसू परत कधी दिसलं नाही ते नाहीच. हे काही तिच्या एकटीचं नाही तिच्या सारख्या सगळ्याच कोवळ्या विक्रेत्याच बऱ्याचदा हे असच होत जात.. नाही..!

इतक्या हसऱ्या इतक्या नीटनेटक्या मुली पुढे अशा कशा होत जातात..?
हातावरच पोट, वारंवार येणारं बाळंतपण, दारीद्रय ही कारणं माहीत असल्या मुळे.. मग उगाच.. मनात येत की ती एक दोन वर्ष त्या इतक्या सुरेख कशा काय दिसतात..?
त्यांचं ते हास्य टिकवण्यासाठी काहीच करता येणार नाही का..?

त्या दिवशी मी काही तरी कारणाने लवकर घरी चालले होते.. तेव्हा अशीच एक अर्ध्या मुर्ध्या वयाची मुलगी.. सुरेख विक्रेती लोकलच्या दाराशी उदासपणे उभी असलेली दिसली.. थोड्याच वेळात तिच्या दोन्ही डोळ्यातून निःशब्दपणे गंगा-जमुना झरू लागल्या.. आणि समोरच उभ्या असलेल्या मला फक्त बघ्याच्या भूमिकेत राहवेना..!

मी काही करू शकत होते किंवा नाही.. ही पुढची गोष्ट पण त्या क्षणी मी निदान तिच्याशी बोलू शकत होते.. तिला तिच्या उदासीच, रडण्याच कारण विचारू शकत होते.. नाही ते तसं मी विचारावंच असं खूप तीव्रतेने वाटून गेलं.. आणि मी तिच्याशी बोलू लागले.

तर तिच्या अनिश्चित जगण्याचा आणखीन एक भाग कळून आला.
त्या दिवशी तिला टीसीनी पकडून तिच हातावरच पोट सांभाळणार.. चार खोक्याचं दुकान जप्त करण्यात आलं होत. तसा तर तिला या प्रकाराचीही सवय होती.. हप्ता देऊनही.. ही अशी वेळ यावी यातही काहीच नवीन नव्हतं.. तिला दुःख झालं होत ते वेगळ्याच गोष्टीचं.. तिनं विक्रीसाठी आणलेलं सामान तर गेलंच होतं... त्याच बरोबर दिवसभर राबून मिळवलेले याच बॉक्सच्या मध्ये ठेवलेले पैसेही गेले होते.. ते तेवढेच पैसे गेले असते तरी ती अशी गळून गेली नसती.. पण त्या खोक्यात तिचे आदल्या दिवशी कमावलेले पैसेही तसेच होते.. त्याच्या जोरावर तिने नवीन माल ही उचलला होता.. आणि आता हात पुर्ण पणे रिकामे झाले होते.. ती रडत होती ते आदल्या दिवशीच्या कमाईसाठी.

खोक्यातील सामान साधारण पाचशे रुपयांच.. आणि दोन्ही दिवसाची कमाई मिळून दोनशे रुपये.. असा सातशे एक शे रुपयांचा फटका तिला बसला होता. तिचे अश्रू मला बघवत नव्हते.. आणि तिच दुःख मी दूरही करू शकत नव्हते.. सहज वाटलं म्हणून सातशे रुपये काढून तिच्या हातावर ठेवावेत.. एवढी मी दानशूरही नाही. हो पण मी माझ्या कडून तिला पन्नास एक रुपयांची मदत नक्की करू शकत होते.. मी तसे ते पर्स मधून काढलेही.. तो पर्यंत तिच्या डोळ्यातले अश्रू ओसरले होते.. त्या जागी तेच प्रसन्न हास्य फुलवत तिनं मी देऊ केलेली नोट नाकारली.. पुर्ण आयुष्यासाठी नाही, पण एका उदास क्षणी मला भावणाऱ्या सुमुखीला मी काही शब्दांची साथ देऊ केली. याच समाधान माझ्या आणि तिच्या चेहऱ्यावरच, त्या क्षणा पुरत का होईना..! आनंद बनून गेलं.

आणि मला त्या सुमुखीच्या हास्याच गुपित ही कळलं..!
============================================
स्वाती फडणीस....................... ०६-०७-२००९